पावसामुळे कोकण रेल्‍वेचीही / पावसामुळे कोकण रेल्‍वेचीही वाहतूक खोळंबली, लांजाजवळ कोसळली दरड

दिव्य मराठी वेब टीम

Jul 20,2012 07:30:25 PM IST

मुंबई- पश्चिम आणि मध्‍य रेल्‍वेची वाहतूक खोळंबली असतानाच कोकण रेल्‍वेलाही पावसाने दणका दिला आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे विलवडे ते वैभववाडी स्‍थानकांदरम्यान दुपारी रेल्वे रूळावर दरड कोसळ्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वैभवाडीत जनशताब्दी एक्‍स्‍प्रेस थांबवून ठेवण्यात आली आहे. रूळावरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आठवडाभरापासून कोकणात संततधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर झाला आहे. या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे आता रेल्‍वेसेवेवरही परिणाम झाला आहे. लांजाजवळील विलवडे याठिकाणी दरड कोसळ्याने मातीचा ठिगारा साचला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे. सायंकाळी मुंबईकडे जाणारी मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सिंधुदुर्गातील वैभवाडी स्थानकात थांबविण्यात आली आहे. ही गाडी दोन तासांहून अधिक वेळेपासून रेल्‍वे स्थानकात उभी आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून प्रवासी ताटकळले आहेत.
रूळावरील माती हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, माती हटविण्‍याचे काम आणखी काही कालावधीसाठी सुरुच राहणार आहे. त्यामुळे आणखी काही तास कोकण रेल्‍वेची वाहतूक ठप्‍प राहणार आहे.

X
COMMENT