आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yamini Kulkarni Article About Women's Self Help Groups, Divya Marathi

ताज्या ताज्या माळव्याचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार... गाणं ऐकायला, पाहायला छान आहे यात वाद नाही; पण आपल्या घरी जी भाजी रोज येते ती किती ताजी असते नि त्यावर किती कीटकनाशकं, रसायनं फवारलेली असतात, याचा आपल्याला अंदाज नसतो. भाजी मुळात कितीही पौष्टिक असली तरी त्यावरच्या या रसायनांमुळे ती घातक ठरू शकते, याची जाणीव आताच्या जागरूक आणि जागृत महिलांना झालेली आहे. त्यांच्यासाठीच जळगावातील एक बचत गट सेंद्रिय भाजीपाला, फळे पुरवत आहे.

श्री श्री महिला बचत गट हा असे काम करणारा शहरातला पहिलाच. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील या महिलांच्या बचत गटाची स्थापना मागील वर्षी मार्च महिन्यात करण्यात आली. तेव्हापासून रसायनांपासून सर्वसामान्यांचा संपर्क कसा टाळता येईल याचा प्रयत्न या महिलांद्वारे करण्यात येतो. ना नफा ना तोटा या तत्त्वावर आधारित हे भाजीपाला विक्रीचे काम चालते. जवळच्या डांभुर्णी येथील भरत भंगाळे या शेतकर्‍याकडून बराचसा सेंद्रिय भाजीपाला त्या खरेदी करतात.

खेडोपाडी फिरून शेतकरी जमवले
या बचत गटातील महिलांनी सुरुवातीला जिल्ह्यातील अनेक खेड्यांना भेटी देऊन शेतकर्‍यांकडून सेंद्रिय भाजीपाल्याविषयी माहिती गोळा केली. शेतकर्‍यांना आपल्या उपक्रमाबाबत समजावून सांगत एकत्रित केले. नागरिकांना दररोज आवश्यक असलेल्या भाजीपाल्याला प्रथम प्राधान्य देत शेतकर्‍यांना त्याबद्दल सांगितले व आवश्यक असलेला भाजीपाला पहिल्यांदा विकत घेतला. जशी मागणी वाढत गेली त्याप्रमाणे त्यांनी भाजीपाल्यासह फळेही पुरवायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मागणीनुसार जो भाजीपाला सेंद्रिय नाही त्याची लागवडदेखील करायला शेतकर्‍यांना सांगितले. जवळपास 3 महिने अगोदर शेतकर्‍यांना त्यांनी भाजीपाला लावण्यास सांगितले व त्या प्रकारचा भाजीपाला त्या आता उपलब्ध करून देत आहेत. या उपक्रमाचे यश पाहून आता शेतकरीच बचत गटाच्या महिलांशी संपर्क साधत आहेत.

धान्याची केली होती विक्री
या अगोदर त्यांनी गहू, दादर, ज्वारी यांसारख्या सेंद्रिय धान्याचीही विक्री केली होती. यातही संपूर्ण जिल्ह्यातून शेतकर्‍यांकडून धान्य गोळा केले व योग्य भावात त्यांनी विक्री केली. आजही लोकांकडून या सेंद्रिय धान्याची मागणी होत आहे.

या अनुभवातून स्फूर्ती घेऊन या महिलांनी सेंद्रिय भाजीपाला विकायला एक महिन्यापूर्वी सुरुवात केली. दर बुधवारी शहरातील महाबळ, भास्कर मार्केट, प्रतापनगर, दादावाडी आदी परिसरांतील 25 ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्यांची बास्केट महिलांतर्फे दिली जाते. यात खासकरून वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे सेंद्रिय भाज्यांची मागणी आहे. यात सेंद्रिय पपईला अधिक मागणी आहे. या बास्केटमध्ये पपई, केळी, मेथी, भेंडी, वांगे, वाल, मिरची, कांदे, गंगाफळ, दुधी भोपळा या भाज्या देण्यात येतात. दर बुधवारी प्रत्येकी 15 किलो भाजीपाला विकला जातो.

लीना पाटील, संध्या फालक, प्रतिभा पाटील, रत्ना वाघ, डॉ. ज्योती गाजरे, डॉ. सुचिता खडके, नलिनी पाटील, वंदना पाटील, हर्षा पाटील, संगीता धनाड, रेखा टोक, अर्चना पाटील, अंजली ब-हाटे या महिलांचा मिळून हा बचत गट आहे.

एन्झाइमही विकतात
टाकाऊ भाजीपाला, झाडांचा पालापाचोळा, झाडांच्या साली, कोरफड, गूळ यांच्या मिश्रणाने एन्झाइम तयार केले जाते. तीन महिने साठवून खराब झालेला गूळ यात टाकण्यात येतो. सेंद्रिय भाजीपाला व फळांसाठी हे एन्झाइम उपयुक्त ठरते. या बचत गटातील महिला एन्झाइमही बनवून विकतात. घरगुती भाजीपाला लावला असल्यास त्यासाठी हे एन्झाइम अत्यंत फायदेशीर ठरते.

झाडांची वाढ होण्यासाठी कीटनाशकांपेक्षा याचा वापर अधिक चांगला समजला जातो. त्याचबरोबर नागपूर येथून गायीचे तूप व मध्य प्रदेशातील नेफानगर येथून गूळ विक्रीही करतात.

yamini.kulkarni@dainikbhaskargroup.com