आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहास्य तुझे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हास्य हा स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वामधला एक अविभाज्य भाग आहे. हसणे हे अनेक प्रकारचे असू शकते. अगदी किंचितशा स्माइलपासून खळाखळा हसण्यापर्यंत. तुमच्या हास्यशैलीवरून अनेकदा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक सहज अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. कोणत्याही प्रसंगात हसणे म्हणजे त्या प्रसंगाला तुमच्याकडून येणारी दाद समजली जाते, तो तुमचा रिस्पॉन्स असतो. कायम एकाच पद्धतीने हसणे केव्हाही गैर असते. तुम्हाला प्रसंगानुरूप तुमच्या हास्यशैलीत बदल करावा लागतो.


तुम्ही समजा एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगला आहात व तिथे एखादा विनोदी प्रसंग घडला किंवा विनोद झाला, तरी तिथे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही प्रचंड जोरात किंवा खळखळून हसणे हे गैर मानले जाते. ते मॅनर्स किंवा एटिकेट्सच्या दृष्टीने अयोग्य असते; पण तुम्ही मित्रमैत्रिणींच्या सहवासात वा एखाद्या हॉलिडे रिसॉर्टवर कुटुंबासमवेत असाल तर तिथे याच प्रसंगाला मात्र खळखळून हास्याची दाद द्यायलाच हवी, तिथे तुमची कॉर्पोरेट मॅनरिझम सोडावीच लागतात. काळवेळ पाहून कायम असा समन्वय सांभाळणे हे तुमच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.


काही स्त्रिया हसताना कायम असं चारचौघात कसं बरं हसायचं, असं स्वत:च समजून हसणे टाळतात; किंवा मनमोकळं हसण्याऐवजी किंचितस हसून वेळ मारून नेतात पण हसण्याने तुमचे सौंदर्य कायम खुलून दिसते. कपाळावर आठ्या असणारी, कायम तणावात असलेली स्त्री कितीही सुंदर असली तरी कुरूपच दिसते. याउलट एखादी सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व असलेली स्त्री तिच्या मोहक हास्याने इतरांचे मन जिंकून घेते.


मात्र, हसण्यात समन्वय ठेवावा लागतो. ऊठसूट हसणे अनेकदा गैरसमज निर्माण करणारे असते. तुम्ही लहानसहान गोष्टींमध्येही सतत जोरजोरात हसत असाल तर तुम्हाला अक्कल कमी आहे किंवा तुम्ही उथळ आहात, असा समज होतो. धीरगंभीरपणाच्या बरोबरीने तुमच्याकडे किंचित हास्याची बाजू असेल तर तुम्ही लोकप्रिय होता, इतर तुम्हाला त्यांच्यात सहजासहजी सामावून घेऊ शकतात. तुमचे एक मोहक हास्य अनेक समस्यांना परस्पर संपवणारे, तुमचा ताण हलके करणारे आणि इतरांनाही उत्साहित करणारे असायला हवे.


हास्य म्हणजे तुमचा एक दागिनाच असतो. तो काळवेळ पाहून परिधान करावा. काही स्त्रियांना एखाद्या व्यक्तीची पाठ फिरताक्षणी एकमेकींकडे पाहून हसण्याची एक अतिशय वाईट सवय असते, ज्याच्यामुळे गैरसमज होतात व तुम्ही चेष्टेखोर आहात असा समज होतो. हसण्याचे स्मितहास्यापासून खदाखदा हसण्याचे अनेक प्रकार आहेत हे सर्वप्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे, व त्यांचा वापर हा नेहमीच समन्वयाने करावा लागतो.

(क्रमश:)