आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Died In Tanker Bus Accident At Thane, 14 Injured

ठाण्‍यात झालेल्या टँकर-बस धडकेत 9 ठार, 14 जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - डिझेलने भरलेल्या टॅँकरला लक्झरी बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसचालकासह नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर इतर 14 जण गंभीर जखमी झाले. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघरनजीक मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये काही पुण्यातील प्रवाशांचा समावेश आहे.
पर्पल ट्रॅव्हल्सची ही बस पुण्याहून अहमदाबादकडे जात होती. मध्यरात्री पालघर तालुक्यातील मनोर पोलिस ठाण्याजवळील कुडे गावाजवळ ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टॅँकरला धडकली. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेलचा साठा असल्यामुळे काही क्षणात भडका उडाला व बस जळून खाक झाली. यात गाढ झोपेत असलेल्या बसमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 14 जण गंभीररीत्या भाजले.
भारत पेट्रोलियम कंपनीचा हा ट्रक गुजरातमधील हझिरा येथे जात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगीत अतिशय गंभीररीत्या होरपळल्याने मृतांची ओळख पटू शकली नाही. मात्र, बस पुण्यातून निघालेली असल्याने त्यात काही पुणेकर प्रवाशांचा समावेश असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. सर्व मृतदेह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. बसमधील प्रवाशांची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर केले जात असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलरसू यांनी दिली.
जखमींना मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे जवान व पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र, टँकरमध्ये डिझेल असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पहाटेपर्यंत या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
कारमधील प्रवासी बचावले
टॅँकरला धडक देताच पेटलेल्या बसवर पाठीमागून येणारी एक भरधाव कारही धडकली. त्यामुळे कारनेही लगेच पेट घेतला. मात्र, त्यातील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने ते बचावले. यापूर्वी याच मार्गावर 29 मे 2013 रोजी खासगी बस व टॅँकरचा असाच अपघात झाला होता. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्या आठवणी या अपघाताच्या निमित्ताने ताज्या झाल्या.