आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तें'च्या समग्र साहित्याचे फेरमूल्यांकन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९५० ते २००० या पाच दशकांत समाजाला अंतर्मुख करायला भाग पाडणाऱ्या कृतिशील साहित्याची निर्मिती ‘तें’नी अर्थात विजय तेंडुलकर यांनी केली. त्यांच्या लेखनाने संवेदनशील समाजमनाला जशी साद घातली, तसा सामान्य वाचक, पर्यायाने समाजाकडूनही प्रतिसाद मिळाला. त्यांनी नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य, पटकथा-संवाद असे सर्व साहित्य प्रांत चतुरस्र दृष्टीने धुंडाळले. त्यांच्या साहित्याने केवळ लिखित ग्रंथ निर्मितीपुरते मर्यादित न राहता देश-विदेशातील सजग समाजाला विचारप्रवण होण्यास भाग पाडले. ‘तें’च्या साहित्याने सामाजिक आरोग्याची शल्यचिकित्सा म्हणूनही भरीव योगदान दिले. म्हणूनच त्यांची ठसठशीत नाममुद्रा साहित्य आणि रंगभूमीच्या जागतिक पटावर उमटली. ‘तें’ची साहित्यमहती सांगणारी अनेक भाषांत अनेक पुस्तके प्रकाशित झालीत. तरीही समाजाच्या मनातील ‘तें’ आणि ‘तें’ना अभिप्रेत असलेला ‘संवेदनशील समाज’ यांच्यातील विचारसेतू अधिक दृढ अर्थाने सांधण्याचा प्रयत्न रेखा इनामदार-साने यांनी ‘अ-जून तेंडुलकर’ या संपादित पुस्तकातून केला आहे. त्यातील सोळा दिग्गज लेखकांनी ‘तें’च्या समग्र साहित्याचे केलेले फेरमूल्यांंकन हे आगामी पिढीच्या नटनट्या, गुणवान लेखक, पत्रकार, दिग्दर्शक, सूत्रसंचालक आणि अखिल चोखंदळ अभ्यासू वाचकवर्गाला निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असे आहे. संपादक म्हणून रेखा इनामदार-साने यांनी केलेली लेखकांची निवड वादातीत असल्यानेच पुस्तकाला वैचारिक उंची प्राप्त झाली आहे.

‘तें’च्या साहित्यिक कारकिर्दीला अनेक अर्थांनी चढ-उतारांचे पैलू आहेत. त्या पैलूंचे सर्वच ज्येष्ठ लेखकांनी सोदाहरण विविध संदर्भग्रंथांचा दाखला देऊन सर्वार्थाने फेरमूल्यांकन केले आहे. ‘लेखन’ आणि ‘व्यावहारिक अर्थाने वास्तविक जीवन’ यात फारसे अंतर पडू न दिल्यामुळे, ‘तें’ची साहित्य संपदा सदासर्वकाळ चर्चेत राहणारी आहेे. पुण्याच्या राजहंस प्रकाशन व साहित्य-रंगभूमी प्रतिष्ठान यांनी आकारलेले हे पुस्तक तीन टप्प्यांत विभागले आहे.
पहिल्या टप्प्यात ‘मनोगत’ आणि ‘पुनर्भेटीपूर्वी’ यात रेखा इनामदार-साने यांनी पुस्तकनिर्मितीचा उद्देश आणि त्यामागच्या सिद्धतेच्या सूत्राचा ऊहापोह केला आहे. दुसऱ्या टप्प्यात, ‘तें’च्या समग्र साहित्याचे विषयनिहाय फेरमूल्यांकन करणारे लेख आहेत. तिसऱ्या ‘परिशिष्ट’च्या टप्प्यात तेंडुलकर लिखित चित्रपटांचे दिग्दर्शक श्याम बेनेगल, जब्बार पटेल, अमोल पालेकर, गोविंद निहलानी आणि गिरीश कार्नाड यांच्या मुलाखतींचे किरण यज्ञोपवीत (प्रख्यात लेखक, नट आणि दिग्दर्शक) यांनी शब्दांकन केले आहे.

‘तें’चे समकालीन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाटककार गिरीश कर्नाड यांनी (माजी संचालक-संगीत नाटक अकादमी आणि फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट) ‘उत्तरपक्ष’ या लेखात ‘तें’च्या नाटकांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘तें’च्या नाटकातील स्त्री व्यक्तिरेखांचे ज्येष्ठ कलासमीक्षक शांता गोखले यांनी परखड परीक्षण केले आहे. ‘तेंडुलकर : घराबाहेरच्या जगातले’ या लेखात अपर्णा धारवाडकर (अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील इंग्रजी आणि नाटक व रंगभूमी आंतरविद्याशाखीय विभागातील प्राध्यापक) यांनी समकालीन लेखकांच्या तुलनेत ‘तें’चे साहित्य कसे वेगळेपण सिद्ध करणारे होते, यावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी रामू रामनाथन यांनी तेंडुलकरांच्या नाटकातील हिंसेचा थेट वेध घेतला आहे. प्रा. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी तेंडुलकरांची भाषिते आणि निर्भाषिते यावर प्रकाश टाकला आहे. नाटककार डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी ‘तेंडुलकरांच्या एकांकिका’तील संवाद लेखनाची हुकमत दाखवून दिली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी तथा ‘तें’चे समकालीन लेखक-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी ‘तेंडुलकरांच्या बालनाटिका’ या लेखात आजच्या बदलत्या बालजगतातील गुंतागुंत ही साध्या सोप्या भाषेत हताळणारा, निदान बालनाटिका लिहिणारा पुन्हा ‘तें’सारखा लेखक जन्माला येईल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ‘तें’च्या बालनाटिकांचे केलेले विश्लेषण वाचकांच्या मनाला भिडणारे आहे.

