नांदोस हत्याकांडातील चौघांची / नांदोस हत्याकांडातील चौघांची फाशी कायम

प्रतिनिधी

Oct 18,2011 07:36:43 AM IST

मुंबई- पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा जणांची निर्घृण हत्या करणा-या चौघा आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या खंडपीठाने सुनावला. अमित शिंदे, संतोष शिंदे, योगेश चव्हाण व संतोष चव्हाण अशी या आरोपींची नावे आहेत.
तंत्रविद्या आणि रसायनांचा वापर करून मुख्य सूत्रधार संतोष चव्हाण हा अंधश्रद्धाळू लोकांना नादी लावत असे आणि त्यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत असे. यात गळाला लागलेल्या गिºहाइकांकडून पैसे उकळून त्या बदल्यात मात्र रद्दी देऊन त्यांना गंडवण्याचे काम तो आपल्या साथीदारांच्या मदतीने करत असे. त्याची ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर फसलेल्या लोकांनी त्याच्याकडे पैसे देण्याचा तगादा लावला. त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने चव्हाण याने त्यांना नांदोस येथील निबीड जंगलात बोलावले. या चौघांनी 25 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2003 या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी राजेश माळी, संजय माळी, अनिता माळी आणि केरूबाई माळी हे माळी कुटुंब, विजय दुधे, विनायक पिसाळ, हेमनाथ ठाकरे, दादा चव्हाण, संजय गवारे, शंकर सारगे आणि विजय दुधे यांची निघृण हत्या केली. नांदोस येथे मोठ्या संख्येने मृतदेह आढळल्याने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपींनी रानटीपणाने व थंड डोक्याने हे हत्याकांड केले. त्यामुळे फाशीची शिक्षा कायम ठेवावी, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला.
न्यायालयाने तो ग्राह्य धरत हे प्रकरण विरळातील विरळा ठरवले. आरोपींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिल्यास जनतेचा न्यायदानपद्धतीवरील विश्वास उडून जाईल. पैशाचा हव्यास आणि मानवी रक्ताची चटक यातून असे क्रूरतापूर्ण कृत्य आरोपींनी केले. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देणेच योग्य ठरेल, असे मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवले.

X
COMMENT