Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Artist Fadanvis Comment on Drawing at Chiplun

आमच्या रेषा बोलतात भाषा; व्यंगचित्रकार फडणीस यांची परिसंवादात खंत

समीर परांजपे | Update - Jan 13, 2013, 08:59 AM IST

चित्रकलेसंदर्भात समाजामध्ये फारशी जागृती आढळत नाही. या क्षेत्राबाबत अंधार जाणवतो. चित्रकला ही नेहमीच उपेक्षित राहिली.

  • Artist Fadanvis Comment on Drawing at Chiplun

    यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण)- चित्रकलेसंदर्भात समाजामध्ये फारशी जागृती आढळत नाही. या क्षेत्राबाबत अंधार जाणवतो. चित्रकला ही नेहमीच उपेक्षित राहिली. अजिंठा लेणी कुणी कोरली याची आपल्याला माहिती नाही. साहित्यिक, लेखकांना जेव्हा काही व्यक्त करावेसे वाटते तेव्हा कित्येकदा शब्दही अपुरे पडतात. प्रत्येकच भावना, कंगोरे शब्दांतून व्यक्त करता येत नाहीत. चित्र हे माध्यम तेथे कामाला येऊ शकते. रेषा व भाषा यांचा नेमका संबंध अशारीतीने प्रस्थापित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी केले.

    ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ या परिसंवादाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. या परिसंवादात अच्युत पालव, रविमुकुल, विजय बोधनकर, भ. मा. परसवाळे, मंगेश तेंडुलकर, चंद्रकांत चन्ने या नामवंत चित्रकार व व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला.

    या वेळी अच्युत पालव म्हणाले की, जी रेषा माणसाला भिडते ती खरी रेषा. ही रेषा मारता मारता ती आपल्याला सातासमुद्रापलीकडे पोहोचवते. सरळ रेषा काढता काढता माणूस उभा राहतो. एका रेषेशेजारी दुसरी रेषा काढली की त्या दोन रेषांमधील अंतर कळते. त्यावरून दोन माणसांमध्ये अंतर किती राखावे याचेही भान आपल्याला येते. रेषेला कलात्मक आकार असतो. त्यातील भाव समोरच्या माणसांपर्यंत पोहोचला की त्यातून वेगळा आनंद मनाला मिळतो. रविमुकुल म्हणाले की, पुस्तकाची मुखपृष्ठे करणे हा माझ्या आवडीचा विषय आहे. एक लक्षात घेतले पाहिजे की चित्रकाराचे व लेखकाचे सूत नीट जुळले की त्या संयोगातून चांगली कलाकृती निर्माण होते. अशा काही कलाकृती निर्माण करण्याचा आनंद मिळाला. बंगाली लेखक कलाकारांच्या खूप जवळ असतात. मराठी लेखक मात्र कलाकारांच्या फारसे जवळ जात नाहीत. त्याचा तोटा असा होतो की चित्रकला, शिल्पकला अशा कलाप्रकारांवर मराठीत सकस कादंबरी वा अन्य साहित्यप्रकार लिहिले जात नाहीत. विजय बोधनकर यांचेही भाषण झाले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर चित्रकार व व्यंगचित्रकार यांना आमंत्रित केले त्याबद्दल ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी संयोजकांचे आभार मानले.

Trending