आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुने भिडू, नवा झाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीच्या विधानसभेत अरविंद केजरीवालांचा झाडू 49 दिवस टिकला. विधानसभेत काय घडले, ते सार्‍या देशाने पाहिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारची भ्रूणहत्या स्वत:च घडवली. खरे तर राजीनामा देऊन जबाबदारीतून पळ काढला. या नाटकानंतर दोनच दिवसांनी ‘आप’ने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत उत्तर प्रदेश सात, महाराष्ट्र सहा, दिल्ली दोन, याखेरीज हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
जी नावे जाहीर झाली, त्यातले बहुतेक उमेदवार विविध विषयांबाबत कमालीचे दुराग्रही आहेत. अव्यवहारी भूमिका तारस्वरात मांडणे अन् नैतिकतेचा आव आणून विद्यमान व्यवस्थेला सुरुंग लावण्याची भाषा बोलणे त्यांना खूप आवडते. भ्रष्टाचार, महागाई व राज्यकारभारातील बेपर्वाई यामुळे देशातला आम आदमी अगोदरच निराश आहे. अशा वातावरणात आम आदमीचे स्वयंघोषित रक्षणकर्ते आपणच आहोत, या पद्धतीने या ‘नैतिक दहशतवाद्यां’नी स्वत:ला सादर केले, तर सामान्यजनांच्या निराशेत आणखी भर पडणार आहे.
दिल्लीची लढाई अर्ध्यावर सोडून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकताना, जे सलामीचे खेळाडू केजरीवालांनी मैदानात उतरवले, त्यापैकी बहुतांश त्यांचे जुने भिडू आहेत. ‘आप’ने त्यांच्या हाती नवा झाडू दिला आहे, इतकेच. महाराष्ट्रात जे सहा उमेदवार ‘आप’ने जाहीर केले, त्यापैकी मेधा पाटकर ‘नर्मदा बचाओ आंदोलना’मुळे सर्वांना परिचित आहेत. त्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या निमित्ताने एका दमात 50-60 शब्दांचे पल्लेदार वाक्य बोलणार्‍या आणि प्रत्येक कृतीत अकारण नाट्य पेरणार्‍या मेधातार्इंचा मुंबईकरांना नव्याने परिचय होईल.
‘बांध नही बनेगा, हम नही हटेंगे’ असा दुराग्रही पवित्रा घेत, 90च्या दशकात सरदार सरोवर प्रकल्पाच्या विरोधात पाटकरांनी नर्मदा बचाओ आंदोलन छेडले. विस्थापितांच्या सुयोग्य पुनर्वसनाच्या आग्रहाऐवजी, जगभरातल्या प्रसिद्धिमाध्यमांसमोर त्यांनी विस्थापितांचे दुकान मांडले. आपल्या आंदोलनाची भरपूर प्रसिद्धी घडवली. आंदोलनामुळे प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले, तरीही हे महत्त्वाकांक्षी धरण उभे राहिले. बहुतांश धरणग्रस्तांचे पुनर्वसनही योग्य प्रकारे झाले. दरम्यान, पर्यावरणवाद्यांच्या प्रभावाखालील जगभरातल्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी, सरदार सरोवर प्रकल्पात अडथळे आणणार्‍या मेधा पाटकरांना मॅगसेसे पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. निवडणुकीच्या रणांगणात आता त्यांचा खरा कस लागेल. दक्षिण मुंबईत निवडणूक लढवण्याचा मेणबत्ती मोर्चावाल्या मीरा संन्याल यांनी पूर्वीही अयशस्वी खटाटोप केला आहे. या वेळी ‘आप’च्या उमेदवार म्हणून आणखी एकदा त्यांची हौस भागवली जाईल.
मुंबईत फसलेल्या अण्णा हजारेंच्या धरणे सत्याग्रह उपक्रमाचे संयोजक बिल्डर मयंक गांधी होते. गर्दीअभावी या कार्यक्रमाचा फज्जा उडाला आणि त्यानंतर हजारेंच्या आंदोलनाचा प्रभाव वेगाने घटू लागला. मयंक गांधी राजकारणाच्या मैदानात उतरण्यापूर्वी मुंबईचा विकास आपल्याच संकल्पनेप्रमाणे व्हावा, यासाठी आग्रही होते. राज्य सरकारने त्यांचा हा आग्रह मान्य केला नाही, मग मयंक गांधींनी केजरीवालांना साथ देण्याचे ठरवले. मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात यंदा ते आपले नशीब आजमावतील. महाराष्ट्राला फारसे परिचित नसलेले सुभाष वारे पुण्यात ‘आप’चे उमेदवार आहेत. पुण्यासह महाराष्ट्राला या निमित्ताने त्यांची ओळख होईल. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागातला भ्रष्टाचार खणून काढल्यामुळे प्रकाशात आलेले माजी सरकारी अधिकारी विजय पांढरे भुजबळांच्या विरोधात नाशिकला लढत देणार आहेत, तर विलास मुत्तेमवार व नितीन गडकरी या दोन दिग्गजांच्या विरोधात अंजली दमानिया नागपूरच्या मैदानात उतरणार आहेत.