नेतृत्व बदला, अन्यथा / नेतृत्व बदला, अन्यथा लोकसभेसारखी गत; नारायण राणे देणार मंत्रिपदाचा राजीनामा

Jul 21,2014 05:30:00 AM IST
कणकवली/सावंतवाडी- सोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध पुन्हा जोरदार आघाडी उघडली आहे. काँग्रेसने चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्यास निकाल हा लोकसभेतील पराभवापेक्षा वेगळा नसेल. या कारणांमुळेच आपण सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत. मात्र काँग्रेसमध्ये कायम राहू, असे राणे रविवारी कणकवलीत म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी सकाळी 10 वाजता राणे यांची भेट घेणार आहेत.

नारायण राणे सध्या कोकणात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. सावंतवाडीत ते म्हणाले, काँग्रेसमध्ये गेली नऊ वर्षे मी आहे. मला त्यांनी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही माझी मनधरणी केली असून पक्षश्रेष्ठींनी भेटीचे आमंत्रण दिले आहे. तरीही आपण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे राणे यांनी सांगितले.
उद्धव यांची सरपंच होण्याचीही कुवत नाही
राणे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍या उद्धव यांची सरपंच होण्याचीही कुवत नाही. ते जितक्या वेळेस टीका करतील तितक्या वेळेस त्यांना प्रत्युत्तर देऊ. शिवसेना आता ‘गोदाम’ झाली असून तेथे नेतृत्वही उरलेले नाही. मोदी लाटेने आमचा पराभव झाला, यामुळे मंत्रिपद तरी कशाला उपभोगावे?

बापलेकात वाद नको म्हणून बाहेर...
बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिल्याचा आरोप माझ्यावर होत आहे. मात्र बाळासाहेबांचे आयुष्य वाढावे, असाच आपण नेहमी प्रयत्न केला. बाप-लेकात वाद होऊ नये म्हणून बाळासाहेबांना सांगूनच आपण शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. उद्धव ठाकरे पुन्हा जर आपल्या वाटेला आले तर त्यांच्या कारनाम्यांची जंत्रीच सादर करू, असा इशाराही राणे यांनी दिला.

सोनियांची ज्येष्ठ नेत्यांसोबत खलबते
नेतृत्वबदलाची मागणी करत राणे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह अनेक नेत्यांसोबत रविवारी बैठक घेतली. नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिंदे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. विधानसभा जागावाटपाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दबावावरही बैठकीत चर्चा झाली.

केसरकरांना आव्हान
शिवसेनेच्या वाटेवर असलेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांना निवडून येऊन दाखवा, असे आव्हान राणेंनी दिले. केसरकर आपल्याच जिवावर आमदार झाले. लोकसभेत केसरकरांनी पाठिंबा न दिल्यामुळे राणेंचे पुत्र नीलेश यांचा सिंधुदुर्गात पराभव झाला होता.

आव्हान कबूल : केसरकर
सावंतवाडीतून राणेंविरुद्ध निवडणूक लढवण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. त्यांच्याकडे मनी पॉवर आहे तर आपल्याकडे जनतेचा पाठिंबा आहे.राणे यांनी केलेल्या आरोपांविरुद्ध त्यांच्यावर 5 कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे, असे केसरकर यांनी मुंबईत सांगितले.
X

Recommended News