आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येसूबाईंची कहाणी सांगण्याचा ध्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्करोगासारख्या दुर्धर अाजाराशी हिमतीने लढा देऊन त्यातून यशस्वीरीत्या बाहेर येणाऱ्या जळगाव जनता बँकेत कार्यरत असलेल्या सुलभा कुलकर्णी यांचा संघर्ष असाच प्रेरणादायी. ज्या रणरागिणीने ३० वर्षे मुघलांच्या कैदेत घालवली, त्या येसूबाईंची कहाणी लिहून काढण्याचा ध्यास सुलभाताईंनी कर्कराेगाचा हल्ला झाल्यानंतरही सोडला नाही व तब्बल ५७० पानांची कादंबरी लिहून पूर्ण केली. यापूर्वी त्यांनी अनेक एेतिहासिक व्यक्तिरेखा, एेतिहासिक कार्य केलेल्यांवर नाटकं व पुस्तकं लिहिली अाहेत.

२००८मध्ये त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. परंतु इतर अाजारांप्रमाणेच त्यांनी हा अाजारदेखील सहजपणे हाताळला. पहिल्या रेडिएशन थेरपीला जाण्याअगाेदर एक तास त्यांनी अापले एमएचे लेक्चर केले व नंतर त्या उपचारासाठी दाखल झाल्या. एखादी गाेष्ट मनात ठरविली तर त्यात सातत्य ठेवून ते पूर्ण करण्याची विलक्षण जिद्द सुलभाताईंमध्ये अाहे. वाचनाची अत्यंत अावड असल्याने उपाचारादरम्यानही त्यांनी अनेक पुस्तके वाचली. अाजारातून त्या पूर्णत: बाहेरही पडल्या. याच काळात त्यांना येसूबाई गवसल्या. एेतिहासिक वाचनाची अाेढ असल्याने येसूबाईंविषयी वाचनात अाले व त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची अास त्यांना लागली. अधिक वाचन केल्यानंतर येसूबाई सगळ्या महिलांपर्यंत पाेहोचवायच्या, असं त्यांना वाटलं. येसूबाईंचा संघर्ष, संयम अाणि एवढी वर्षे कैदेत राहूनही जपलेले चारित्र्य अाणि त्यामुळे त्यांना मिळालेली सन्मानाची वागणूक हे सगळे वाचकांपर्यंत पाेहोचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.

मग त्या ‘अाम्ही मैत्रिणी’ या कॅन्सर सपाेर्ट ग्रुपमध्ये सहभागी झाल्या अाणि इतर महिलांना समुपदेशन करायला लागल्या. ज्या अाजाराने महिला संपूर्ण खचून जातात, त्या अाजारातून सकारात्मक विचारांच्या आधारे बाहेर निघून इतर महिलांसाठी काही काम करावे, या हेतूने सुलभाताईंनी कादंबरी लिहायला घेतली.

त्यांनी डाॅ. अानंदीबाई जाेशी यांच्यावर ‘अानंदमयी’ हे नाटक लिहिले असून त्याला उत्कृष्ट नाट्यलेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. र. धाें. कर्वे (‘वादळातील दीपस्तंभ’ हे नाटक), १८५७चा खान्देश अशा विषयांवरही त्यांनी लिखाण केले अाहे. कॅन्सरवर अान्सर अाणि माेटर न्यूराॅन डिसीज या विषयावर ‘एकमेवाद्वितीया’ हे पुस्तक प्रकाशित झाले अाहे. ‘येसूबाई’ कादंबरीकरीता डाॅ. सदाशिव शिवदे हे त्यांचे मार्गदर्शक असून पती राजीव, मुलगी केतकी, तसेच सुनील व सुधीर कुळकर्णी यांचे अमूल्य सहकार्य व पाठिंबा त्यांना होता. यांच्यामुळेच कादंबरी लिहिण्याचे ध्येय पूर्ण करू शकल्याचे त्या सांगतात. या दिवसांत त्यांनी अजिबात टीव्ही पाहिला नाही, दिवसभराच्या वेळेचे नियाेजन केले. सतत कादंबरीचा विषय त्यांच्या ध्यानीमनी असायचा. ध्येयापासून कुठेही भरकटता कामा नये, म्हणून स्वामी विवेकानंद यांचे सकारात्मक विचार खाेलीत त्यांनी ठिकठिकाणी लावले.

५७० पानांची ही कादंबरी लिहिणे अर्थताच साेपे नव्हते. अाजारातून नुकत्याच बाहेर पडल्या हाेत्या, पण थांबल्या नाहीत. ठरविल्याप्रमाणे सातत्य ठेवले. त्यांना अापल्या ध्येयाने पछाडूनच टाकले हाेते. जवळपास १८ महिने त्यांनी संशाेधन केले. येसूबाईंवर लिहिणे कठीण हाेते, कारण त्यांच्याबद्दल फारच कमी संदर्भ सापडतात. ते शाेधून त्यात सुसूत्रता अाणून केंद्रस्थानी येसूबाईंना ठेवून मार्च २०१४मध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली. जुलै २०१६मध्ये ते पूर्ण झाले. येसूबाईंचा जन्म १६६१चा, १६६६मध्ये लग्न झाल्यानंतर शिवाजी महाराज व जिजाऊ यांचा सहवास मिळाला. त्यांनी काही वर्षं रायरी लढवला, नंतर १६८९मध्ये अाैरंगजेबाच्या कैदेत गेल्या, त्या ३० वर्षे कैदेत हाेत्या. त्यांचा मुलगा शाहू साेबत हाेता. जिथे अाैरंगजेबाची छावणी जाई तिथे त्यांना सोबत नेले जाई. परंतु त्यांना कायम सन्मानपूर्वक वागणूक मिळाली. येसूबाईंचा संकटाला न डगमगता मार्ग काढण्याचा स्वभाव, मार्दव, अादर्श प्रत्येक महिलेने अंगीकारावा, यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे सुलभाताई म्हणतात.

यामिनी कुळकर्णी, जळगाव
yamini.kulkarni@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...