राज्यात शनिवारचा दिवस / राज्यात शनिवारचा दिवस ठरला घातवारच, अपघातात 14 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी

Mar 23,2014 01:48:00 AM IST

ठाणे/ उमरगा/ औरंगाबाद - राज्यासाठी शनिवारचा दिवस घातवारच ठरला. ठाण्याजवळ पेट्रोलचा टँकर उलटून झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरग्याजवळ जीप व ट्रकच्या धडकेत पाच जण ठार झाले. करमाडजवळ नातलगाच्या अंत्यविधीहून परतणारी कार उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.


मुंबई-अहमदाबाद मार्गावर शनिवारी पेट्रोलचा टँकर उलटून झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. टँकरमधील तिघे व 4 पादचारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. टँकर मुंबईकडे जात होता. दुपारी तीन वाजता तो उलटला. मृतांची ओळख पटलेली नाही.


करमाड अपघातातील मृत औरंगाबादचे
करमाडजवळील अपघातात बेगमपु-यातील दोन जण ठार, तर पाच जण जखमी झाले. रात्री आठच्या सुमारास गाढे पिंपळगाव येथे हा अपघात झाला. घाटी रुग्णालयातील निवृत्त कर्मचारी सुंदराबाई मानसिंग सलामपुरे (70) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी धरम रामा सलामपुरे (40, न्यू पहाडसिंगपुरा) अशी मृतांची नावे आहेत. जालना येथील नातलगाचा अंत्यविधी आटोपून ओम्नी कारने (एमएच-20-एव्ही-331) ते औरंगाबादला परतत होते. तेव्हाच ट्रकवर (एमएच-20-1513) त्यांची कार आदळली. यात मैनाबाई घलडे (48), मनाबाई सलामपुरे (53), मोहन सलामपुरे (48), कृष्णाबाई सलामपुरे (52) आणि केशरबाई मुंगसे (53 ) गंभीर जखमी झाले.


कर्नाटकातील तरुणांवर काळाचा घाला
क्रुझर जीप व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील पाच तरुण ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात उमरगा ते गुलबर्गा रस्त्यावर कर्नाटक सीमेजवळ शनिवारी सकाळी 7 वाजता घडला. अपघातातील सर्व मृत कर्नाटकातील शेडम (जि. गुलबर्गा) येथील आहेत.हे सर्व जण मित्र जीपने (केए 49 एम 2960) गावी परतत होते. आळंदकडून ट्रक (एमएच 24 ए 3457) भरधाव येत होता. त्यांच्यात झालेल्या धडकेत जीपचा चुराडा झाला. जीपचालक मौलाना हैदरसाब मुल्ला (30), अमिरोद्दीन बंदेलीसाब तेलकूर (22), महंमद माजिद महेमूद शालुवाले (22), शेरुअली मकदम अली शेख (22) हे जागीच ठार झाले, तर मजहर रफिक शेखचा (18) उमरगा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जगन्नाथ विठ्ठल ठगरे (22), एम. डी. बिलाल (23), महेबूब रियामोद्दीन शालुवाले (22) गंभीर जखमी आहेत. त्यांना सोलापूरला हलवण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रकचालक दिलीप पांडुरंग जाधव (लातूर) यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात जीपचालक मौलाना मुल्लावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

X
COMMENT