आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yashwant Pople Article About Citys For People Book

शहर नियोजनाचा प्रेरणादायी जाहीरनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही शहराचा सर्वसमावेशक विकास साधायचा असेल तर दूरदृष्टी महत्त्वाची. त्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असणारे ‘शहर विकास’ आणि ‘शाश्वत विकास’ असे परस्परपूरक दोन्ही घटक महत्त्वाचे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक कीर्तीचे प्रख्यात नगररचना क्षेत्रातील संशोधक यान गेल यांचा मूळ डॅनिश भाषेतील ‘सीटीज फॉर पीपल’ हा ग्रंथ मोलाचा म्हणावा लागेल. गेल्या काही वर्षांत या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
यान गेल हे शहरांच्या गुणवत्ता विकासासाठी काम करणाऱ्या ‘गेल आर्किटेक्ट्स’ या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक आणि जगातील अनेक देशांमधील सुप्रसिद्ध शहरांच्या सुधारणांचे जनक मानले जातात. त्यामुळेच आज वैश्विक स्तरावरील नगररचना क्षेत्रातील वर्तुळात यान गेल यांचे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते.
पुस्तकामध्ये शहरांनी दुर्लक्षिलेली मानवी बाजू, माणसांच्या संवेदना आणि संवादक्षेत्र, सळसळते-सुरक्षित-शाश्वत आणि आरोग्यदायी शहरांच्या नियोजनाचे टप्पे मांडण्यात आले आहेत. सुंदर (प्रमाणबद्ध) शहरे, चालण्यासाठी आणि सायकल चालवण्यासाठी आदर्श शहरे, राहण्यासाठी उत्तम शहरे, भेटीगाठीसाठी शहरांचे महत्त्व नोंदवण्यात आले आहे. अभिव्यक्ती, खेळ आणि व्यायामाच्या पार्श्वभूमीवर शहरांचा संबंध उलगडण्यात आला आहे. त्यासाठी प्रमाणबद्ध आकर्षक जागा, हवामान आणि नजरसुख, सुंदर शहरांचे सुंदर अनुभव व्यक्त झाले आहेत.
आधी लोकजीवन, मग जमीन, शेवटी वास्तू असा नगर नियोजनातील सुज्ञ प्राधान्यक्रम मांडताना ब्राझीलियाच्या प्रभावाचे विवेचन करण्यात आले आहे. शेवटी विकसनशील शहरांसाठी नव्या प्रमाणांची जाण हा ‘एक वैश्विक आरंभबिंदू’ ठरतो आहे, याची सखोल मांडणी करण्यात आली आहे. आदर्श आणि शाश्वत नगर नियोजनातील अशा अानुषंगिक महत्त्वपूर्ण पैलूंवर संशोधनात्मक अंगाने सचित्र प्रकाश टाकण्यात आला आहे. म्हणूनच सर्वार्थाने हा ग्रंथ ‘स्मार्ट सिटी’साठी प्रेरणादायी ठरू शकेल.
‘असावी शहरे आपुली छान...’ हे पुण्याच्या राजहंस प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झालेले सुलक्षणा महाजन यांचे मराठी अनुवादित अप्रतिम पुस्तक अलीकडे देशात आणि महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल. इतक्या प्रवाही सुबोध मराठीत महाजन यांनी अभ्यासपूर्वक अनुवाद केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतल्यानंतर पूर्ण होईपर्यंत अजिबात कंटाळवाणे वाटत नाही. मात्र खरी गरज आहे ती... नगरसेवक, राजकारणी, प्रशासक, वास्तुरचनाकार आणि नगर रचनाकार किंवा या क्षेत्रातील ‘पॉलिसी मेकर्स’ना हे पुस्तक मनावर घेऊन इच्छाशक्तीने वाचण्याची.
भाषांतरामागचा उद्देश स्पष्ट करताना महाजन यांनी केलेले नेमके हेच आवाहन स्वाभाविक आहे.
शहर नियोजन जर चुकीच्या संकल्पनेवर आधारित असेल तर त्याचे काय बरे-वाईट परिणाम होऊ शकतात, याचा जगभरातील गेल्या पन्नास वर्षांचा धावता आढावा घेण्यात आला आहे. प्रामुख्याने जागतिक पातळीवर होणाऱ्या स्थित्यंतराचे भान लेखनामध्ये प्रतिबिंबित झाले आहे. जागतिक कॅनव्हॉस डोळ्यासमोर ठेवून, गत अर्ध शतकात चुकीच्या पद्धतीने झालेल्या शहर नियोजनामुळे कसे बरे-वाईट परिणाम झाले, याचेही पुस्तकात सिंहावलोकन करण्यात आले आहे. शहर नियोजनातील चुकांच्या बाबतीत संशोधन करून त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहर नियोजन करताना होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उचित उपायांचा शोध घेऊन, त्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. किंबहुना या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या संशोधनाचा सोदाहरण आलेख अधोरेखित करण्यात आला आहे.
शहर नियोजनात विकास क्षेत्रांचा विचार करताना विकसनशील देशांतील शहरांमध्ये झालेल्या चुकांचे अनुकरण होत आहे, हे त्यांचे निरीक्षण भारतातील शहरांसाठी महत्त्वाचे म्हणता येईल. कारण ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या न्यायाने आपल्याला आपला मार्ग शोधता येऊ शकेल.
पाश्चिमात्य किंवा विकसनशील देशांमधील शहर नियोजनात झालेल्या चुका टाळता येतील. ‘स्मार्ट सिटी’च्या पार्श्वभूमीवर ‘असावी शहरे आपुली छान...’ या पुस्तकातील विचार, संकल्पना, सिद्धांत आणि संशोधन हे घटक आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतील. भारतातील किंवा राज्यातील शहरांच्या दयनीय स्थिती-गतीमागील कारणांचा शोध घेता येईल. भाषांतरापलीकडे जाऊन आरंभीच सुलक्षणा महाजन यांनी त्यामागची ‘भूमिका’ मांडली आहे, ती खूप महत्त्वाची आहे. त्यात भारतातील किंवा महाराष्ट्रातील शहरांचा घेतलेला चतुरस्र धांडोळा अतिशय वाचनीय आहे.
नाशिकच्या गव्हर्न्मेंट गर्ल्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर महाजन यांनी आर्किटेक्चरमधील मुंबई विद्यापीठाची पदवी घेऊन मिशीगन विद्यापीठात ‘नगर नियोजन’ विषयात संशोधन केले. वास्तुरचनाकार म्हणून भाभा अणू संशोधन केंद्र, घेरझी इस्टर्न प्रा. लि., एपिकॉन्स प्रा. लि. या प्रकल्पांवर काम पाहिले आहे. शिवाय मुंबईतील विविध शिक्षण संस्थांमध्ये त्या अध्यापन करतात. मुंबईच्या ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट येथे गृहबांधणी, वाहतूक, नगर नियोजन, शाश्वत विकास अशा महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांनी संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक तळमळीच्या वाचकाला भावेल, असा विश्वास वाटतो.
— पुस्तकाचे नाव : ‘सीटीज फॉर पीपल’
(असावी शहरे आपुली छान)
— मूळ लेखक : यान गेल
— अनुवादक : सुलक्षणा महाजन
— प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
— पृष्ठे : २६९
— किंमत : १५०० रुपये
yashwant.pople@gmail.com