आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतोनात संग्राह्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोविकास प्रकाशनतर्फे विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा घडवणाऱ्या ‘लाइमलाइट’ या ग्रंथाचे गुढीपाडव्याला पुण्यात प्रकाशन झाले. अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी या लेखक द्वयीने हा ग्रंथ साकारला आहे. गोडबोले यांच्या इतर ग्रंथांवर तुटून पडणाऱ्यांसह विदेशी चित्रपटांचे अभ्यासक आणि चित्रपटसृष्टी समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला ‘लाइमलाइट’ आवडेल असा आहे...

सन १९७२ सालचे मुंबई आयआयटीयन्स. केमिकल इंजिनिअर. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्रात देशा-विदेशातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील सर्वोच्च पदावरील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कामामुळे नावलौकिक. अलीकडच्या दशकातील ‘मेगा मॅरेथॉन सर्व क्षेत्रस्पर्शी मराठी लेखक’ अशी ठळक ओळख अच्युत गोडबोले यांनी साहित्यिक वर्तुळात निर्विवादपणे निर्माण केली आहे. संगणक, व्यवस्थापन, भारतीय संगीत, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित, विदेशी साहित्य, चित्रकला, शिल्पकला, रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध विषय वाटा एकाच वेळी चोखाळून त्यांनी चौफेर ग्रंथनिर्मिती केली आहे, ती अचाटच आहे. अत्यंत साधी सोपी लेखनशैली, गंभीर विषयांची प्रवाही भाषेतून सुलभ मांडणी, आकर्षक मुखपृष्ठांतून साकारलेल्या ग्रंथरचना, परवडेल असे वाजवी मूल्य... यामुळे तरुणाईसह सर्व वयोगटांतील लक्षावधी मराठी वाचकवर्ग अच्युत गोडबोले यांच्या लेखनशैलीच्या प्रेमात पडला आहे, हे केवळ कथा, कादंबऱ्या, नाट्य, गद्य-पद्य किंवा कविता म्हणजेच साहित्य अशी धारणा असणाऱ्या पारंपरिक साहित्यिक वर्गालाही मान्य करावे लागेल.

मनोविकास प्रकाशनतर्फे विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा घडवणाऱ्या ‘लाइमलाइट’ या ग्रंथाचे गुढीपाडव्याला पुण्यात प्रकाशन झाले. अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी या लेखक द्वयींनी हा ग्रंथ साकारला आहे. गोडबोले यांच्या इतर ग्रंथांवर तुटून पडणाऱ्यांसह विदेशी चित्रपटांचे अभ्यासक आणि चित्रपटसृष्टी समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला ‘लाइमलाइट’ आवडेल असा विश्वास वाटतो. ग्रंथाच्या आरंभी आभारातच गोडबोले यांनी पाश्चात्त्य संगीतावर ‘सिंफनी’ हा ग्रंथ वाचकांना लवकरच अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला आहे, यावरूनच त्यांच्या अचाट लेखन इच्छाशक्तीचा प्रत्यय यावा!
‘लाइमलाइट’ या ग्रंथाच्या पहिल्या टप्प्यात गोडबोले-जोशी यांनी हॉलीवूडमधील जागतिक चित्रपट क्षेत्रातील आठ व्यक्तिरेखा निवडून त्यावर आशयपूर्ण लेख लिहिले आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपटांचे जग जसे दिसले तसेच वाचकांसमोर मांडण्याचा लेखकद्वयींनी अभ्यासपूर्वक प्रयत्न केला आहे. या ग्रंथामध्ये स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्यातील सुख-दु:खावर पांघरूण घालून जगाला आनंदी जगण्याचे क्षितीज गाठलेला चार्ली चॅप्लीन आहे. ज्याच्या प्रभावी अभिनयामुळे रहस्यमय भयपट म्हणजेच आल्फ्रेड हिचकॉक असे हॉलीवूडच्या सिनेरसिकांनी समीकरण तयार केले, त्याचा समावेश आहे. जागतिक पातळीवर घराघरांतील बालमनावर साम्राज्य गाजवणाऱ्या ‘मिकी माऊस’ या जादुई उंदराचा जन्मदाता ग्रेटेस्ट अॅनिमेटर वॉल्ट डिस्ने आहे. जगातील सिनेरसिकांना सत्याचा शोध घ्यायला भाग पाडणाऱ्या ‘राशोमान’ या जपानी चित्रपटाचा दिग्दर्शक अकिरा कुरोसावा आहे. मृत्यूसारखा अनाकलनीय विषय अतिशय गंभीर ताकदीने हाताळणारा स्वीडिश दिग्दर्शक इंगमार बर्गमन आहे. हॉलीवूडच्या कमोडिटिफिकेशनला बळी पडलेली आणि रहस्यमय मृत्यूमुळे गाजलेली शापित सौंदर्यवती मर्लिन मन्रो हिच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जगाला ‘मेथड अॅक्टिंग’चा धडा शिकवणारा आणि ‘गॉडफादर’ चित्रपटात ‘गॉडफादर’ची अजरामर भूमिका करून सिनेरसिक जगताच्या मनावर भुरळ घालणारा मार्लन ब्रँडो याचे अनेक पैलू लेखातून उलगडण्यात आले आहेत. एकाचवेळी ‘ज्युरासिक पार्क’सारखे सायफाय आणि ‘शिंडलर्स लिस्ट’सारखे मानवतावादी चित्रपट साकारणारा सर्वाधिक लोकप्रिय जागतिक कीर्तीचा दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्गही आहे.

