Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Hapoos Mango News In Marathi, Farmers, Maharashtra, Divya Marathi

400 टन हापूस कुठे न्यावा हे कोडे सुटेना!

विजय मनोहर तिवारी | Update - May 04, 2014, 05:37 AM IST

हापूस आंब्याचा पिढीजात शेती व्यवसाय करणा-या देसाई कुटुंबाने एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नव्हते.

 • Hapoos Mango News In Marathi, Farmers, Maharashtra, Divya Marathi
  रत्नागिरी - हापूस आंब्याचा पिढीजात शेती व्यवसाय करणा-या देसाई कुटुंबाने एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नव्हते. देसाई कुटुंबाच्या तिस-या पिढीचे प्रतिनिधी असलेले 39 वर्षीय आनंद शेतात राबत आहेत. त्यांचे आजोबा आंब्याचे पीक घेत होते. मात्र या वेळी पहिल्यांदाच देसाई कुटुंब अडचणीत आले आहे. हापूसला जगभरातील दरवाजे बंद झाले आहेत. हे केवळ व्यावसायिक नुकसान नाही तर लाजिरवाणी गोष्ट आहे, असे आनंद यांनी सांगितले.

  देसाई यांची आसपासच्या परिसरात ख्याती आहे. 1932 मध्ये त्यांचे आजोबा रघुनाथ देसाई यांनी पावसमध्ये 200 एकरात आंब्याची लागवड केली. यावर्षी 400 टन हापूस पिकल्याने ते आनंदात होते. कराचीत दुकान सुरू केले होते, मात्र ताळमेळ जमला नाही. नागपूरनंतर त्यांनी पुण्यात व्यवसाय थाटला. वडील जयंत यांना हापूसच्या आर्थिक उत्पन्नावर विश्वास बसल्याने त्यांनी दोन्ही मुलांना या व्यवसायात गुंतवले.

  तीन पिढ्यांच्या कष्टातून आंब्याची शेती बहरली. सध्या 2 हजार एकरावर 12 हजार झाडांची मालकी या कुटुंबाकडे आहे. केवळ देसाईच नव्हे, तर या भागातील अनेक शेतक-यांचे नशीब पालटले आहे. येथे कोणी शेतकरी तर कोणी व्यावसायिक. त्यामुळे मजुरांची वानवा आहे. 5000 लोकसंख्येच्या पावसमध्ये एक हजार ट्रक, टेम्पो, कार व जीप आहेत.

  आंबा फळांचा राजा आहे. त्यात हापूसची स्थिती महाराजाप्रमाणे आहे. त्याची राजधानी रत्नागिरी आहे. मात्र, युरोपीय देशांनी हापूसवर घातलेला बंदीचा निर्णय उत्पादकांसाठी अडसर ठरला आहे. आंब्याच्या किमती निम्म्यापेक्षा घसरल्या आहेत. पाच डझन आंब्याची दीड ते दोन हजार रुपयांना मिळणारी पेटी आठशेवर आली आहे.

  आंबे विदेशात पाठवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया रत्नागिरीऐवजी सहाशे कि.मी. अंतरावरील लासलगाव येथे आहे. या ठिकाणी लखनऊच्या राष्टÑीय संशोधन केंद्राची शाखा असावी, अशी आंबा व्यावसायिकांची मागणी आहे. देसार्इंसारखे येथील लोक स्वत:ला शेतकरी नव्हे, तर फळांच्या राजाचा दूत असल्याचा अभिमान बाळगतात. सरकारने आंब्याकडे केलेले दुर्लक्ष त्यांना सहन होत नाही.

  मुंबईत ट्रक उभे करण्यास जागा मिळत नव्हती. जिथे एका दिवसात 80 हजार पेट्या पोहोचत होत्या तिथे दोन लाख पेट्यांची रांग आहे. राजाची अशी अवस्था याआधी कधी झाली नव्हती.
  - आनंद देसाई, हापूस उत्पादक

Trending