आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशोंच्‍या 'शिव-सुत्रा'ची ध्‍यान योग प्रणाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओशो यांनी लिहिलेले ‘शिव-सूत्र’ हे ग्रंथ पुण्याच्या ओशो मीडिया इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी जगाला ध्यानयोग (मेडिटेशन) साधनेचे महत्त्व पटवून दिले आहे. ध्यानायोगाचे महत्त्व, त्यापासून मानवी मनाला मिळणाऱ्या प्रेरणा ओशोंनी प्रभावी प्रवचनांच्या माध्यमातून सप्रमाण सिद्ध करून दाखवून दिल्या.   

अजाणत्या वयात शालेय मुलांच्या आत्महत्या... पोटच्या मुलांकडून आई-वडिलांच्या खुनाच्या अमानवी घटना...आई-वडिलांकडून पोटच्या मुलांच्या हत्या... बाल वयातील मुलांचे किंवा मुलांकडून होणारे लैंगिक अत्याचार...ज्येष्ठांकडून होणारे बालकांचे लैंगिक शोषण... नातेसंबंधांचे पावित्र्य छेदून प्रस्थापित होणारे शारीरिक संबंध... हे सगळे कशाचे लक्षण आहे? अशा कोणत्याही अनैसर्गिक गोष्टींना हिंसक मनोवस्था कारणीभूत असते. वासनेच्या आहारी गेलेल्या भावनांध मनाला सामाजिक ‘भोवताली’च्या सीमा नसतात. हे टाळायचे असेल तर योग साधनेतील ध्यान योग साधनेची गरज आहे. ही गरज थोर भारतीय तत्त्वज्ञांनी ओशो यांनी ओळखली. त्यांनी विकसित केलेली ध्यान योग पद्धती शुद्ध मनाच्या मशागतीसाठी जगाने स्वीकारली.  आेशो यांच्या ‘शिव-सूत्र’ ग्रंथातील प्रत्येक प्रवचनांमध्ये समाजाच्या मनात ध्यानयोग साधनेबद्दल असणारे समज-गैरसमज यात स्पष्टता येते. ओशो यांच्या सांगण्यातील नेमकेपणात ध्यानयोगाचा साकल्याने उकल झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे ओशो ‘साक्षी भाव जागा ठेवून स्वत:ला ओळखा.’ असा जो समाजाला जोगोजागी संदेश देतात, त्याचा सर्वसामान्यांनादेखील बोध होतो.
 
मानवी जीवनाच्या कल्याणासाठी, निरामयी प्रगल्भ समाजनिर्मितीसाठी भारतीय योग साधना आता जगन्मान्य झाली आहे. भारतात योग साधना परंपरेचा जन्म अनादी कालापासूनचा आहे. योग शास्त्रातील ध्यान योग साधना ही एक सर्वधर्म समावेशक शाखा आहे. ती रामायण - महाभारत काळापूर्वीपासून महत्त्वाची मानली जाते. ध्यान योग साधनेचे एकूण ११२ प्रकार आहेत. त्यांच्या मांडणीमध्ये भेद असले तरी अनिर्णयात्मक दृष्टिकोन, साक्षीत्व आणि मन:शांती ही त्रिसूत्री सर्व ध्यान साधना प्रकाराचे मूल बीज आहे. विविध कालखंडांमध्ये भूतलावरील अनेक प्राचीन देवी-देवतांनी, राजा-महाराजांनी आणि थोर विभूतींनी ध्यान साधनेच्या जोरावर आपापला ठसा उमटवला. त्यामुळे भारती ध्यान योग पद्धतीचा लौकिक जगात अढळस्थानी आहे.

सोप्या आणि साध्या सरळ शब्दांत सांगायचे झाले तर ‘ध्यान म्हणजे परिपूर्ण मानसिक अवस्थेत घडलेली कोणतीही कृती.’ विस्मय, विवेक आणि वितर्क हे ध्यान योगाचे मूळ सूत्र आहे. याची उकल करताना एकीकडे ओशो सर्व धर्मातील थोतांडावर जशी प्रखर टीका करतात, तसेच दुसरीकडे सर्व धर्मातील पात्रांच्या उपदेशाचे महत्त्वही लीलया पटवून देण्याचा विसर पडू देत नाहीत.  ओशो यांनी लिहिलेले ‘शिव-सूत्र’ हे ग्रंथ पुण्याच्या ओशो मीडिया इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी जगाला ध्यानयोग (मेडिटेशन) साधनेचे महत्त्व पटवून दिले आहे. फक्त ध्यानयोग साधनेवर पुण्याच्या आश्रमात आेशो यांनी हिंदीमध्ये दिलेल्या दहा व्याख्यानांचे संकलन या ग्रंथात आहे.

ध्यानायोगाचे महत्व, त्यापासून मानवी मनाला मिळणाऱ्या प्रेरणा त्यांनी प्रभावी प्रवचनांच्या माध्यमातून सप्रमाण सिद्ध करून दाखवून दिले. शुद्ध तर्काच्या आधारावर पतंजलीपासून भगवान श्रीकृष्ण, श्रीरामचंद्र, मुहंमद पैगंबर, झेन, भगवान महावीर, गौतम बुद्धांपर्यंत ध्यानाला सर्वांनी कसे पुढे नेले, याचा ओशोंनी सर्वार्थाने अभ्यास केला. माणसाला स्वत:ला ओळखण्याचे एकक म्हणजे ध्यान. स्वत:ला ओळखल्याशिवाय आजूबाजूच्या समाजाला, पर्यायाने जगाला ओळखणे आजवर कुणालाच म्हणजे अगदी देवालाही शक्य झाले नाही, हा सिद्धांत ओशो यांनी शुद्ध तर्कशास्त्राच्या कसोटीवर मांडला. ध्यान योग साधनेचा आजच्या भौतिक सुखासीन समाजहितासाठी कसा उपयोग होऊ शकतो, याची लोकोपयोगी मांडणी केली.  
 
