आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडीवूडचे स्टार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मे रे पास गाडी है, बंगला है, पैसा है। तुम्हारे पास क्या है?’ कमरेत वाकून एक हात पुढे करून हा डायलॉग फेमस करणा-या अमिताभ बच्चन यांनी भारतीय मनावर इतकी छाप सोडली आहे की, झाडीपट्टी नाटकांतही एक कलाकार ‘झाडीपट्टीतला अमिताभ बच्चन’ या उपाधीने ओळखला जातो. अमिताभच्या गावपातळीवरच्या अनेक डुप्लिकेट्सप्रमाणे हेही प्रकरण असणार, असे क्षणभर वाटते खरे; मात्र प्रभाकर आंबोणे ना अंगकाठीने अमिताभसारखे लंबूटांग होते, ना त्याच्यासारखे दिसत होते. ‘अहो, तुम्ही तर अमिताभसारखी दाढीपण ठेवत नाही, मग तुम्हाला झाडीपट्टीचा अमिताभ बच्चन का म्हणतात?’ या प्रश्नावर येणारे खो खो हसू दाबत प्रभाकर आंबोणे सांगू लागले, ‘अमिताभ लोकप्रिय आहे; कारण तो नायक, खलनायक, विनोदी, चरित्र अशा कोणत्याही प्रकारच्या भूमिका अगदी लीलया करतो. माझ्या बाबतीत झाडीपट्टीतल्या प्रेक्षकांना नेमका हाच अनुभव येतो. म्हणूनच ते प्रेमाने मला अमिताभ म्हणतात.’


झाडीपट्टीतली नाटके आणि त्यात काम करणारे कलाकार यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता नेमक्या याच अनोख्या प्रसंगामुळे दुणावली. संगीत सौभद्र, एकच प्याला, सिंहाचा छावा अशी माझ्या पिढीने केवळ ऐकलेली जुनी नाटके आजही विदर्भातल्या जंगलात साकारली जातात. तरीही या परिचित नाटकांची पोस्टर्स मात्र अपरिचित आणि गमतीशीर असतात. अखंड रडणारी एखादी स्त्री कलाकार, लहान बाळ, खलनायकाचे दुष्ट डोळे, भरजरी कपडे अशा फोटोंनी भरलेल्या नाटकाच्या पोस्टरवरील सर्व कलाकार शहरी डोळ्यांना अनोळखी असतात. अनेकदा तर पोस्टर तेच असते, मात्र नाटकांची नावे बदललेली असतात.


