आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगाभ्यास, पण जरा जपून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयोगशास्त्र हे भारतीय संस्कृतीने विश्वाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक महान देणगी होय. आज पाश्चात्त्य देशसुद्धा आपल्या या शास्त्राच्या प्रेमात पडले आहेत. तसेच आधुनिक शास्त्रानेसुद्धा हे मान्य केलेय की, निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योगाभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे सध्या ज्या प्रकारे झपाट्याने योगाचा प्रचार-प्रसार वर्तमान युगात होतोय तितका तो यापूर्वी कधीही झाला नसावा. याला कारणीभूत म्हणजे लोकांमध्ये आज आपल्या आरोग्याविषयी निर्माण झालेली जागरूकता, दिवसेंदिवस वाढत जाणारे विविध आजारांचे प्रमाण व आवाक्याबाहेर जाणारा औषधोपचारांचा खर्च. त्यामुळे कुठलीही जागरूक व्यक्ती आजारी पडून खर्च करण्यापेक्षा योगाभ्यास करून निरोगी राहायला काय हरकत आहे, असा विचार करू लागली आहे.
अनुकरण नको, व्यक्ती-आजारानुसार आसने असतात व शारीरिक-मनाची शुद्धी आवश्यक :

कुठलेही शास्त्र योग्य गुरू व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकायचे असते; पण फार थोडी मंडळी योगाभ्यास करताना ही बाब लक्षात ठेवतात व जो तो योगाभ्यासाचा एकलव्य व्हायला जातो- कधी टेलिव्हिजन, कधी सीडी, तर कधी कुठलीशी योगाची पुस्तके वाचून! तसेच एखाद्या योगी बाबाचे अनुकरणही करायला जातात व लवकरच घरबसल्या आरोग्याचा काहीतरी ‘चमत्कार’ अनुभवतात आणि कायमस्वरूपी योगाला रामराम ठोकतात!

आपण सर्व जण जाणतो की, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही म्हण केवळ बोलण्यापुरती नसून, वास्तवात प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची, मनाची थोडक्यात प्रकृतीची जडणघडण वेगवेगळी असते. अक्षरश: जुळी भावंडेसुद्धा थोड्याफार फरकाने एकमेकांपेक्षा वेगळी असतात. असे असताना योगाभ्यासाचा एकच नियम अथवा आसन, प्राणायाम हे प्रत्येक व्यक्तीला कसे लागू पडू शकेल? हा साधा आणि सरळ प्रश्न निर्माण होतो. तुम्ही निरोगी आहात तोवर ठीक आहे; पण कुठल्याही स्वरूपाचे दुखणे (शारीरिक वा मानसिक) नाही, अशी व्यक्ती आजच्या घडीला सापडणे दुरापास्त आहे. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या समस्येने त्रस्त आहे. आता हेच बघा की, योगाभ्यास करताना शरीर व मनाची शुद्धी आवश्यक सांगितली आहे. अनियमित जीवनशैली, भोजनाच्या अनियमित वेळा, दैनंदिन जीवनातील ताणतणाव, वाढलेले प्रदूषण, आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाचा घेतलेला ताबा हे सारे बघता शरीर व मनशुद्धी म्हणजे काय? ती कुठे मिळते? असा प्रश्न नवीन पिढीने विचारल्यास आश्चर्य वाटू नये.

वैद्यकीय स्वरूपातून करा योगोपचार :
आज बर्‍याच ठिकाणी योगोपचार हा वैद्यकीय स्वरूपातून करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे सरकारने या क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शासकीय स्तरावर विविध योजना राबवून व प्रत्येक शाळेत योगशिक्षकाची नियुक्ती सक्तीची करून बालपणापासूनच मुलांना योगाची गोडी लावणे गरजेचे आहे. योगशिक्षक, वैद्यकीय व्यावसायिक व सर्वसामान्य जनता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रयत्न झाल्यास निश्चितच सर्वांना आरोग्यरूपी धनसंपदा प्राप्त होईल, यात तिळमात्र शंका नाही.

योगाभ्यास हा तज्ज्ञ व्यक्तींच्या निगराणीखाली आवश्यक
तज्ज्ञाच्या निगराणीखाली ते हवे. आपल्याला कुठल्याही स्वरूपाची आरोग्याची तक्रार असेल, तर त्याचे सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांकडून निदान करून घेऊन त्याची स्पष्ट कल्पना योगशिक्षकाला देणे आवश्यक आहे. याशिवाय आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व योगशिक्षकांनी सांगितलेलाच योगाभ्यास करणे आवश्यक आहे. मी सर्वच प्रकारचा योगाभ्यास करेन, असा अट्टहास आरोग्याला हानिकारक ठरतो.

