आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव - चिमुकल्याच्या सतर्कतेमुळे घरफोडी करून पळणाऱ्या चोरट्यास रातोरात पकडण्यात आैद्योगिक वसाहत पोलिसांना यश आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मोहाडी रस्त्यालगत एक बंद घर फोडून चांदीचे शिक्के, रोख रक्कम,गॅस हंडीसह दोन चोरट्यांनी चारचाकीमधून पोबारा केला होता. परंतु या दोघांनाही चोरी करताना समोरच्या अपार्टमेंटमधील एका लहान मुलाने खिडकीतून पाहिले होते. त्याने आई-वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर या धाडसी मुलाने चोरट्यांचे वर्णन कथन केेले. पोलिसांनी तत्काळ शोधाशोध सुरू केली. त्यानंतर संशयित कार दिसताच पोलिसांनी मध्यरात्री सिनेस्टाइल त्यांचे वाहन आडवे लावून चोरट्याला पकडले. त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पाेलिसांनी चोरट्यांच्या कारसमोर लावली गाडी
पोलिसांनी चोरट्यांच्या कारचा शोध घ्यायला सुरुवात केली. जळगावकडे येत असताना पोलिसांना संशयित वाहन दिसले. पोलिसांचे वाहन बघून चोरटे कार वेगात चालवू लागले. त्यामुळे पोलिसांनी सिनेस्टाइल त्यांचा पाठलाग करून चोरट्यांच्या कारसमोरच आपली गाडी आडवी लावून कुकरेजा यास पकडले. त्याचा साथीदार मात्र पळून गेला. अनिल याने सिंधी कॉलनीत गेल्या वर्षी ३ ते ४ घरफोड्या केल्या होत्या. त्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता. पुढील कारवाईसाठी त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कापट ताेडले; साखर अन् तुपही चाेरले
रहाणे यांच्या घरातून चोरट्यांनी गॅस हंडी, चार चांदींचे शिक्के, रोख रक्कम, साखर व तुपाचा डबाही चोरला होता. त्यांच्या कारमधून पोलिसांनी सर्व वस्तू हस्तगत केल्या आहेत. चोरी करताना त्याने घरातील कपाटेही तोडले. त्यामधील साहित्य व वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या होत्या. घरमालक ईश्वर रहाणे हे शुक्रवारी बाहेरगावावरून घरी परतले. त्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीबाबत तक्रार दिली. चोरीमध्ये एकूण १३ हजार १८२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.