मानसशास्त्राच्या प्राध्यापक तथा संगीत, नृत्य, चित्रपट व नाटक कलांच्या अभ्यासक श्यामला वनारसे आणि भारतीय-विदेश चित्रपटांचे अभ्यासक सतीश जकातदार या ज्येष्ठ द्वयींनी ‘पटकथाकार तेंडुलकर’ उलगडला आहे. किरण यज्ञोपवीत यांनी विविध लेखक आणि दिग्दर्शकांच्या मुलाखतींच्या टिपणावर आधारित ‘तें’चा ‘पटकथेचा पेशा’ नव्याने उजेडात आणला आहे. ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी ‘विजय तेंडुलकरांच्या कादंबऱ्या’ या लेखात मानवी जीवनातील कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर नीतिमूल्यांना ‘तें’नी दिलेले परिमाण समर्पकपणे अधोरेखित केले आहे. प्रा. अविनाश सप्रे यांनी ‘तें’च्या कथांमधील ‘काया, छाया आणि माया यांचा खेळ’ वाचकांच्या मनात आयुष्याची समज कशी वृद्धिंगत करतात, यातील सार्वकालिक आवाहन क्षमतेचे सामर्थ्य आणि सौंदर्य पटवून दिले आहे. लोकप्रिय विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांनी ‘तेंडुलकरांची उघडी मूठ’ या लेखात विविध वर्तमानपत्रांमध्ये ‘तें’नी फसव्या राजकारण्यांचा बुरखा फाडून वाचकांच्या डोळ्यात अंजन घातलेल्या सदरांचा वेध घेतला आहे. डॉ. समीर कुलकर्णी यांनी ‘हे सर्व कोठून येते?’ या पुस्तकावर विश्लेषण केले आहे. त्यात त्यांना टोकदार लेखन करणारा ‘तें’मधला संपादक आढळला, शिवाय प्रयोजनपूर्वक लेखन करूनही निष्कर्षाची जबाबदारी मात्र वाचकांवर सोपविण्याचे ‘तें’ना कसे भान होते, याची चपखल मांडणी केली आहे.

पत्रकार राम जगताप यांनी ‘विजय तेंडुलकरांच्या सामाजिक-राजकीय भूमिका’ या लेखात समाजातील दांभिक घटकांचा जाहीरपणे बुरखा फाडणारे आणि चालू राजकीय घडामोडींवर समाजाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या ‘तें’च्या लेखन प्रपंचाचा आणि टोकाच्या अर्थगर्भ विधानांचा धांडोळा घेतला आहे.

डॉ. शिरीष प्रयाग यांनी ‘तें’ची अखेरच्या आजारपणात शुश्रूषा आणि सर्व काळजी घेतली. पुस्तकाच्या शेवटच्या ‘तट-स्थ’ लेखात ‘तें’ची उतारवयातही असलेली चौकस तर्कशुद्ध बुद्धी याबाबत लिहिताना डॉ. प्रयाग म्हणतात, ‘तेंडुलकरांचं आयुष्य सतत त्यांच्या मागे पळत होतं. कारण तेंडुलकर अनेक अर्थांनी आयुष्याच्या आणि मृत्यूच्यासुद्धा खूप खूप पुढे होते.’
एकूणात ‘तें’च्या समकालीन आणि सर्वकालीन साहित्य रसिकांना निश्चित हे पुस्तक आवडेल. कारण अजून साहित्यरूपाने ‘तें’ अमर असल्यामुळेच ख्यातनाम रंगकर्मी सतीश आळेकर यांनी पुस्तकाला ‘अ-जून तेंडुलकर’ हे समर्पक नाव सुचविले आहे. ‘तें’ची साहित्य संपदा अभ्यासू इच्छिणाऱ्यांच्या ज्ञानात हे पुस्तक निश्चितच भर घालणारे आहे.
(yashwant.pople@gmail.com)

>पुस्तकाचे नाव : अ-जून तेंडुलकर
>संपादक : रेखा इनामदार-साने
>प्रकाशक : राजहंस प्रकाशन,
साहित्य-रंगभूमी प्रतिष्ठान, पुणे
> पृष्ठे : २९२