Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | madban-tractar-accident-one-dead

मृतदेह नेण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला अपघात, एक ठार

प्रतिनिधी | Update - Oct 29, 2011, 12:15 PM IST

माडबन खाडीकिनारी आढळेला मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याकरिता पोलिसांनी बोलाविलेला ट्रॅक्टर माडबनकडे येत असतांना उतारामध्ये पलटी झाल्याने ट्रॉलीमधील कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

  • madban-tractar-accident-one-dead

    राजापूर - माडबन खाडीकिनारी आढळेला मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याकरिता पोलिसांनी बोलाविलेला ट्रॅक्टर माडबनकडे येत असतांना उतारामध्ये पलटी झाल्याने ट्रॉलीमधील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
    माडबन येथील मसणवटा कोंड येथील खाडीकिनारी शुक्रवारी सकाळी सुरेश सोमाजी मयेकर (६०) यांचा मृतदेह खाडीमध्ये सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून या घटनेचा पंचनामा केला. मात्र नियमानूसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याकरीता रुग्णवाहिका न मागविता माडबन पठार येथे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरील मल्लाप्पा बल्लाप्पा गौंडा यांचे ट्रॅक्टर मृतदेह नेण्याकरीता मागविला. माडबनकडे जात असतानाच पठारावरील उतारावर ट्रॅक्टरचे ब्रेक निकामी झाले, त्यातच ट्रॅक्टर चालक मल्लाप्पा यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाले. यात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या जन्नल गौडा या (१८) युवकाचा ट्रॉलीखाली सापडून जगीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरचालक मल्लाप्पा हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
    दरम्यान, पोलिसांच्या एका चुकीमुळे घडलेल्या या अपघाताने जैतापूरवासीय संतप्त झाले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी समितीने पोलिसांच्या या भूमिकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पोलिस प्रशासनाला अजून किती बळी हवेत ? असा सवाल समितीने उपस्थित केला.
    ट्रॅक्टर अपघाताचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वाय. आर. तांदळे तर खाडीकिनारी आढळलेल्या मृतदेहाबाबतचा तपास पोलिस हवालदार व्ही.एस.पांचाळ करीत आहेत.

Trending