Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Indore MP Sumitra Mahajan at Chiplun Sahitya Samelan

कोपर्‍यातील स्त्रीचं दु:खही वाचता यावं; खासदार सुमित्रा महाजन यांचे प्रतिपादन

दीपक पटवे | Update - Jan 13, 2013, 09:50 AM IST

वाचत असताना कोपर्‍यात बसलेल्या एखाद्या स्त्रीचं दु:ख काय आहे, हेही वाचता आलं पाहिजे, असे प्रतिपादन इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांनी ‘आम्ही काय वाचतो? का वाचतो?’ या परिसंवादाचा समारोप करताना केले.

 • Indore MP Sumitra Mahajan at Chiplun Sahitya Samelan

  यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण)- राजकारणात काम करणार्‍यांना वाचन करावंच लागतं. कारण वाचनाने कुठे तरी ठिणगी पडते आणि चांगल्यासाठी तिचा वणवाही होऊ शकतो; पण वाचत असताना कोपर्‍यात बसलेल्या एखाद्या स्त्रीचं दु:ख काय आहे, हेही वाचता आलं पाहिजे, असे प्रतिपादन इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांनी ‘आम्ही काय वाचतो? का वाचतो?’ या परिसंवादाचा समारोप करताना केले.

  मुख्य सभामंडपात झालेल्या या परिसंवादात खासदार अनंत गिते, आमदार प्रमोद जठार, र्शीनिवास पाटील, मंत्री सुनील तटकरे आणि लेखिका उषा वैरागकर-आठल्ये यांनी सहभाग घेतला. खासदार महाजन अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या की, लहानपणापासून वाचनाचा संस्कार झाला. पुढे तो कायम राहिला. वाचलेल्या साहित्याचा राजकारणात वागताना खूप उपयोग होतो. मी माहेरी 15 वर्षे वाचलं नसतं तर इंदूरला जाऊन यशस्वी झाले नसते याची मला खात्री आहे. कसं वागायचं ते वाचनातून कळतं. ‘रारंगढांग’सारखी कादंबरी वाचली आणि रस्ते कसे बनवले जातात हे कळलं. ही कादंबरी संरक्षणमंत्र्यांनी वाचली पाहिजे, असा आग्रह धरला. ‘एक होता कार्व्हर’सारखं पुस्तक राजकारण्यांनी कसं काम करावं हे सांगणारं आहे. सर्व राजकारण्यांनी ते वाचलं पाहिजे. राजकारणात अनेक विषयांवर बोलावं लागतं. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर वाचावंच लागतं. ते वेगळं, पण समाजात वावरताना लोकांची मनं वाचलीच पाहिजेत. त्याशिवाय त्यांचं दु:ख कळणार नाही. आम्ही काय वाचतो, कसं वाचतो, त्या वाचलेल्यातला भाव कसा उचलतो आणि आपण कसं वागतो हे महत्त्वाचं आहे, असंही खासदार महाजन म्हणाल्या.

  आमदार प्रमोद जठार यांनी आपल्यावर स्वामी विवेकानंदांच्या चरित्र वाचनाचा मोठा परिणाम झाला असल्याचे स्पष्ट केले. लहानपणी नाथ माधवांची ‘वीरधवल’ ही कादंबरी शिक्षकांनी हातात ठेवली आणि तिथून सुरू झालेला वाचनाचा प्रवास अजूनही सुरूच आहे, असं नमूद करून ते म्हणाले की, लालबागला राहत असताना तिथल्या वाचनालयात सर्व प्रकारचं साहित्य वाचनात आलं. तो प्रवास चरित्र अणि आत्मचरित्रापर्यंत पोहोचला. या आत्मचरित्रांनी चरित्रनेते दिले. त्यातूनच लोकांची दु:खं आपल्याकडे घेऊन सुख देण्याची प्रेरणा मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

  उषा वैरागकर-आठल्ये म्हणाल्या, मराठी बालमासिके लहानपणी छत्तीसगडमध्ये उपलब्ध व्हायची. थोडे मोठे झाल्यावर आवड बदलत गेली. महाविद्यालयात शिकताना सामाजिक कादंबर्‍यांनी विचाराच्या कक्षा रुंदावल्या. हिंदी माध्यमातून शिकत मराठीही वाचताना दोन्ही भाषांतील साहित्याची चांगली ओळख झाली. त्यातून भाषांतराचा मार्ग सापडला. प्राध्यापक म्हणून काम करताना हिंदीबरोबर इंग्रजी, मराठीही शिकवायला सुरुवात केली. आपण का वाचतो? तर वाचण्याने आपल्याला जीवनदृष्टी कळतेच; पण समोरच्या माणसाची जीवनमूल्येही कळतात. चरित्र वाचल्याने प्रेरणा मिळते. तरुण वयात चांगली चरित्रे वाचायला मिळाली तर जीवनाला एक दिशा मिळते. वाचनातूनच मानवतावादी विचारसरणी विकसित झाली. वाचनाचा उपयोग आपल्याभोवती आभासी जग निर्माण करण्यासाठी होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

  र्शीनिवास पाटील यांनी ‘कमल नमन कर’ या प्राथमिक शाळेतील पहिल्या वाचनापासून आपल्या मनोगताला सुरुवात केली. ते म्हणाले, शाळेतले सुविचार वाचत मोठा होत गेलो. क्रमिक पुस्तके हेच खेडेगावातलं वाचन होतं. पंख लावून उडायच्या दिवसांत प्रेम कादंबर्‍या वाचल्या. पुण्यात आल्यावर महाविद्यालयात खेळाचे सामान ठेवण्यासाठी ग्रंथालयाच्या खोलीची किल्ली मिळाली. मग खूप वाचन झालं. प्रेमचंदांची कादंबरी वाचली. ग्रामीण साहित्य वाचलं, दलित साहित्य वाचलं. त्यातून समृद्धी मिळत गेली. आता वर्तमानपत्रांत आपलं नाव आलंय का हेच आधी वाचतो, अशीही कोपरखळी त्यांनी मारली.

  जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी आपण फारसं वाचलं नाही याची कबुली देतच बोलायला सुरुवात केली. घर राजकारणी असल्यामुळे लहानपणापासून राजकारणाचे बाळकडू मिळाले, असे नमूद करून ते म्हणाले की, व्यवहारातून ज्ञानात भर पडत गेली. पुस्तकं वाचली नाहीत; पण माणसांची मनं वाचली. ग्रामीण भागातल्या माणसाने त्याच्या व्यवहारातून खूप काही शिकवलं. किती वाचलं आणि काय वाचलं यापेक्षा वाचून संस्कार होण्यासारखे संवेदनशील मन असेल तरच उपयोग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन संजय भिस्कुटे यांनी केले.

Trending