समजून घ्या योगोपचारातील धोके
आता योगोपचारातील धोकेही समजून घेणे आवश्यक आहे. मुळात योगोपचार अथवा योगाभ्यास व त्याचे धोके अथवा तोटे असा विचारही सर्वसामान्यपणे केला जात नाही; परंतु वैद्यकीय मार्गदर्शन न घेता, कुठल्याही तज्ज्ञाकडे न शिकता, आपल्या व्याधीचे योग्य निदान झालेले नसताना, कुठल्या तरी टीव्ही चॅनलवरील योगाशी संबंधित कार्यक्रम बघून अथवा 2-3 दिवसांच्या ‘भव्य’ योग शिबिरात हजारोंच्या उपस्थितीत आपली उपस्थिती लावून, स्टेजवर विराजमान झालेल्या, विविध आसने करून दाखवणार्‍या योगी-तपस्वी माणसाचे (ज्याला कोणा व्यक्तीला काय आजार आहे, हे दूरदूरपर्यंत ठाऊक असण्याची सुतराम शक्यता नाही) अनुकरण करणे कितपत संयुक्तिक आहे, हे समजदार माणसाला सांगण्याची गरज नाही. तरीही अशी योगाभ्यास शिकवणारी शिबिरे आपल्याकडे हाऊसफुल्ल चालतात. जिथे तिकीट जास्त तिथे तर अजून भारी काम! एकच योगी! साधक हजारो! योगगुरू स्टेजवर! जनता जनार्दन खाली हिरव्या मॅटवर! गुरुजी एक साधक अनेक! गुरुजी एकाच वेळी अनेक पडद्यांवर अवतीर्ण होऊन विविध आसने करवून घेतात व महिने-वर्ष लागूनही परिपूर्णता न येणारा साधक चुटकीसरशी 4 ते 5 दिवसांत योगाभ्यास शिकून घेतात. शिबिराच्या शेवटच्या दिवशी बर्‍याच साधकांना आपले आजार अचानक बरे झाल्याचा ‘दिव्य अनुभव’ येतो. मग जाता जाता योगगुरू आपले विविध स्वरूपातील ज्ञान पुस्तके, सीडी, डीव्हीडीच्या रूपात आपल्या विक्री केंद्रांवर उपलब्ध करून देतात. एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर आयुर्वेदशास्त्रावरही आपलाच कॉपीराइट आहे हे वारंवार भाषणात पटवून देऊन आयुर्वेदिक (स्वनिर्मित) प्रॉडक्टही लोकांच्या माथी मारायला विसरत नाहीत आणि या महाशयांकडे कुठल्याही स्वरूपाची आयुर्वेदशास्त्राची शैक्षणिक पदवी नसते; पण यांचा आव असा असतो की, आयुर्वेदाची निर्मिती यांनीच केलीय!

व्याधी, विकार याचा विचार करावा
एखाद्या व्याधीचे निदान झाल्यावर रुग्णाला औषधांची आवश्यकता किती व कशी, हे सर्वप्रथम अतिमहत्त्वाचे ठरते. उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब व हायपोथायरॉयडिझम यासारख्या व्याधीत औषधी अपरिहार्य आहेत, हे रुग्णाला वारंवार सांगावे लागते. या व इतर अनेक व्याधीत केवळ औषधे नको म्हणून योगोपचाराकडे वळणे अत्यंत धोक्याचे असल्याचे रुग्णाला समजावून सांगणे, हे योगोपचारतज्ज्ञाचे प्रथम कर्तव्य आहे. तसेच अगदी याप्रमाणे निद्रानाश, अस्वस्थपणा, पचनाचे विकार, आम्लपित्त, मलावष्टंभ व त्यातून उत्पन्न होणार्‍या आरोग्याच्या विविध जटिल समस्या, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी यासारख्या व्याधींची चिकित्सा करताना डॉक्टरांनी रुग्णाला औषधोपचारांना योगोपचाराची जोड देण्याविषयी आग्रही असले पाहिजे, जेणेकरून रुग्ण लवकर व पूर्णपणे बरा होईल. त्याचप्रमाणे मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यांसारखे दुखणे वयानुरूप व कामाच्या स्वरूपानुसार होणारे त्रास योगोपचाराने नक्की टाळता येतात. निरंतर दुचाकी अथवा चारचाकीचा प्रवास व कॉम्प्युटरवर दीर्घकाळापर्यंत काम करण्यामुळे होणार्‍या मानदुखी, कंबरदुखी या दुखण्यांसाठी वेळीच योगोपचार शिकून घेणे केव्हाही फायदेशीर आहे.

निदानानंतर उपचार व कालावधी ठरतो
योगोपचाराच्या प्रक्रियेत निदानानंतर रुग्णाशी संवाद साधून उपचार ठरवले जातात. तसेच त्याचा कालावधी ठरवला जातो आणि ठरावीक कालावधीनंतर रुग्णाची पुनर्तपासणी, चाचणी आवश्यक असते; मात्र त्यात रुग्णाचे सहकार्य, त्याची योगोपचार समजून घेण्याची इच्छा, योगाभ्यास व उपचारातील सातत्य, दैनंदिन जीवनात शरीर-मन-बुद्धीचे ठेवलेले भान फार महत्त्वाचे ठरते. कारण, बरेच जण या प्रक्रियेत केवळ आरंभशूरच ठरतात.

व्यावसायिक स्वरूप
वरील वर्णन करण्याचे प्रयोजन एवढेच की, यातून आलेले अनुभव जनमानसात योग व आयुर्वेदाची प्रतिमा खराब करण्यास कारणीभूत ठरतात. दुर्दैवाने आपण आपल्या महानतम योगशास्त्राला वेठीस धरत आहोत व आज ज्याची खर्‍या अर्थाने समाजाच्या आरोग्याला वैद्यकीय दृष्टिकोनातून गरज आहे, त्याला निव्वळ व्यवसायाचे स्वरूप आलेले आहे.