Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Yuva Sena Against Modi,Various Question Arises In Rally

युवा सेनेत मोदींविरोधी खदखद,अलिबागच्या मेळाव्यात प्रश्नांची सरबत्ती

प्रतिनिधी | Update - Jan 17, 2014, 03:21 AM IST

एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर जागा वाटपाची चर्चा करत असताना सामान्य शिवसैनिकांच्या मनात मात्र भाजप व मोदींविरोधात असलेली खदखद गुरुवारी समोर आली.

  • Yuva Sena Against Modi,Various Question Arises In Rally
    अलिबाग - एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर जागा वाटपाची चर्चा करत असताना सामान्य शिवसैनिकांच्या मनात मात्र भाजप व मोदींविरोधात असलेली खदखद गुरुवारी समोर आली. भाजपच्या ‘मिशन 272’चे सर्वेसर्वा अरविंद गुप्ता यांना युवा शिवसैनिकांनी मोदींबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडले. अखेर शिवसेना नेते राहुल नार्वेकर यांना माइक हाती घेऊन प्रश्नोत्तरे संपवावी लागली.
    अलिबाग येथे युवा सेनेच्या पदाधिका-यांचा पहिला राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या उद्घाटनानंतर आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्यावर टीका करताना आदित्य म्हणाले की, राज्यातील उच्च शिक्षण घसरले असून युवा धोरणही लागू झालेले नाही. गेल्या 20 वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने युवकांसाठी काहीही काम केलेले नाही. केवळ नकली धोरण आणि धरणे तयार करून पैसा ओढण्याचे काम केले आहे. आगामी काळ हा युवकांचा असल्याने गाव तेथे युवा सेनेची शाखा तयार तुम्ही करा, याबाबत काय काम केले ते मला रोज ई-मेलद्वारे कळवावे,’ असे आदेशही त्यांनी दिले.
    पदाधिका-यांना सोशल मीडियाबाबत माहिती देण्यासाठी दिल्लीहून अरविंद गुप्ता यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. ऑनलाइन प्रचाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारण्याचीही संधी दिली. तेव्हा एका शिवसैनिकाने, ‘तुम्ही नेहमी मोदी मोदी असे का करता. एनडीएमध्ये अन्य पक्षही आहेत, त्यांंचे नाव का घेत नाहीत?’ असा प्रश्न विचारला. यावर गोंधळलेल्या गुप्ता यांना काय उत्तर द्यावे ते समजेना. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
    दुस-या शिवसैनिकाने, ‘भाजपचे नेते शिवसेना उमेदवाराचा जोमाने प्रचार करत नाहीत, त्याबद्दल तुमचे मत काय?’ प्रश्नाचा रोख पाहून संमेलनाचे आयोजक राहुल नार्वेकर यांनी त्या शिवसैनिकाच्या हातून माइक काढून घेतला आणि ते सत्र संपवत असल्याचे घोषित केले. त्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले.

Trending