आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुद्रा’मुळे खऱ्या अर्थाने गरिबी हटावची सुरुवात - देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ‘जेव्हा सर्वसामान्य माणूस आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल, तेव्हाच देशाची प्रगती हाेत असते. हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्रा योजना अशा कल्पक योजना प्रत्यक्षात आणून खऱ्या अर्थाने गरिबी हटविण्यास सुरुवात केली आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

ठाण्यातील अश्वमेध प्रतिष्ठान व ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेतलेल्यांना कर्ज वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर उपस्थित होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आजपर्यंत केवळ मोठ्या प्रकल्पांना, उद्योगांना बँका कर्ज देत होत्या मात्र आता मुद्रा योजनेमुळे लघु, मध्यम आणि कुटिरोद्योग करणाऱ्यांनादेखील कर्ज मिळणे शक्य झाले आहे. पूर्वी बारा बलुतेदार पद्धतीमुळे गावे समृद्ध होती, पण जसजसे बलुतेदार संपले तसतसे छोट्या व्यवसायांना उतरती कळा लागली. या व्यवसायांसाठी कर्जाची काही व्यवस्थाच नव्हती मात्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली मास प्राॅडक्शनऐवजी प्राॅडक्शन बाय मासेस ही संकल्पना मोदींनी उचलली असून त्यामुळे निश्चितच देशाच्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेमध्ये अामूलाग्र बदल होईल. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना कर्ज मिळत असून कर्ज वितरणात महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच कर्ज मिळालेल्यांनी ज्या कारणांसाठी कर्ज घेतले त्यासाठीच वापरावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पंतप्रधानांच्या अावाहनानुसार देशातील १ कोटी लोकांनी गॅस सबसिडी साेडली. यामुळे १४ हजार कोटी रुपये वाचले. जनधन योजनेत १२ कोटी खाती उघडण्याचा विक्रम झाला. सरकारकडून विविध लाभार्थींना मिळणारी रक्कम, अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने गैरव्यवहार कमी होण्यास मदत झाली. आपला देश तरुणाईचा आहे हे ओळखून पंतप्रधानांनी कौशल्य विकासावर भर दिला, तरुणाई, लोकशाही आणि मागणी या तीन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामुळे आपल्या देशातील बाजारपेठ मजबूत करून त्याचा फायदा आपल्या लोकांना आणि इतर देशांनाही व्हावा यासाठी माेदींनी प्रयत्न केला.’
सर्वसामान्यांना मिळाले आर्थिक अधिकार
मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी ज्याप्रमाणे ‘गरिबी हटाव’ची केवळ घोषणाच दिली जायची पण कार्यक्रम काही नसायचा. पण आता देशातील सर्व नागरिकांची बँक खाती उघडण्याची जनधन योजना असो किंवा मुद्रा योजना असो, या माध्यमांतून देशातील गरीब, सामान्य माणूस खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि त्याला आर्थिक अधिकारिता मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
छायाचित्र: मुद्रा याेजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या ठाण्यातील लाभार्थींना रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात मंजूर कर्जाचे धनादेश वाटप करण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...