असेच एक नव्या नाटकाचे पोस्टर पाहण्याचा योग आला. ‘विझली ज्योत मातृत्वाची!’... ग्रामीण प्रेक्षकांना खेचणारे आकर्षक आणि दर्दभरे नाव. व्वा! नाटकाचे पोस्टर न्याहाळत असताना ‘...आणि सिनेकलाकार प्रदीप भिडे’ या ठळकपणे छापलेल्या वाक्यावर माझी नजर खिळली. प्रदीप भिडे? आणि अभिनय? या दोन्ही गोष्टींची संगती लावताना अचानक ‘ते पाहा प्रदीप भिडे आले.’ असा आवाज कानी पडला. विदर्भातल्या टळटळीत उन्हात अंगावर कोट चढवलेल्या गो-यापान सडपातळ व्यक्तीचे आगमन झाले. हेच ते सिनेस्टार प्रदीप भिडे! मराठी चित्रपटातील छोटी भूमिका आणि प्रसिद्ध व्यक्तीचे नाव यांच्या मदतीला धावून आले आणि ते झाडीपट्टीतल्या नाटकांमधील ‘सिनेस्टार’ झाले. नागपूर, पुणे, मुंबई येथील सिनेकलाकारांना आपल्या नाटकांत काम करण्यासाठी आणण्याची स्पर्धा सुरू झाली आणि त्यांच्यासोबतच अनेक स्थानिक छोट्या कलाकारांच्या नावामागेही ‘सिनेस्टार’ हे बिरुद चिकटवण्याची फॅशन सुरू झाली.
प्रदीप पटवर्धन, मोहन जोशी, कुलदीप पवार आदी ख-याखु-या सिनेनटांनीही झाडीपट्टीतल्या प्रेक्षकांचे प्रेम अनुभवले आहे. मात्र, त्यांना विदर्भात आणण्यासाठी विमानाचे तिकीट, योग्य सोयी-सुविधा, त्यांचा कलाकार म्हणून आब राखणे, अशा सर्वच किचकट आणि महाग गोष्टींचा सामना झाडीपट्टीतल्या नाटकवाल्यांना करावा लागतो. एखादी गोष्ट जरी कमी पडली तरी अपमान झाला म्हणून नटसाहेब पुन्हा मुंबईत परतायला तयार! मुख्य म्हणजे मुंबई- पुण्यात निर्मात्यांची लाचारी करून भूमिका मिळवणारे नटश्रेष्ठ झाडीपट्टीत मात्र वर नाक करून येता-जाता नाटकवाल्यांना धारेवर धरतात, असा कित्येक नाटकवाल्यांचा अनुभव आहे. या उलट कित्येक तासांचा प्रवास करून नाटकाच्या गावी पोहोचलेले कलाकार नाटकासाठी रात्रभर जीव ओतून काम करतात. त्यामुळे ख-याखु-या फिल्मस्टार्सपेक्षा झाडीपट्टीतले ‘सिनेस्टार’ परवडले, असे जवळपास सर्वच झाडीपट्टी नाटकवाले म्हणतात.


‘आमचे प्रेक्षक लई भोळे असतात, त्यांचं नाटकावर प्रेम जास्त. एखाद्या देखण्या बाईचा किंवा पुरुषाचा सिनेस्टार म्हणून फोटो लावायचा आणि नाटकाची जाहिरात करायची. गावातल्या प्रेक्षकांनी सिनेस्टार कधी जवळून पाहिलेले नसतात, त्यामुळे त्यांना कळत नाही. कोणीही सोम्यागोम्या हल्ली सिनेस्टार ही पदवी मिरवताना दिसतो ते त्याचमुळे!’ झाडीपट्टी नाटकातली आघाडीची नायिका, गायिका वत्सला पोलकंवार सांगत होत्या. ‘जुन्या-जाणत्या कलाकारांना मात्र प्रेक्षक चेह-याने आणि नावाने ओळखतात. एखाद्या फिल्मस्टारप्रमाणेच आमचीही सरबराई केली जाते’, वत्सलाबाई कौतुकाने सांगत होत्या. प्रभाकर आंबोणे, वत्सला पोलकंवार,


डॉ. परशुराम खुणे, सदानंद बोरकर, शेखर डोंगरे, मीनाताई देशपांडे हे झाडीपट्टीतले सगळे कसलेले स्थानिक कलाकार राज्य नाट्य स्पर्धेचे विजेते आहेत. अभिनयाची एवढी जाण असताना मुंबई- पुण्याकडील प्रस्थापित रंगभूमीकडे का नाही वळत? या माझ्या प्रश्नावर सगळे कलाकार एकच उत्तर देतात; ‘झाडीपट्टीतल्या प्रेक्षकांचा नाटकांना इतका उदंड प्रतिसाद असतो, जो मुंबई-पुण्याकडे अभावानेही दिसत नाही.’


