आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारत्नागिरी- काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते नेते दिल्लीसमोर झुकतात. असे स्वाभिमान नसलेले नेते महाराष्ट्राला नकोत. जैतापूरची अणुभट्टी ही काही हातभट्टी नाही. या प्रकल्पाला आमचा विरोधच आहे. कोकणच्या मुळावर उठणार्यांना मुळातून उपटून टाका, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.
कुडाळ येथे रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नारायण राणे व अजित पवार या दोन्ही ‘दादां’चा उद्धव यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आघाडी सरकारमध्ये दोन दादा आहेत. मात्र ते दोघेही नालायक आहेत. अजित पवार हे वाट्टेल ते बोलतात व शरद पवार त्यांना सावरण्याचे काम करतात. सिंचन घोटाळ्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. मात्र, सरकारने केवळ चौकशीचा फार्स नेमला. शेतकर्यांप्रमाणेच धरणग्रस्तांचीही या सरकारने फसवणूक केली. हिंमत असेल तर पवारांनी दुष्काळी भागात जाऊन दाखवावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.
राणे ‘नसते उद्योग’ मंत्री
शिवसेना संपवण्यासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले होते, तेच बुडाले. शिवसेनाप्रमुखांनी अनेकांना मोठे केले. मात्र, काही लोकांनी त्यांच्या व कोकणातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. राणे हे उद्योग मंत्री नव्हेत तर ‘नसते उद्योग मंत्री’ आहेत. राणेंचे वस्त्रहरण करण्यासाठी ही सभा नाही, कारण ज्यांना वस्त्र असतात त्यांचेच हरण करायची असतात. शिवसेनेला धोका देणार्यांना धडा शिकवण्यासाठी कोकणातील जनता समर्थ आहे. एकदा कोकणवासीयांची सटकली तर दादागिरी करणार्यांचे काही खरे नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही उद्धव यांनी दिला.
लोडशेडिंग बंद होईल का?
जैतापूर प्रकल्पाला विरोध करणार असल्याचा पुनरुच्चार करताना ठाकरे म्हणाले, या प्रकल्पामुळे लोडशेडिंग बंद होईल काय? जगाने नाकारलेले धोकादायक तंत्रज्ञान आपल्याकडे आणण्याचा आग्रह कशासाठी? हा प्रकल्प इतर राज्यांत नेऊन दाखवावा, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.