आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुला आपोआप कळेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोजागिरीच्या खिडकीतून रात्रीच्या वेळी लांबवर जळणारी एक ज्योत दिसत असे. त्याभोवती जमणारे धुराचे काळे काळे ढग वातावरण स्वच्छ असेल तर स्पष्ट दिसत असत. ‘धूर सोडणारा राक्षस’ असे लहानपणी तिने त्याला नाव दिले होते. ‘बाबा, हे काय आहे?’ एक दिवस तिने विचारले. ‘तिथे की नाही, राष्‍ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीचे आवार आहे. खतं तयार करण्याची जागा. दूर रिफायनरी आहेत. नको असलेल्या गोष्टी जळताना त्या धुरांड्यातून धूर आणि ज्योत दिसते.’ राष्‍ट्रीय खत तयार करणारा धुरांड्याचा राक्षस अशी ओळख थोड्या दिवसांनी झाली. ‘बाबा, हा धूर आपल्यासाठी वाईट असतो ना?’ कोजागिरीने काही दिवसांनी विचारले होते. ‘त्यामुळे वातावरण दूषित होते. म्हणून अशी धूर ओकणारी यंत्रणा उंच आकाशात असते,’ बाबा समजावून देत होता.


‘बाबा, तुमच्या लोकविज्ञान संघटनेत अशा धुराविरुद्ध मोहीम काढली होती ना. तुमच्या त्या प्रदर्शनात वातावरण शुद्ध ठेवण्यासाठीची चित्रं होती. मला आठवतेय.’ कोजागिरी अभ्यासाचा धडा समोर ठेवून बडबडत होती. बाबा बाजूला पेपर वाचत बसला होता. शांता आतल्या खोलीत गाणी ऐकत पडली होती. संवाद कानावर येत होते.


‘बाबा, तुझ्या सिगारेटमधून जो धूर निघतो तो पण त्रासदायक असतो का?’ सहा वर्षांच्या कोजागिरीने विचारले होते. बाबा हो म्हणाला होता. ‘मग तरीही तू सिगारेट का ओढतोस?’ मोठी होताना तिने पाठपुरावा चालू ठेवला होता.
‘सवय लागली म्हणून. सिगारेट ओढल्यावर बरे वाटते म्हणून.’


‘पण त्या धुराने तुला आणि इतरांना त्रास होतोय, हे माहीत असूनही बरे वाटते का?’ कोजागिरी म्हणाली.
‘त्याचे काय आहे, काही सवयी अपायकारक आहेत हे माहीत असूनही त्या काढणे अवघड असते. ही त्यापैकी एक. ही सवय वाईट असूनही जात नाही,’ बाबा प्रामाणिकपणे बोलत होता.


‘अजिबात सिगारेट ओढायची नाही. मी सांगते म्हणून,’ असे म्हणत दहा-बारा वर्षांची कोजागिरी एक दिवस बाबावर कडाडली होती. तिच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात तर बाबाला हार मानावी लागली होती. आता हे फार झाले असे बाबाला वाटले होते. बाबाने सिगारेट काढली की कोजागिरी दुर्गामातेचा अवतार धारण करत होती. शेवटी घरात सिगारेट न ओढण्याइतपत बाबाने माघार घेतली होती.


मधूनमधून ती बाबाची आॅफिस बॅग धुंडाळून सिगारेट पॅकेट सापडले तर सरळ फेकून देत होती. बाबाच्या हे कित्येक वेळा लक्षात येत नव्हते. सिगारेट सोडण्याची मोहीम मधूनमधून डोके वर काढायची. कोजागिरीचा बाबाबरोबर वादही व्हायचा. एकदा वैतागून कोजागिरी म्हणाली, ‘आई, सुरुवातीपासून तू बाबाचे फार लाड केले आहेस. त्याने तो असा बिघडला आहे.’ बारा वर्षांच्या कोजागिरीकडे शांता बघत राहिली.


सुरुवातीपासून म्हणजे कधीपासून? शांताची ओळख होण्याआधीपासून ही सवय होती. असे काही गमतीशीर विचार शांताच्या मनात आले. शांताला तिचे लहानपण आठवले. तिचे बाबा सिनेमा बघून आल्यावर कपड्यांना सिगारेटचा वास येतो म्हणून शर्ट-पायजमा धुवायला टाकत असत. तिच्या वाढीमध्ये सिगारेट ओढणे ही वाईट सवय आहे असे माहीत होते. तिचे लग्न झाल्यावरचे दिवस आठवले. या सवयीबाबत झालेले संवाद, वाद आठवले. एकदा शांताचे सासरचे नातेवाईक म्हणाले होते, ‘तुझ्याशी लग्न झाल्यावर याची सिगारेटची सवय जाईल असे वाटले होते. तू काय करतेस?’ शांता विचार करत राहिली होती, पुरुष स्वत:च्या पत्नीपेक्षा वयाने मोठे असतात. त्यामुळे अनुभवानेही मोठे. तरी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी तिची कशी? असे विचार बाजूला ठेवत तिने प्रेमाने, आर्जव, अटी-तटी असे अनेक प्रकारे प्रयत्न केले होते. शेवटी माणूस जसा असतो तसा स्वीकारावा लागतो. बदल घडणे अवघड असते हे समजायला शांताला सहजीवनातील बरीच वळणे पार करावी लागली होती. हे सर्व कोजागिरीला या वयात सांगणे कठीण होते. शांता कोजागिरीला समजावत म्हणाली, ‘हे बघ, तू म्हणतेस त्यात चुकीचे काही नाही. सिगारेट ओढणे स्वत:साठी आणि इतरांसाठी हानिकारक आहे. ही बाबाची सवय नक्की वाईटच आहे. बाबाही ते मान्य करतो. प्रयत्न जरूर कर. पण तुझ्या प्रयत्नांत बाबाबद्दल असलेला आदर कमी होऊ देऊ नकोस. त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घे. बाबा आपला आहे. मी असे का म्हणते आणि बाबाचे मी लाड केले किंवा कसे हे सर्व तुला थोडे मोठे झाल्यावर आपोआप कळेल.’


आईचे ‘तुला थोडे मोठे झाल्यावर आपोआप कळेल’ हे शब्द कोजागिरीला मोठे होताना वेगवेगळ्या वळणांवर भेटत राहिले. कधी व्यसनमुक्तीवर काम करणा-या संस्थेच्या भेटीत तेथील व्यक्तीशी संवाद साधताना, कधी या विषयावरचे पोस्टर तयार करताना आणि कधी जवळच्या मित्र-मैत्रिणींची व्यसनं समजून घेताना. सर्व गोष्टी करून पाहाव्यात अशा विचाराच्या अमलाखाली तारुण्यात एखादा सिगारेटचा झुरका घेताना, नुसते शब्दच नाही, तर आईचा चेहराच समोर ठाकला होता!


aruna.burte@gmail.com