1 जुलैपासून शाळा / 1 जुलैपासून शाळा बंद; संस्थाचालकांचा इशारा

वृत्तसंस्था

Jun 16,2012 11:34:15 AM IST

रत्नागिरी: प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 1 जुलैपासून राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा राज्यातील शिक्षण संस्थांनी दिला आहे. अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महासंघाच्या प्रांतिक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार राम मोझे अध्यक्षस्थानी होते. येत्या आठ दिवसांत सरकारला याबाबतची नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे कार्याध्यक्ष वि. ल. पाटील यांनी दिली.
अलिबाग येथे झालेल्या बैठकीमध्ये 21 कलमी मागण्यांचा मसुदा तयार करण्यात आला. त्यात 2004 पासूनचे थकीत वेतनेतर अनुदान आणि इमारत भाड्याची रक्कम संस्थांना एकरकमी अदा करावी, शिक्षण हक्क कायद्यानुसार 30 मुलांमागे एक शिक्षक या निकषाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, राज्यातील सर्व मराठी माध्यमांच्या शाळांना 100 टक्के अनुदान मंजूर करावे, विनाअनुदान धोरण मागे घेण्यात यावे, सीईटी परीक्षा रद्द करावी, शिक्षक आणि शिक्षण सेवक भरतीचे आरक्षण 1997 च्या निकषानुसार व्हावे, सहायक शिक्षक भरतीसाठी परिवीक्षाधीन कालावधी शिक्षण कायद्यानुसार एक वर्षाचा करण्यात यावा, शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

X
COMMENT