जगण्याचा वेग पकडण्याचे आव्हान; परिसंवादात कादंबरीकारांनी व्यक्त केले मत
जागतिकीकरणामुळे मानवी जगण्याचा वेग प्रचंड वाढला असून तो टिपणे हेच मराठी कादंबरीकारांसमोरचे खरे आव्हान आहे, यावर मराठीतले आघाडीचे कादंबरीकार आणि अभ्यासकांचे आज एकमत झाले.
-
यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण)- जागतिकीकरणामुळे मानवी जगण्याचा वेग प्रचंड वाढला असून तो टिपणे हेच मराठी कादंबरीकारांसमोरचे खरे आव्हान आहे, यावर मराठीतले आघाडीचे कादंबरीकार आणि अभ्यासकांचे आज एकमत झाले. ‘जागतिकीकरण आणि आजची मराठी कादंबरी’ या विषयावर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर सभामंडपात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. रवींद्र शोभणे या परिसंवादाचे अध्यक्ष होते.
जागतिकीकरणाने माणसाच्या जगण्यावर फार मोठा परिणाम केला आहे. प्रत्येक क्षेत्रात जागतिकीकरणाने प्रवेश केला आहे. त्यामुळे एक मोठा वर्ग सर्वस्वाला वंचितही होतो आहे. हे बदल मराठी कादंबरीकारांनी टिपण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, त्याआधी अनेक अंतर्गत प्रवाह जाणून घ्यावे लागणार आहेत, असे प्रतिपादन सुमेध वडावाला यांनी केले.
जागतिकीकरणामुळे प्रश्नांची गुंतागुंत वाढली असून तो गुंता ओळखणे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने बदलत्या काळाचा वेग पकडणे अजूनही मराठी कादंबरीकारांना जमत नाहीये, अशी खंत डॉ. जगदीश कदम यांनी व्यक्त केली. श्रीराम पाचिंद्रे यांनी जागतिकीकरणाचा वेग पकडणे हे केवळ मराठी कादंबरीकारांसमोरचेच नव्हे, तर समीक्षकांसमोरदेखील आव्हान असल्याचे प्रतिपादन केले. परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे यांनी जागतिकीकरणाचा उल्लेख चक्रव्यूह म्हणून केला. आपली स्थिती त्यात अभिमन्यूसारखी झाली असून जागतिकीकरणात माणूस निर्जीव घटक म्हणून गणला जातो आहे. जागतिकीकरणाचे परिणाम 1990 नंतरच्या मराठी कादंब-यांमध्ये रंगनाथ पठारेंच्या कादंब-या प्रभावीपणे चित्र मांडत
आल्या आहेत.
रसिकांचा उदंड प्रतिसाद
चिपळूण- लोटे परशुराम गावातील ग्रामस्थांच्या आग्रहामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संयोजकांना परशुरामाचे चित्र आज लावावे लागले. संयोजकांची ही तडजोड फारशी कोणाच्या लक्षात न आल्यामुळे कोणत्याही वादाशिवाय प्रचंड उत्साहात संमेलनाचा दुसरा दिवस परिसंवाद आणि कविसंमेलनांनी गाजला.
विशिष्ट संघटनेच्या दबावाला बळी पडून संयोजकांनी आपल्या दैवताचा अपमान केल्याची भावना शुक्रवारी लोटे परशुराम ग्रामस्थांनी संयोजकांनी व्यक्त केली. त्यानंतर चिपळूणमधल्या वीरशैव मंदिरात या ग्रामस्थांबरोबर संयोजकांची बैठक झाली. त्यात व्यासपीठावर परशुरामाचे चित्र लावायला संयोजकांनी प्रारंभी ठाम विरोध केला. त्याऐवजी प्रवेशद्वारावर बॅनर लावायची तयारी दर्शवली. त्याने ग्रामस्थांचे समाधान न झाल्यामुळे अखेर आज व्यासपीठाच्या उजव्या कोपºयात छोटे चित्र लावण्यात आले. मात्र, ही बाब कोणाच्याही लक्षात न आल्यामुळे कोणताही वाद न होता आजचा दिवस रसिकांच्या तुडुंब प्रतिसादात पार पडला. मुलाखती, कविसंमेलनांसह सर्वच कार्यक्रमांना मोठी उपस्थिती होती.