Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | sharad pawar news in divya marathi

आमच्या लोकांना ऐनवेळी अवदसा आठवली : शरद पवार

प्रतिनिधी | Update - Apr 14, 2014, 04:39 AM IST

‘माझ्या पक्षातील काही लोकांना याचवेळी अवदसा आठवली. एकत्र काम करत असताना भांड्याला भांडे लागतच असते.

 • sharad pawar news in divya marathi

  सावंतवाडी - ‘माझ्या पक्षातील काही लोकांना याचवेळी अवदसा आठवली. एकत्र काम करत असताना भांड्याला भांडे लागतच असते. पण ज्यावेळी देशाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व मतभेद आणि मनभेद विसरून देशाचा विचार करायला हवा. काही लोकांना स्थानिक राजकारण आणि देशाचे हित यातला फरकच कळत नाही. स्थानिक पातळीवर आपल्या वेगवेगळ्या युती असतात. पण देशाच्या निवडणुकीत आघाडी म्हणूणच आपल्याला काम करायला हवे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी आपल्याच पक्षातील बंडोबांना फटकारले.

  सिंधुदुर्गमधील कॉँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्याबरोबर माझे फोनवर बोलणे झाले आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षाने पक्षशिस्तीचे पालन न केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ’

  आमदार दीपक केसरकर यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, काही लोक केवळ माझ्यापुरतीच संघटना आहे, असे समजून काम करत असतील तर त्यांच्या पदरी निराशा नक्कीत येणार. त्यांना त्यांची जागा दाखवण्याशिवाय मग दुसरा पर्याय उरत नाही.

  महिला आरक्षणाला भाजपचा विरोध
  मोदींवर टीका करताना पवार म्हणाले की, ‘देशात नवीन हिटलर बनवण्याचं स्वप्न काही लोक पाहत आहेत. तुम्हाला आणि मला मिळून त्यांचे हे स्वप्न हाणून पाडावे लागेल. आम्ही महिलांना 50 टक्के आरक्षणासाठी आग्रही आहोत. मात्र भाजपवाले त्या मागणीची खासगीत टिंगलटवाळी करतात. महिला राजकारणाचा कारभार काय चालवणार? असे म्हणतात. मग अशा लोकांकडून व्यापक देशहिताची अपेक्षा कशी बाळगणार?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Trending