Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | naansaheb dharmadhikari smarak issue alibag

नानासाहेबांचे स्मारकच रद्द करा; मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रतिनिधी | Update - Mar 14, 2013, 04:59 AM IST

ज्येष्ठ निरूपणकार व महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकावरून उद्भवलेल्या वादामुळे व्यथित झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आता हे स्मारकच रद्द करण्याची मागणी केली आहे.

 • naansaheb dharmadhikari smarak issue alibag

  अलिबाग - ज्येष्ठ निरूपणकार व महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकावरून उद्भवलेल्या वादामुळे व्यथित झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आता हे स्मारकच रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘या स्मारकासाठीचा निधी दुसर्‍या चांगल्या कामासाठी वापरावा,’ अशी विनंती करणारे पत्र नानासाहेबांचे पुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिले आहे.

  रायगड जिल्हय़ात 30 एकर विस्तीर्ण जागेवर नानासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी 20 कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित होते. 9 एप्रिल 2011 रोजी शरद पवार यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजनही झाले होते. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी त्याला विरोध करत या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयानेही स्मारक उभारण्याच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतरही स्मारकाला विरोध कायमच राहिला. सततच्या विरोधामुळे व्यथित झालेले नानासाहेबांचे पुत्र अप्पासाहेब यांनी काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याकडे स्मारक न उभारण्याची विनंती केली होती. त्यापाठेापाठ त्यांनी नुकतेच एक पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पाठविले असून, त्यात हे स्मारकच रद्द करावे, या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.

  या स्मारकासाठीचा निधी दुसर्‍या चांगल्या कामासाठी वापरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  काय आहे प्रकरण ?
  अलिबाग तालुक्यातील वढाव येथील जमीन सरकारने स्मारकासाठी अधिग्रहित केली होती. मात्र, ती गायरान जमीन असल्याचे सांगत ग्रामस्थांनी अधिग्रहणाला विरोध केला होता. प्रकरण कोर्टातही गेले. तसेच राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री दत्ताजी खानविलकर यांनीही स्मारक उभारणीस विरोध केला होता. ‘नानासाहेबांचे असंख्य भक्त आहेत. त्यांनी स्वखर्चाने हे स्मारक उभारावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला होता.

Trending