केंद्र सरकारच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे हजार, पाचशेच्या नोटा निरुपयोगी झाल्या असून सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांनी कॅशलेस व्यवहारावर भर दिलेला आहे. कॅशलेस व्यवहार हे प्लास्टिक मनी वापरून करता येतात. हे प्लास्टिक मनीचे आपण समजून घेऊ या. खरेदी करताना पैसे चुकते करण्यासाठी रोख पैसे भरण्याऐवजी वापरा प्लास्टिक मनी.
प्लास्टिक मनी वा
कार्डचे तीन मुख्य प्रकार आहेत-
- Credit Card, ATM Card आणि
- Debit Card
उपयोग :रक्कम काढण्याकरिता तसेच खरेदी करण्यासाठी या कार्डचा वापर केला जातो. रोख रक्कम बाळगण्याची गरज नसते. एटीएम-डेबिट कार्डधारकांनी बँक खात्यामध्ये ठरावीक रकमेची शिल्लक कायम स्वरूपात ठेवायला हवी. ही रक्कम किती, याबद्दल प्रत्येक बँकेचे वेगवेगळे निकष असतात. ही रक्कम ठेवली नाही तर दंड म्हणून काही रक्कम नंतर खात्यातून वसूल केली जाते.
कार्डचे स्वरूप : कार्डवर धारकाचे नाव, १६ अंकी कार्ड क्रमांक, मुदत, CVV सिक्युरिटी कोड, मॅग्नेटिक बँड/ Strip असते. कार्डच्या मॅग्नेटिक पट्टीवर चरा पडू नये म्हणून ते त्याच आकाराच्या प्लास्टिक किंवा कागदी पाकिटात ठेवावे.
कार्ड कंपन्या : व्हिसा आणि मास्टरकार्ड या दोन मुख्य आणि जागतिक स्तरावरील कंपन्या आहेत, तसेच रूपे ही भारतीय कंपनी आहे. कार्डच्या मुदतीची तारीख कार्डवर दिलेली असते. मुदत संपली की कार्डचे नूतनीकरण करून घ्यावे लागते.
- व्हिसा आणि मास्टरकार्डचा वापर देशांतर्गत व देशाबाहेर करू शकतो. रूपे कार्ड भारतात वापरता येते.
- नवीन कार्ड व रिन्युवल कार्डसाठी कार्डची ठरावीक किंमत दरवर्षी मोजावी लागते. बँक खात्यातून ती कापून घेतली जाते. वार्षिक शुल्काचे साधारण ४००, ५०० वा १००० रुपये भरावे लागतात.
- कार्ड स्वाइप केल्यावर नंतर पिन टाकावा लागतो.
- डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यातील फरक म्हणजे डेबिट कार्ड वापरल्यावर डिपॉझिट अकाउंटमधून पैसे लगेच वळते होतात, तर क्रेडिट कार्डावर पैसे क्रेडिटवर वापरता येतात. एटीएम/ डेबिट कार्ड खरेदीसाठी वापरताक्षणी तेवढी रक्कम खात्यातून काढली जाते. परंतु क्रेडिट कार्ड वापरल्यास ५० दिवसांनंतर ते पैसे खात्यातून काढले जातात.
एटीएम व डेबिट कार्ड : एटीएम कार्डचा वापर एटीएम सुविधा असलेल्या ठिकाणी पैसे काढण्यासाठीच होतो. पण डेबिट कार्डधारकाला डेबिट कार्ड स्वाइप करून किंवा कार्डाचा तपशील ऑनलाइन भरून खरेदी करता येते.
कार्डचे फायदे :
-पाहिजे तेव्हा पैसे काढता येतात.
-मोबाइल रिचार्ज करता येतो.
-विविध बिले भरता येतात.
-खरेदी करता येते
-हे कार्ड वापरून ऑनलाइन खरेदी करता येते आणि सिनेमा, विमान, रेल्वेची तिकिटेही काढता येतात.
-कार्डच्या साहाय्याने विम्याचे हप्ते भरता येतात
-कार्ड वापरून मोबाइल, फोन, डीटीएच, वीज अशा वेगवेगळ्या बिलांचे ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीत कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.)
handgeyogesh@gmail.com
योगेश हांडे, पुणे