आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणकवलीत नारायण राणेंचाच आवाज; कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस 13 जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. नारायण राणे यांनी शिवसेनासह भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.

17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 13 जागांवर बाजी मारली तर शिवसेनेला तीन आणि भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. कणकवलीमध्ये नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राणेंना शह देण्यासाठी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महाआघाडी झाली. तर मनसेनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यामुळे कणकवली नगरपरिषदेच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मनसेसह राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांच्या आघाडीला 'दे धक्का' देत राणेंनी आपला गड शाबूत ठेवला आहे.

गुहागरमध्ये राष्‍ट्रवादीचे घड्याळ फास्ट!
गुहागरमध्ये पहिल्याच नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ फास्ट चालले. 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 11 जागा जिंकून स्पष्ट बहुमत संपादन केले आहे.

गुहागरचे आमदार आणि राज्याचे नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीने शिवसेना आणि कॉंग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाला सहा जागा मिळवत आपले अस्तित्व ठिकविण्याचा प्रयत्न केला आहे.

देवरुखमध्ये शिवसेना, मनसेने उघडले खाते
देवरूख नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता प्रस्तापित केली आहे. उल्लेखनिय म्हणजे या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेनेही विजयाचे खाते उघडले आहे.

देवरूख ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष कॉंग्रेसचे वर्चस्व होते. परंतु देवरूखमधील पहिल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने राजकीय गणिते फोल ठरवून पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. शिवसेनेने 12 जागांवर स्पष्ट बहुमत मिळविले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने चार जागांवर विजय मिळविला तर मनसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले.

खासदार नीलेश राणेंना धक्का
देवरुख नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.त्यामुळे खासदार नीलेश राणेंना जोरदार धक्का बसला आहे.