आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी शोधताय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी मिळवून देण्याचा ऑनलाइन धंदा सध्या खूप तेजीत आहे. फसवणूक झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या चकरा मारण्यापेक्षा वेळीच सावध झालेलं केव्हाही चांगलं.
‘जगातील विख्यात उद्योगसमूहात विविध पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ऑनलाइन पाहणीतून तुम्ही शॉर्टलिस्ट झाला आहात. तुमची मुलाखत हैद्राबाद येथे होणार असून त्यासाठी येण्या-जाण्याचे विमानभाडे कंपनी तुम्हाला देणार आहे. यासाठी अनामत रक्कम म्हणून १०,००० रुपये विशिष्ट बँक खात्यात तातडीने भरा.’ अशा आशयाचे ईमेल आल्यास हुरळून जाऊ नका. कारण, ही चक्क फसवणूक आहे. आजकाल बऱ्याच तरुणांना असे ईमेल येतात. कोणत्याही कंपनीत अर्ज न करताच बड्या समूहाच्या नावाने बनावट ईमेल पाठविण्यात येतात. यामध्ये या समूहासह त्यातील विविध कंपन्यांच्या माहितीचा; तसेच त्यामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांच्या माहितीचा समावेश असतो. या पदांमध्ये इंजिनिअर, दंतवैद्यक, वैद्यकीय अधिकारी, पायलट, फॅशन डिझायनर, मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह आदी पदांचा समावेश आहे. ईमेलसोबत ऑफर लेटरही येतं. आमच्या कंपनीतर्फे वार्षिक ऑनलाइन पाहणीतून तुमच्या अर्जाची निवड झाली आहे, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, विशिष्ट प्रकल्पांसाठी तुम्ही केलेले काम या आधारे तुमची थेट मुलाखतीसाठी निवड झाली आहे, तुम्हाला सुमारे ५० हजार रुपयांपासून पुढे वेतन दिले जाईल,’ अशा माहितीचा या ईमेलमध्ये समावेश असतो. गोम आहे, मुलाखतीसाठी १०,००० रुपये अनामत रक्कम भरण्यात. ‘बोगस उमेदवार टाळण्यासाठी कंपनीच्या धोरणानुसार हे पैसे घेण्यात येतील; तसेच मुलाखत झाल्यानंतर बँकेत पैसे भरल्याचे चलन दाखविल्यानंतर उमेदवारांना हे पैसे परत देण्यात येतील. उमेदवाराची नोकरीसाठी निवड न झाल्यासही हे पैसे परत मिळतील,’ हा फसवणुकीचाच भाग. तरुणांना नोकऱ्या देण्याचं आमिष दाखवून लुबाडणाऱ्या भामट्यांनी नवीन कल्पना शोधून काढली आहे. बेकायदा कॉल सेंटरच ते सुरू करतात. त्यात काही तरुण मुले नोकरीला ठेवतात. नोकरीला ठेवलेल्या त्या सर्वांचं एकच काम, फोन करायचे, ईमेल्स पाठवायच्या आणि बेरोजगार तरुणांना फसवायचं. असं काम करणाऱ्या भामट्यांच्या अनेक टोळ्या आहेत, हे धक्कादायक वास्तव अलीकडेच सायबर पोलिसांच्या समोर आलंय. या बनावट आॅफिसातले कर्मचारी मोबाइल व संगणक वापरून सोशल मीडिया, तसेच नोकऱ्या देणाऱ्या वेबसाईटवरून माहिती शोधतात. तिथून देशभरातल्या बेरोजगार तरुणांचे मोबाइल नंबर, ईमेल अॅड्रेस त्यांना मिळतात. आणि मग ते या मुलांना फसविण्याचे प्रकार करतात.

ऑफरलेटर ते लेटरहेडवर पाठवतात. कंपनीचा लोगो असतो. खाली कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्याची खरी वाटेल अशी सही असते. त्यामुळे हुशार लोकांचाही त्यावर विश्वास बसतो. ते ईमेलवर संपर्क साधतात. त्यानंतर मेडिकल टेस्ट करावी लागेल, मुलाखतीसाठी डिपाॅझिट भरावे लागेल, तुमचा पासपोर्ट काढून घ्यावा लागेल, अशी काहीही कारणं सांगून पैसे उकळायला सुरुवात करतात. पैसे भरण्यासाठी बँक खात्याचे तपशील दिले जातात. पैसे भरल्यावरच पुढली प्रक्रिया पूर्ण होईल, असं सांगून रक्कम उकळली जाते आणि मग संपर्क तोडून टाकतात. ईमेल येणं बंद होतं. फोन नंबर बंद होतात. तेव्हा कुठं संबंधित तरुणाला फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. दोघांमधला संवाद ईमेल किंवा फोनवर झालेला असतो, त्यामुळे त्या भामट्या टोळीला फसवणूक झाल्यानंतर शोधून काढणे अशक्य असते. लाखो तरुणांना फसवण्याचा हा धंदा तेजीत आहे. पुढल्या वेळी जरा सांभाळून, असं म्हणत दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीचा फायदा भामटे उचलतात.
क्रमश:
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर
टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
बातम्या आणखी आहेत...