जैतापूर प्रकल्पाला राजचा पाठिंबा; जमिनी न विकण्याचे कोकणवासियांना आवाहन
कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकू नका व जे परप्रांतीय आहेत त्यांना हाकलून काढा, असे आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केले.
-
खेड- कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकू नका व जे परप्रांतीय आहेत त्यांना हाकलून काढा, असे आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केले. तसेच रत्नागिरीतील प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प उपयोगाचा असेल तर त्याला खुशाल पाठिंबा द्या, चांगल्या कामात अडथळे आणू नका असेही राज यांनी स्पष्ट केले.
राज म्हणाले, कोकणातील भूमिपूत्रांवर अन्याय होत असून आहे. तुमच्या जमिनी बाहेरचे लोक खरेदी करीत असून, तुम्हाला येथून विस्थापित करण्याचे ष़डयंत्र आहे. त्याला बळी पडू नका. आपल्या जमिनी विकून स्वत:चे अस्तित्त्व नष्ट करु नका. कोकणात बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात येत आहे. मराठी माणसांना व्यवसाय करण्यास कोकणातील प्रोत्साहन दिले पाहिजे, असे राज यांनी सांगितले.
नकला करुन राज्य चालवता येत नाही, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्याला उत्तर देताना राज म्हणाले, नक्कल करायलाही अक्कल लागते. अजित पवारांना मी कधी हसताना पाहिले नाही. कायम गंभीर असतात. ते हसणार तरी कसे कारण रात्र-दिवस ते (पैसे) मोजतच असतात, असे सांगून अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. नारायण राणेंमुळे कोकणात दहशत असून ते परप्रांतीयांना येथे येण्यास प्रोत्साहनच देत असल्याचा आरोपही राज यांनी केला.
त्याआधी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.