आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅकिंगपासून सावध कसे राहाल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचार करा, एअर इंडिया किंवा इंडियन रेल्वेची वेबसाइट हॅक झाली तर? सगळ्या क्रेडिट व डेबिट कार्डचे तपशील, वैयक्तिक माहिती इ.वर सायबर दहशतवाद्यांचा ताबा जाईल. कधी बँकिंग क्षेत्रात असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील. हल्लीचे जग इंटरनेटवर फार अवलंबून आहे, बरेचसे महत्त्वाचे व्यवहार इंटरनेटवर होतात. म्हणून हे व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. कारण रक्तपात न करता गुन्हेगारी वाढली आहे. अनेक अतिरेक्यांकडून संगणकाचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध सायबर विश्वात लढले जाईल, अशी शक्यता आहे. सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. चीनकडून हॅकिंग होण्याची प्रचंड भीती अमेरिकेला वाटत असते. भारतातही अनेक वेबसाइट हॅक झाल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतच असतो.

स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करून उघडण्याचा प्रयत्न करू नये. अशा मेलमधून व्हायरसची एक्झिक्युटेबल फाइल आपल्या नकळत डाउनलोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लिकेट फाइल तयार होऊन ती हार्ड डिस्कवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेलद्वारे प्राप्त होते. त्यामुळे फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डिलिट करावे. आपली संगणक सिस्टिम अँटीव्हायरस साॅफ्टवेअर, फायरवॉल वापरून सुरक्षित ठेवावी.

सायबर महायुद्धावर प्रतिबंध
नेट बँकिंग अकाउंट वापरताना आपला आयडी, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पासवर्ड टाइप करताना सावधानता बाळगावी. ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत. शक्यतो संरक्षित संगणकावरूनच नेटबँकिंग व्यवहार करावेत. सायबर कॅफेत असे व्यवहार करणे धोकादायक ठरू शकते.

वायफायचा पासवर्ड
घरच्या वायफाय कनेक्शनबाबतदेखील सुरक्षित वापर आवश्यक आहे. वायफायला कायम पासवर्डचे संरक्षण असले पाहिजे. हा पासवर्ड अनोळखी व्यक्तींना कधीही देऊ नये. अनेक गुन्हेगार पासवर्डविना असलेल्या वायफायच्या साह्याने इंटरनेटचा वापर करतात.

सायबर गुन्हेगार कसे शोधतात?
फ्रॉड मेल, धमकी देणारे मेल, किडनॅपिंग, फिशिंग, पोर्नोग्राफी आदी सायबर गुन्हे व गुन्हेगार शोधण्यासाठी वापरात आलेल्या संगणक किंवा मेलवरून गुन्हेगाराचा आयपी अॅड्रेस (इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस) शोधला जातो. असा मेल कोणत्या सर्व्हरवरून आला, हे शोधले जाते. आयपी अॅड्रेसवरून वापरण्यात आलेला संगणक, त्याचा प्रकार, इंटरनेट स्पीड, सर्व्हरचे लोकेशन व सदरचा मेल कोठून आला, हे उघड करून गुन्हेगाराला शोधता येते.

योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...