मुसळधार पावसामुळे कोकण / मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत

Jun 19,2012 04:24:59 AM IST

रत्नागिरी- शनिवारपासून ‘प्रसन्न’ झालेल्या वरुणराजाने सलग तीन दिवस कोकण परिसरावर आभाळमाया कायम ठेवली आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी पूर आल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान, पहिल्याच पावसात कोकण रेल्वे सोमवारी सकाळी काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.
दापोली तालुक्यातील दापोली-हर्णे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर देवगड येथे 10 वर्षाचा मुलगा ओढ्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. मालवणमध्ये माडाचे झाड घरावर पडल्याने एकजण जखमी झाला. पावसाने झाडे कोसळल्याने कोकणातील अनेक गावांमधील वीज तीन दिवसांपासून गायब आहे. सावंतवाडी शहरात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे बाजारपेठेत पाणी आले होते. तर मडुरा-सातोसे नदीचे पाणी शेतमळ्यामध्ये शिरल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बांदा परिसरालाही पावसाने झोडपले. त्यामुळे बांदा-दाणोली मार्ग दोन दिवस पाण्याखाली गेला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील वडद येथील मासेमारी करणारे दोघे बुडाल्याची घटना रविवारी घडली. चिपळूण तसेच गुहागर तालुक्यांच्या सीमेजवळ खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले असता ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे.
5 तास रेल्वे वाहतूक ठप्प
मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रुळांवर मातीचे ढिगारे वाहून आल्याने कोकण रेल्वे वाहतूक सुमारे पाच तास ठप्प होती. रत्नागिरीजवळील अडवली रेल्वेस्थानकापासून सुमारे 600 मीटर अंतरावर गोव्याच्या दिशेला मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दरड कोसळली. तर लांजा आणि आडवली स्थानकादरम्यान मातीचे ढिगारे वाहून आले होते. अखेर सोमवारी सकाळी माती हटवण्यात आल्यानंतर संथ गतीने वाहतूक सुरू झाली होती.X