‘मल्टी टॅलेंटेड’ असणे हे झाडीपट्टीतल्या कलाकारांचे आणखी एक वैशिष्ट्य! अभिनयासोबतच गाणे म्हणणे आणि पार्श्वसंगीताप्रमाणे आवाज देणे, अशा अनेक कलांमध्ये पारंगत असलेल्या कलाकाराला जास्त मागणी असते. झाडीपट्टीत काम करणा-या प्रत्येक कलाकाराला चांगली ‘नाइट’ मिळते. म्हणूनच पडद्यांचा सेट लावणा-यांना 100 ते 500 रुपयांपर्यंत, अभिनय करणा-या स्थानिक कलाकारांना 1000 ते 2000 रुपयांपर्यंतची नाइट मिळते. मुंबई-पुण्याकडील सिनेस्टार्स असतील तर त्यांना 5000 पर्यंतही एका रात्रीच्या प्रयोगाचे पैसे मिळतात. गाडी खर्च, पेट्रोल किंवा डिझेल आणि प्रत्येकाचे मानधन देऊन नाटकाचा लेखक, दिग्दर्शक असलेल्या व्यक्तीलाही चांगला फायदा होतो. 15 रुपये ते 70 रुपयांपर्यंत नाटकाचे तिकीट दर असतात. मात्र, हजारोंच्या संख्येने येणा-या प्रेक्षकसंख्येमुळे झाडीपट्टीतल्या अनेक नाटकांच्या एका प्रयोगाची कमाई 4 लाख रुपयेही होते.
आधी विनोदसम्राट; आता खलनायक म्हणून झाडीपट्टीत प्रसिद्ध झालेले गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. परशुराम खुणे हे एक अजब रसायन आहे. दादा कोंडके या चलती नाण्याचा झाडीपट्टीत वापर केल्याने आज ते झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणूनही ओळखले जातात. गेल्या 40 वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर काम करणा-या परशुराम खुणे यांनी ‘सिंहाचा छावा’, ‘लग्नाची बेडी’, ‘एकच प्याला’, ‘लावणी भुलली अभंगाला’ अशा गाजलेल्या एकापेक्षा एक नाटकांतल्या भूमिका गाजवल्या. विनोदी नट आणि जादूगार म्हणून नाव कमावलेले खुणे आताशा नव्या नाटकांमधून खलनायकाच्या भूमिका करताना दिसतात. अभिनयासाठी त्यांनी अनेक पुरस्कारही मिळवले. पहिल्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान लाभलेले डॉ. परशुराम खुणे जितक्या समरसून जुन्या भरजरी नाटकांमध्ये भूमिका करायचे तितक्याच आनंदाने ते नव्या नाटकांशी जुळवून घेताना दिसत आहेत.


झाडीपट्टी रंगभूमीने मातब्बर नाटककारांची दर्जेदार नाटके पाहिली. स्थानिक नटांनी काम करून त्या नाटकांना विदर्भात नेण्याचे काम केले. विदर्भातील प्रेक्षकांनी या नाटकांवर जबर प्रेम केले. आताशा नव्याने नाटक लिहिणा-यांची संख्या झाडीपट्टीत दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे लक्षात येते. शाळेत मराठी शिकवणारे अनेक प्राध्यापकही सुमार नाटक लिहून झाडीपट्टीच्या वरातीत हात पिवळे करू लागले आहेत. ‘पाटलाच्या पोरी जरा जपून’ या नाटकापासून सुरू झालेल्या ‘तमाशाप्रधान’ नाटकांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक नाटकात एक तरी गाणे हवे, ही प्रेक्षकांची इच्छा लावण्या आणि ‘छत्तीसगढी हंगामा’ समाविष्ट करून विकृत रूप धारण करू लागली आहे. ‘बिडी जलाइले’सारख्या प्रसिद्ध आयटम साँग्जवर नाटकातल्या स्त्री कलाकारांना नाचवण्याची पंरपरा मूळ धरू लागली आहे. झाडीपट्टीच्या समृद्ध पंरपरेत ही सुमार नाटकांची, रेकॉर्ड डान्सची कीड फोफावत चालली असली तरी ती डौलदार झाडीपट्टीला नापीक करेल, याची भीती सध्या जुन्या-जाणत्या कलाकारांना वाटू लागली आहे.