आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाने तारले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन 2002 मध्ये एका अपघातात पाठीच्या मणक्यांना इजा झाली. शेवटचे तीन मणके दबले गेले, त्यामुळे हालचालच बंद झाली. उपचार सुरू झाले. ट्रॅक्शन आणि औषधोपचार. डॉक्टरांनी संपूर्ण बेडरेस्ट सांगितले. दुखणं अशा ठिकाणी होतं की जिथे प्लास्टरही करता येत नव्हतं. पेनकिलर आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचा मारा सुरू होता. ऑपरेशन केले आणि बरे झाले नाही तर कमरेखालचा भाग कायमचे लुळे पडण्याचीही शक्यता होती.

आठ नऊ महिने झाले. वेदना कमी होत नव्हत्या. 24 तास झोपूनच. शरीर थोडं हललं तरी जीवघेण्या वेदना. औषधे घेऊन घेऊन साइड इफेक्टस होऊ लागले. पचनशक्ती मंदावली. अ‍ॅसिडिटीचाही त्रास. घरात दोन लहान मुलं आणि मी अशी अंथरुणाला खिळलेली. झोपून झोपून सांध्याच्या विकाराने डोके वर काढले. आर्थिक ताण सोसणे कठीण होत होते. घरात उदासीनता भरून राहिलेली. पुढे जगावं अशी ऊर्मीच राहिली नाही. छोटा हॉल. समोर टीव्ही. जागी असायचे तेव्हा टीव्ही पाहायचे. टीव्ही बंद तेव्हा झोपलेली असायचे. टीव्ही हाच विरंगुळा झाला होता. चॅनल्स बदलताना संस्कार चॅनलवर एक साधू आजारांवर उपचार सांगत असल्याचे पाहिले. ते रामदेव बाबा होते हे तेव्हा माहीत नव्हते. दहा पंधरा मिनिटे संस्कार चॅनल पाहिले. त्यानंतर सात आठ दिवसांनी योगायोगाने त्याच चॅनलवर पाठीच्या मणक्याचे आजार या विषयावर रामदेवबाबा माहिती देत होते. तेथून माझ्या जीवनाला जणू कलाटणीच मिळाली.

मणक्यांच्या आजारावरील पथ्ये, औषधे आणि योगासने यांची सविस्तर माहिती स्वामीजींनी दिली. आयुष्याला कंटाळलेल्या मला एक मार्ग मिळाला. झोपल्या झोपल्या दिवसातून तीन चार वेळा भस्रिका प्राणायाम आणि अनुलोम विलोम करू लागले. पंधरा दिवसांनी अंगात थोडा त्राण आल्यासारखे वाटले आणि मी कुणाचाही आधार न घेता उठून बसले. यामुळे योगावर माझी श्रद्धा वाढली. भावाच्या मदतीने योगाची पुस्तके मागवली. औषधांसोबतच योग प्राणायाम सुरूच होता. योग करायला लागून एक महिन्याने बाथरूमपर्यंत कोणाचाही आधार न घेता जाऊ लागले. भुजंगासन, मकरासन आणि शलभासन तसेच प्राणायाम यामुळे खूप फरक जाणवू लागला. फिजिओथेरपीप्रमाणे योग करू शकता, असे डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू औषधे थांबवली. झोप येण्यासाठी घ्याव्या लागणार्‍या गोळ्याही थांबवल्या. नियमित योग सुरूच होता. सहा महिन्यानंतर एक्स रे काढला. आता सर्व काही ठीक झाले होते. ट्रॅक्शन लावणेही बंद झाले. घरातली उदासीनता कुठल्या कुठे गेली. माझा जणू पुनर्जन्मच झाला होता. योगामुळे मला पुढचे आयुष्य बोनस मिळाले होते. त्यामुळे पुढील आयुष्य योगाच्या प्रसारात घालवण्याचे ठरवले.

2005 मध्ये हरिद्वार येथे 11 दिवसांचे योग प्रशिक्षण शिबिर केले. त्यानंतर सोलापुरात योग शिबिरे घेऊ लागले. तालुके, मोठी गावं अशा सर्व ठिकाणी मिळून आतापर्यंत सुमारे 400 योग शिबिरे घेतली. या माध्यमातून सुमारे अडीच लाख लोकांना योगासने शिकवली. योग प्रसार करणे हे माझ्या जीवनाचे ध्येयच बनून गेले. आज मी पतंजली योग समितीच्या माध्यमातून दक्षिण भारताची महिला केंद्रिय प्रभारी म्हणून काम करतेय. केवळ औषधाने निरोगी राहता येत नाही त्यासाठी आपल्या दिनचर्येत योगासने प्राणायाम याचा समावेश केला पाहिजे, हा संदेश मी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय. मला झालेला अपघात हा ईश्वरी संकेतच असावा, असे मला आज मनापासून वाटते.
शब्दांकन : सिद्धाराम भै. पाटील