‘लाइमलाइट’ ग्रंथातील दुसऱ्या टप्प्यात जागतिक कीर्तीचे नामवंत अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शकांचा आढावा घेणारे आशयपूर्ण लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. काही नामवंत अभिनेत्यांमध्ये लॉरेल-हार्डी, हंफ्रे बोगार्ट, ऑर्सान वेल्स, ग्रेगरी पेक, सिडने पॉशिये, शॉन कॉनरी आणि डस्टिन हॉफमन या विख्यात अभिनेत्यांचा संघर्षमय सिनेसफरीचा रंजक लेखाजोखा मांडण्यात आला आहे. काही नामवंत अभिनेत्रींमध्ये ग्रेटा गार्बो, कॅथरीन हेपबर्न, इनग्रिड बर्गमन, एलिझाबेथ टेलर आणि सोफिया लॉरेन यांसारख्या पाच दिग्गज अभिनेत्रींच्या सिनेअभिनय प्रवासाचा धावता आढावा लेखांमधून घेण्यात आला आहे. ‘लाइमलाइट’मधील नावे निवडताना केवळ ऑस्कर किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जागतिक कीर्तीच्या प्रख्यात कलाकार आणि दिग्दर्शकांचा विचार करण्यात आलेला नाही. ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे, चित्तधारक अनुुभवांची समृद्धी आहे नि रोमहर्षकताही आहे, त्यांचा जाणीवपूर्वक विचार ग्रंथातील लेखांमधून करण्यात आला आहे. किंबहुना ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत हेलकावे खात आयुष्य जगले, तशाही प्रतिकूल संघर्षयात्रेत मानवतावादी विचारांना जन्म घालत सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केली, अशा निवडक अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील कमालीचा संघर्षमय प्रवासाचा वेध या ग्रंथांमधील लेखांमध्ये गोडबोले-जोशी लेखकद्वयींनी घेतला आहे. ग्रंथातील अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांच्या आयुष्यातील खडतर मार्ग हेच यशोशिखरापर्यंत पोहोचण्याचे राजमार्ग कसे ठरले, याची नेमकेपणाने ‘लाइमलाइट’ ग्रंथामधून रंजक मांडणी केल्यामुळे सर्वसामान्य वाचकाला ते आवडतील, अशी आशा वाटते. शेवटी ‘लाइमलाइट’ ग्रंथाबद्दल अभिप्राय देताना प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणतात, “नाट्यशास्त्र, साहित्य, गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र अशा अनेक कलाप्रकारांनी जगभरातल्या संस्कृतींवर गेली अनेक शतकं आपला प्रभाव टाकला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरवातीला चित्रपट हे माध्यम विकसित झालं आणि त्यानं केवळ एका शतकात आधीच्या सर्व कला आपल्यात शोषून घेतल्या. त्या सर्व कलाप्रकारांचा वापर करून चित्रपट हे ताकदीचं माध्यम जगभरातल्या सर्व प्रेक्षकांच्या मनावर आरूढ झालं.” म्हणून आज घडीला वैश्विक पातळीवर विचार करता जगातला कुठलाही समाजघटक हा चित्रपटाच्या माध्यमातून होणाऱ्या सांस्कृतिक जडणघडणाच्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही, याचीच जाणीव ‘लाइमलाइट’ ग्रंथातील सर्व लेख वाचताना सर्वसामान्य वाचकांना पदोपदी करून देतात.
ग्रंथाचे नाव : लाइमलाइट
लेखक : अच्युत गोडबोले,
नीलांबरी जोशी
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य : २९५ रुपये