आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातील पुरूष व महिलांचा'स्टार्टिंग पॉईंट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीतल उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद - Divya Marathi
शीतल उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद

आरक्षणामुळे महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राजकारणात अधिक सक्रिय झाल्या आहेत; पण हे क्षेत्र त्यांच्यासाठी काहीसे नवीन आहे. प्रशासकीय बाबी त्या शिकत आहेत. महिलांची प्रगती होते आहे आणि आगामी काळात राजकारणातील महिलांच्या सक्रिय सहभागाचे चित्र नक्कीच वेगळे असेल, असा विश्वास गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील महिलांचा सहभाग जवळून पाहणा-या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी व्यक्त केला. राजकारणातील महिलांचा प्रशासनात सहभाग कसा असतो, त्यांची कार्यपद्धती बदलते आहे का, प्रश्न मांडण्यासाठी हिमतीने पुढे येतात का, अशा विविध प्रश्नांवर ‘मधुरिमा’तर्फे त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मांडलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत.
महाराष्‍ट्रात महिलांची राजकीय स्थिती खूप सशक्त आहे. आरक्षणामुळे महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात काही महिला खुल्या मतदारसंघातूनही निवडून आल्या आहेत. पुरुष आणि महिलांची लगेच बरोबरी नको करायला. पुरुष अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. महिला नव्या असल्या तरी त्यांच्यामध्ये जिद्द दिसते. त्यांची सतत चालणारी धडपड जाणवते. त्यांना माहीत नसलेल्या गोष्टी त्या विचारतात आणि शिकून घेतात.
राजकीय घराण्यातून आलेल्या महिलेला काही प्रमाणात माहिती असते. सभा कशा घेतात, कार्यकर्ते कसे असतात, याची चर्चा त्यांच्या घरात होते; परंतु सध्या नवख्या महिलांची संख्याही आरक्षणामुळे वाढली आहे. अनेक महिला पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यांच्याकडून आताच अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना आपण वेळ द्यायला हवा.
महिला सरपंच, सभापती, सदस्य भेटायला येतात त्या वेळी महिला व पुरुषांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये फरक प्रकर्षाने दिसून येतो. हलखेडा गावात फासेपारधी समाजाची महिला सरपंच आहे. त्या भेटायला आल्या तेव्हा त्यांचा आग्रह होता ‘आमच्या गावात शौचालये बांधायची आहेत आणि ती मंजूर झाली पाहिजेत.’ म्हणजे त्या किती माहिती घेतायत, त्यांच्या गावात घरे योग्य नाहीत; पण शौचालयाचे महत्त्व त्यांना कळतेय. महिलांसाठी पाणी, आरोग्य, शाळा हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. सामाजिक प्रश्नांवर महिलांचा भर वाढला असून त्यांचा राजकारणातील हा सहभाग समाजाला पोषक व सुदृढ करणारा ठरेल, अशी मला खात्री आहे.
प्रशासनात स्त्री वा पुरुष महत्त्वाचा नसतो. सीईओ हे पद खूप ‘अ‍ॅप्रोचेबल’ असते. पुरुष असो वा महिला अधिकारी, त्याचा प्रत्येकाशी संवाद असावा लागतो. पण महिला अधिकारी असल्यास प्रश्न आणि मागण्या घेऊन येणा-या लोकप्रतिनिधी महिला अधिक मोकळेपणे बोलू शकतात.
पुरुष अधिका-यांशी जे विषय बोलायला अवघड वाटते ते विषय त्या महिला अधिका-याजवळ मोकळेपणे बोलू शकतात.
बहुतांश महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन असल्याने शासनातर्फे राजीव गांधी सशक्तीकरण अभियान किंवा यशदामार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा त्यांना फायदा होतो. महिलांना आर्थिक क्षमता दिली आहे. पदाला अधिकार आहेत. त्यांच्या स्वभावाचा
गैरफायदा घेत कोणी को-या चेकवर सही घेऊ शकते. त्यामुळे त्यांना ट्रेनिंग दिले जाते.
मी चंद्रपूरला असिस्टंट कलेक्टर असताना सहा निवडणुका माझ्या कार्यकाळात झाल्या. यात महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, विधान परिषद आणि चंद्रपूर जिल्हा बॅँकेची पोटनिवडणूक यांचा समावेश होता. त्या काळात जाणवले की महिला कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात. मला कधीच असे आठवत नाही की महिलांनी हुल्लडबाजी केली किंवा एखाद्या महिला सदस्यावर कारवाई करावी लागली.
महिलांची संख्या वाढल्याने प्रशासनापुढेसुद्धा प्रश्न उभे राहिले होते. महिला बैठकीला यायच्या तेव्हा अनेक अडचणी असायच्या.
त्यासाठी आता आम्ही त्यांची बैठक व्यवस्था, त्यांची स्वच्छतागृहे नव्याने तयार करून घेतली असून सर्व व्यवस्था, सोयी महिलांच्या दृष्टीने करून घेतल्या आहेत.
आजही महिला व पुरुषांचा स्टार्टिंग पॉइंट सारखा नाहीये. येणा-या काळात तो होईल असे वाटते. महिला बाहेर पडायला लागल्या आहेत. अनेक महिला संघटनांचे कार्य दिसते आहे. वृत्तपत्र, टीव्हीच्या माध्यमातून महिलांचे कार्य घराघरात पोहोचले आहे. एखादी महिला जिल्हा परिषदेत येते तेव्हा तिची शेजारीण विचार करते की, कालपर्यंत ही माझ्यासोबत गप्पा मारत बसायची आणि आज जिल्हा परिषदेत जाते.
तिलाही उत्साह येतो. महिला आमदार, खासदार, मंत्री होताहेत. यात बचत गटांची भूमिकासुद्धा मोठी आहे. त्या महिला आत्मविश्वासाने बोलतायत, काहीतरी करून दाखवण्याची महिलांमधील ही जिद्द वाढली आहे. महिला राजकीय क्षेत्रात सक्रिय होताहेत हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून येणारा काळ नक्कीच बदललेला असेल, असे माझा अनुभव मला सांगतोय.

yamini.kulkarni@dhainikbhaskargroup.com