Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Laughing Poem issue at Chiplun Sahitya Samelan

हास्यकविताही वैचारिक हवी; रामदास फुटाणे यांनी मांडले मत

विशेष प्रतिनिधी | Update - Jan 13, 2013, 09:43 AM IST

भाष्य किंवा व्यंगात्मक कविता करताना कवीला वैचारिक भूमिका असलीच पाहिजे. अन्यथा ती भाष्य कविता टिंगल टवाळीचे रूप धारण करते, असे मत भाष्यकार कवी रामदास फुटाणे यांनी खुल्या मुलाखतीत व्यक्त केले

  • Laughing Poem issue at Chiplun Sahitya Samelan

    यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)- भाष्य किंवा व्यंगात्मक कविता करताना कवीला वैचारिक भूमिका असलीच पाहिजे. अन्यथा ती भाष्य कविता टिंगल टवाळीचे रूप धारण करते, असे मत भाष्यकार कवी रामदास फुटाणे यांनी खुल्या मुलाखतीत व्यक्त केले. त्यांच्यासह कवी अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीने साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस सुरू झाला. प्रकाश देशपांडे यांनी घेतलेल्या या मुलाखतीला स्त्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    आपल्या काही कविता वाचून दाखवत आणि त्या करण्यामागची पार्श्वभूमी विशद करीत दोन्ही कवींनी रसिकांना खिळवून तर ठेवलेच; पण हसवता हसवता अंतर्मुखही केले. मुलाखतीच्या प्रारंभीच रामदास फुटाणे यांच्या चित्रपटनिर्मितीचा विषय निघाला. सामना चित्रपटाचं यश हे सर्वस्वी लेखकाचं यश होतं, असे नमूद करीत फुटाणे म्हणाले की, त्यानंतर कोणतेही चित्रपट काढायचे नाहीत हे आपण ठरवले. अलीकडेच राजकारणातील आरक्षणावरचा चित्रपट पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले. सत्ता टिकवण्यासाठी जे काही करता येईल ते करायचं हे जगातल्या सर्वच राजकारण्यांचे त्रिकालाबाधित वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण सत्ताधार्‍यांवर टीका करतो, विशिष्ट पक्ष किंवा विशिष्ट व्यक्तीवर ती टीका नसते. राजकारणातील विसंगती शोधण्याचा तो प्रयत्न असतो. हिंदी कविसंमेलनांना उपस्थित असताना हास्यरसातून सूत्रसंचालन करणार्‍या कवींकडून हास्य व्यंग कवितेची प्रेरणा मिळाली, असेही रामदास फुटाणे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंसमोर बसून त्यांच्यातील विसंगती दाखवणारी कविता त्यांना अनेकदा ऐकवल्या आहेत. त्यांनी त्या कवितांना मनापासून दाद दिली. महाराष्ट्रात सर्वच प्रमुख राजकारण्यांचा हाच अनुभव आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली, कान्होपात्रा, तुला मी क्लिओपात्रा करू शकते’ ही किंवा ‘फ्लॅटवर फ्लॅट उभे वाडे पायाखाली पुरले, गणपती आणि स्फोटापुरतेच आता पुणे उरले’ अशा कविता सादर करीत त्यांनी बदलत्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले.

    अशोक नायगावकरांनी त्यांच्या फारशा माहिती नसलेल्या गंभीर कविता सादर करून स्त्रोत्यांना हसवतानाच गंभीरही केले. आपण पुढच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याने या गंभीर कवितांची मोर्चेबांधणी करीत आहोत, असा मिश्कील टोलाही त्यांनी मारला. ‘खडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले, रिताच हंडा वणवण फिरतो फक्त खालची माय बदलली’ ही दुष्काळावरची कविता त्यांनी सादर केली तेव्हा स्त्रोत्यांनी टाळय़ांचा गजर करीत त्यांना दाद दिली. जळालेल्या महिलेची कविताही अशीच वातावरण गंभीर करून गेली. ‘शाकाहार’ ही त्यांची कविता त्यांनी अशा ढंगात सादर केली की हजारो स्त्रोत्यांनी भरलेले सभागृह अक्षरश: हास्यकल्लोळात बुडाले.

Trending