आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Ceremony At Rigarh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायगडावर आज रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- लहरणारे भगवे ध्वज, पावसाच्या बरसणा-या धारा आणि शिवरायांचा जयजयकार अशा जल्लोषी वातावरणामध्ये 33९ व्या सोहळ्याला मंगळवारी प्रारंभ झाला. बुधवारी सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी 10 वा. संभाजीराजे छत्रपती व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन
करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर येथून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगड येथे भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदाही यासाठी किल्ल्यावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सोमवारी रात्री 50 पेक्षा अधिक वाहनांतून कोल्हापुरातून रवाना झालेले शिवभक्त मंगळवारी पहाटेच गडावर हजर झाले.
दिवसभरामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव, गोवा इकडूनही अनेक शिवभक्त गडावर दाखल झाले. दिवसभर अनेकांनी किल्ल्याची सविस्तर माहिती घेत पाहणी केली. या सोहळ्यासाठी राजसदरेसमोर खास भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. सकाळी शिरकाई देवीचे पूजन करण्यात आले. संध्याकाळी पाचाडचे अनंत देशमुख यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. या वेळी शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, पुराभिलेख विभागाचे कोल्हापूर येथील अधिकारी गणेश खोडके, समितीचे अध्यक्ष इंद्र्रजित सावंत, उपाध्यक्ष संजय पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व हजारो शिवभक्त उपस्थित होते. त्यानंतर कोल्हापूरच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून थरार निर्माण केला. तर आझाद नायकवाडी व
दिलीप शावंत यांच्या पोवाड्यामुळे शिवभक्तांमध्ये वीरश्री संचारली.
बुधवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीराजे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून या वेळी सुवर्ण नाण्यांचा अभिषेकही करण्यात येणार आहे. या दोन दिवशी गडावर येणा-या सर्व शिवभक्तांच्या भोजनाची सोय छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनच्या वतीने चोखपणे करण्यात आली होती.
प्रशासनाची चोख व्यवस्था
या सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त येणार असल्याने येथील स्थानिक प्रशासनाने मोठा चोख बंदोबस्त या परिसरात ठेवला आहे. तसेच पाण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

छत्रपती संभाजीराजे चालत किल्ल्यावर
या संपूर्ण सोहळ्याचे मार्गदर्शक व संयोजक छत्रपती संभाजीराजे यांनी भरपावसात किल्ल्यावर चालत जाणे पसंत केले. रोप वेची सुविधा असतानाही अवघ्या सव्वा तासामध्ये गडावर पोहोचलेल्या संभाजीराजे यांचे शिवभक्तांनी घोषणा देत स्वागत केले.
वाघ्या कुत्र्यासाठी कडक बंदोबस्त
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा ६ जूनपर्यंत न हटवल्यास तो उद्ध्वस्त करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. त्यामुळे येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
PHOTOS : बंदी झुगारून रायगडावर बसवले पंचधातूचे छत्र