आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अलिबाग - शेतकर्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक लावण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र प्रत्येक वेळेला नव्याने कागदपत्रे सादर करून त्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकर्याचा हा त्रास वाचावा व त्याला त्वरित पैसे उपलब्ध व्हावेत, असा प्रयत्न किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) डेबिट कार्डद्वारे करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) अध्यक्ष डॉ. प्रकाश बक्षी यांनी दिली.
अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे राज्यात प्रथमच केसीसी डेबिट कार्डची शनिवारी सुरुवात करण्यात आली. शेतकर्यांना हे कार्ड देणारी ही देशातील पहिलीच सहकारी बँक आहे.
दिव्य मराठीशी बोलताना डॉ. बक्षी यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि नाबार्ड ने दोन वर्षांपूर्वी शेतकर्यांना पीक कर्ज त्वरित मिळावे यासाठी केसीसीची योजना आखली. या योजनेबाबतची अंमलबजावणी करण्यास देशभरातील जिल्हा बँकांना सांगितले होते. त्यानुसार रायगड जिल्हा बँकेने ही योजना स्वीकारून कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. कार्डचा प्रचार करण्यासाठी एक मोबाईल एटीएम व्हॅनही नाबार्डतर्फे रायगड बँकेला पुरवण्यात येणार आहे.
केसीसी कार्डबाबत माहिती देताना रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की, शेतकर्यांना पीक कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेकडे कागदपत्रे सादर करावी लागतात. यात बराच वेळ जातो. केसीसीच्या माध्यमातून एकदा सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर शेतकर्याला त्याच्याकडे असलेल्या एकूण जमिनीचा आणि त्यात येणार्या पिकाचा विचार करून कर्ज मंजूर केले जाईल. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याला केसीसी डेबिट कार्ड देण्यात येईल. या कार्डला आम्ही केसीसी क्रेडिट कार्ड रुपे असे नाव दिले आहे. येत्या सहा महिन्यात एक लाख शेतकर्यांना केसीसी डेबिट कार्ड देण्याचा मानस असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
कर्जाच्या व्याजात सूट मिळणार
शेतकर्याला एक वर्ष मुदतीचे कर्ज देण्यात येणार असून एक वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केल्यास त्याला व्याजात सूटही देण्यात येणार आहे. एका कार्डसाठी 25 रुपये खर्च येत असून नाबार्ड 24 रुपये देणार आहे. रायगड जिल्हा बँकेला एक रुपया खर्च करावा लागणार आहे. कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतो. कार्डसाठी दुसर्या बँकेचा वापर केल्यास प्रत्येक ट्रॅन्जक्शनला 15 रुपये लागतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.