ओशो यांचे मुद्दे खोडून काढणे जगातील कोणत्याच विद्वानाला आजवर शक्य झाले नाही. म्हणून त्यांच्या हयातीमध्येच लंडनच्या ‘संडे टाइम्स’ने जगातील सर्वात ‘खतरनाक (चांगल्या अर्थाने) व्यक्ती’, आणि भारतातील ‘मिड-डे’ वृत्तपत्राने ‘ओशो म्हणजे भारताचे भाग्य बदलणाऱ्या पहिल्या दहा विभूतींपैकी एक’ अशा शब्दांत गौरव केला आहे. लिखित साहित्य, ध्वनिमुद्रित आणि ध्वनिचित्रमुद्रित अशा सुमारे नऊ हजार तासांच्या प्रवचनांची ओशो यांची उपलब्ध बौद्धिक संपदा आजही जगाच्या मनावर अधिराज्य करते आहे. जागतिक पातळीवर समाजाच्या सर्व स्तरांवर वाढत चाललेला मानसिक तणाव घालवण्यासाठी ध्यान योग साधना उपयोगी ठरते आहे. म्हणूनच २०१७-१८ वर्षासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ‘मानसिक तणावमुक्त मानवी जीवन’ हे ब्रीद घोषित केले आहे. श्वास आणि ओम उच्चारणातून ओशो यांनी विकसित केलेली ध्यान योग साधना जगातील कोट्यवधी साधक तणावमुक्त जीवशैलीसाठी वापरतात. त्यांच्या ध्यान योग प्रणालीद्वारे तीव्र इच्छाशक्ती असलेल्या आणि शुद्धीवरच्या कोणत्याही अवस्थेतील मानवाला आपल्या अपेक्षित मन:शांतीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. इतकी प्रचंड ऊर्जा नियमित साधकांनी (फॉलोअर्स) अनुभवली आहे.

 
ओशो म्हणतात, ‘ध्यानाला आरंभ असतो, पण अंत नसतो. ध्यानासाठी मन एक साधन आहे. एकदा ध्यान अवगत झाले म्हणजे तुम्हाला पूर्णत्वाची आपोआप अनुभूती येईल. ध्यान योग साधनेपूर्वी मनाची अनियंत्रित सचेतन शांत विश्रामावस्था अनिवार्य आहे. एकदा मन स्थिर झाले, समाधानी झाले की मेंदूकडून विचारांच्या माध्यमातून होणारे कोणतेही निर्णय हे अहिंसक म्हणजे कल्याणकारी असतात.
 
‘शिवसूत्र’ ग्रंथात ओशो ध्यान योग साधनेचे महत्त्व पटवून देताना म्हणतात, शिव तीर्थंकर आहे. शिव अवतार आहे. शिव क्रांतिद्रष्टा आहे. पैगंबर आहे. तो जे सांगेल, त्यात आग (सत्य) आहे. त्याच्या संपर्कात आलात की भस्म (एकरूप) व्हाल. मुक्त व्हाल. यासाठी शिवाच्या निमंत्रणाचा आपल्या मनाची निर्भय तयारी ठेवूनच स्वीकार करा.’ संसारी कुटुंबपालक आई-वडिलांपासून ते शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत... मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णालयातील शुद्धीवरच्या असाध्य आजारी रुग्णांपासून ते युद्धभूमीवरील सैनिकांपर्यंत... कोणालाही आणि कोणत्याही अवस्थेत ध्यान योग साधना उपयुक्त शकते. आधुनिक युगात भारतीय योग साधनेला अध्यात्मासह विज्ञानाची सांगड घालता आली. वैश्विक पातळीवर भारतीय योग संस्कृतीचे महत्त्व ठळकपणे निर्विवाद अधोरेखित झाले. भारतीय योग साधना प्राचीन काळापासून विश्वव्यापी असल्यामुळे ती परंपरा कुठल्या भूगोलाच्या सीमा पाळत नाही किंवा ऐतिहासिक म्हणून एकांगी न राहत सातत्याने नवनव्या संशोधन स्वरूपात जगापुढे येत राहते, असे ओशो यांनी जगाला वेळोवेळी पटवून दिले.
 
ओशो म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करताना ‘ध्यान योग: कर्मसु कौशल्यं’ या संकल्पनेतून युद्धभूमीवरील यशाचे सूत्र पटवून दिले आहे. गीतेच्या सर्व अठरा अध्यायांच्या नावांमध्ये योग शब्द आहे. कठोपनिषदात योगाचे महत्त्व ‘ओम नम: शिवाय’ या महामूलमंत्राद्वारे पटवून देण्यात आले आहे. मानवी समुदायाच्या कल्याणासाठी पर्यायाने आरोग्यसंपन्न वैश्विक समाजनिर्मितीसाठी योगाचे वाढते महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, ही भूमिका ओशो यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कशी मांडली याचा अनुभव ‘शिव-सूत्र’ हा ग्रंथ वाचनांती येतो.  
 
ग्रंथाचे नाव : शिव-सूत्र
लेखक     : ओशो
प्रकाशक : ओशो मीडिया इंटरनॅशनल, पुणे
पृष्ठे     : २३९
किंमत  : तीनशे रुपये
 
yashwant.pople@gmail.com
बातम्या आणखी आहेत...