आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yamini Kulkarni Article About A Young Woman’s Aspirations

नको ती प्रश्‍नांची सरबत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नकळत सगळे घडणारे हे वय, अनेक गोष्टींचा एकत्रित विचार करून निर्णय घेण्याचे हे वय, मित्रमैत्रिणी आणि घर यांचा ताळमेळ साधत आपल्या मनाप्रमाणे स्वच्छंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारे हे वय. मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि खूप निर्णय घेण्याचा काळ असणारे हे 18 ते 25 वर्षांचे वय. मुलगी तरुण झाली की सगळ्यांच्या नजरा कशा भिरभिरायला लागतात. म्हणजे मला तर अनेकदा असा प्रश्न पडतो की तरुण होणार कोण, मुलगी असते कोणाची आणि काळजी, लक्ष, चिंता असते कोणाला? तर नातेवाईक, आसपासचे, शेजा-यांना. कितीही ‘वेल एज्युकेटेड’ कुटुंब असो, मुलींना त्रास सहन करावा लागतोच. त्यात नो कॉम्प्रमाइज.


या मुलींना तर चांगलेच टेन्शन असते. एखाद्या गुप्तहेराप्रमाणेच इतरांचे लक्ष तिच्यावर असते. घरातील मंडळींपेक्षा बाहेरच्यांनाच तिची इतकी काळजी असते की ती घरातून निघाल्यापासून घरात येईपर्यंत सर्व फोकस जणू तीच आहे. आपल्या भागात, कॉलनीत, गल्लीत कॉलेजची मुलगी असेल तर महिलांचा गॉसिपिंगचा विषयच ती बनलेली असते. शिक्षण, नोकरी आणि लग्न या सर्व गोष्टींनी घेरलेले हे वय. महिला सबलीकरणाच्या आजच्या काळात व महिलांच्या 50 टक्के आरक्षणाच्या जमान्यातही मुलीचे लग्न लवकरच व्हायला हवे, अशीच मानसिकता आहे. मग मुलगी तिच्या कामासाठीदेखील कोणाशी बोलली तरी चर्चा सुरू होते. तिचे करिअर, शिक्षण, स्वभाव, कुटुंब, परिस्थिती काहीच न पाहता चित्रविचित्र तर्कवितर्कांना सुरुवात करतात.


आजकाल मुलींना सगळ्यात मोठा ताण असतो तो समाजाचाच. त्यांना शिकण्याची इच्छा, करिअर घडवण्याची जिद्द असताना त्यापासून त्यांना दूर ठेवणा-या समाजाचा. स्वत:च्या आयुष्यावर इतरांचाच हक्क जास्त असल्याची जाणीव मुलींना होते. घरातील मंडळींचादेखील यास हातभार लागतो. यातच नवीन प्रश्न त्यांच्यासमोर उभे होतात. त्यामुळे तरुणींची द्विधा मन:स्थिती होते. मैत्रिणींशी गप्पा होताना अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अजूनही अनेकींना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नसते. मेट्रो सिटीत तरी मुलींना खूप स्वातंत्र्य मिळते, परंतु आजही निमशहरी भागात मुलगी डॉक्टर, इंजिनिअरसारख्या पदवीचे शिक्षण घेत असली तरी शिक्षणाच्या मध्यातूनच त्यांचा लग्नाचा विचार घरातले करायला लागतात. मुलींना मनाविरुद्ध आपले आयुष्य अनोळखी व्यक्तीच्या हाती सोपवावे लागते.


आजकाल मुली त्यांच्या करिअरबाबत खूप सावध झाल्या आहेत. त्यानुसार त्यांचे पाऊलही पडत असते, मात्र अनेकदा कुटुंबामुळे जबरदस्ती आपली वाट बदलावी लागते. निखळ मैत्री व नवनवीन मैत्री होणारे हे वय. महाविद्यालयीन व नोकरी या दोन्ही क्षेत्रांत नवे ग्रुप होत असतात. मात्र, आम्ही फक्त मित्रमैत्रिणी आहोत हे कोणीच समजून घेत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांतही मैत्री असू शकते, यावर विश्वासच ठेवायला कोणी तयार नसते. त्यामुळे मैत्री करण्याअगोदर घरातील, त्याहीपेक्षा बाहेरील समाजाचा जास्त विचार करावा लागतो; पण एका जिवलग मित्राची/मैत्रिणीची गरज या वयात प्रत्येकालाच भासत असते. मग आपल्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टींचे शेअरिंग त्या व्यक्तीशी केली जाते.


पण अशा मैत्रीमुळे विचारल्या जाणा-या प्रश्नांच्या सरबत्तीने बिचारी पार वैतागून जाते. नोकरी करायची असल्यास त्यामध्येही घरातल्यांचाच सहभाग येतो. बाहेरगावी जायचे नाही, हॉस्टेलवरच राहायचे, फ्लॅट चालणार नाही, बसने जायचे, टॅक्सी करू नको, जास्त जवळीक नको या सूचना तिच्यामागे लागतात. अखेर लग्नाचा पर्याय अनेक जणी स्वीकारतात. कुटुंबाच्या आग्रहाखातर. हे वय लग्नासाठी योग्य आहे, असे म्हणत 22नंतर मुलीच्या गळ्यात वरमाला पडते.


माझ्या मैत्रिणीचे लग्न नुकतेच झाले. तीदेखील माझ्याच वयाची. तिचे लग्न ठरल्यानंतर मी तिला विचारले की, इतक्या लवकर लग्न का करतेयस तू? काही जबरदस्ती आहे का घरातून? ती म्हणाली की, मला लग्न करावेसे वाटतेय, मुलगा मला आवडलाय आणि मला कळले आहे की, माझे आयुष्य यांच्यासोबत खूप चांगले जाईल. मला ते ऐकून बरे वाटले की, हा तिने घेतलेला निर्णय होता. तोदेखील विचारपूर्वक घेतलेला. तिला आवडलेला. असेच निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला मिळाला तर?


yamini.kulkarni@dainikbhaskargroup.com