Home | Maharashtra | Kokan | Thane | film writing put in format mannar

चित्रपटासाठी लेखनाला साच्यात बसवा

विशेष प्रतिनिधी | Update - Jan 14, 2013, 12:24 PM IST

‘साहित्य व सिनेमा यांचं नातं तोडता येण्यासारखं नाहीच, हे मान्य करूनही चित्रपटांसाठी कालानुरूप व तांत्रिकदृष्ट्या सकस लेखन साहित्यिकांकडून येत नाही.

 • film writing put in format mannar


  यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण) - ‘साहित्य व सिनेमा यांचं नातं तोडता येण्यासारखं नाहीच, हे मान्य करूनही चित्रपटांसाठी कालानुरूप व तांत्रिकदृष्ट्या सकस लेखन साहित्यिकांकडून येत नाही. त्यामुळे लेखकांनी स्वत:ला योग्य साच्यात बसवलं पाहिजे,’ असा सूर रविवारी ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या परिसंवादात चित्रपट निर्मात्यांनी काढला. अर्थात, निर्मात्यांत सकस साहित्याच्या आकलनाच्या मर्यादा आहेत, असे परखड मत लेखक अभिराम भडकमकर यांनी मांडले. साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपात तिसºया दिवशी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

  विजय भिस्कुटे यांनी संचालन केलेल्या या परिसंवादात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक उपस्थित होते. या परिसंवादात मान्यवरांनी मांडलेली मते त्यांच्याच शब्दात...
  एन. चंद्रा (दिग्दर्शक)
  भारतीय चित्रपटसृष्टीवर पहिल्यापासून साहित्याचा प्रभाव आहे. सुरुवातीला काही साम्यवादी लेखकांमुळे चित्रपटावर साम्यवादाचा प्रभाव राहिला. सिनेमा रंगीत झाल्यावर आशय स्वच्छंदी झाला. नंतर पुन्हा सकस कथांचा काळ आला. त्यामुळे साहित्य आणि सिनेमा एकत्र यायला लागले. सध्या मात्र सामाजिक परिस्थितीवर चित्रपट यायला लागले आहेत.

  महेश कोठारे (निर्माते, अभिनेते)
  सिनेमा हा साहित्याचाच एक प्रकार आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक यांनी स्वत:च्या साहित्यावर चित्रपट काढले आहेत. त्यात दादा कोंडके, पुरुषोत्तम बेर्डे, एन. चंद्रा आहेत. भालजी पेंढारकरांनी तर विनोदी चित्रपट काढला. कारण विनोद हा साहित्याचा एक आस्वाद आहे.

  रविराज गंधे (चित्रपट समीक्षक)
  चांगल्या साहित्यकृतींवर आधारलेले चित्रपट मराठीत फारसे झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रारंभीच्या काळात साहित्यिकांचं मोठं योगदान चित्रपटांमध्ये होतं. वि.स. खांडेकरांच्या कादंबºयांवर 16 चित्रपट निघाले आहेत. ना. सी. फडके यांनी तर चित्रपटकथा लेखनाचं प्रशिक्षणच घेतलं होतं. आता तसं होताना दिसत नाही. दिग्दर्शकाने चांगलं साहित्य वाचण्याचीही गरज आहे आणि लेखकांनीही सकस पटकथा लिखाणासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.

  विजय कोंडके (निर्माता, दिग्दर्शक)
  चित्रपट हा मुख्यत्वे दिग्दर्शकाच्या स्वभावावर अवलंबून असतो. मला गंभीरता आवडते म्हणून दादांनंतर मी ‘माहेरची साडी’सारखा गंभीर चित्रपट काढला. साहित्यावर अर्थात, चांगल्या कथांवरच चित्रपट अवलंबून असतो.

  नितीन देसाई (निर्माते)
  साहित्याची जोड मिळाल्याशिवाय चित्रपट निर्माण होणारच नाही. मी स्वत: ऐतिहासिक पुस्तकांवर आधारित चित्रपट काढले आहेत. आता टिळकांच्या चरित्रावर आधारित चित्रपट काढतो आहे. चिपळूणलाच नवा स्टुडिओ करण्याचा विचार सुरू आहे.

  पुरुषोत्तम बेर्डे (निर्माता, दिग्दर्शक, लेखक)
  बोलपट सुरू झाले तेव्हापासून चित्रपटाशी साहित्याचा संबंध आहे. पूर्वी पटकथा लेखनाचं काम साहित्य क्षेत्रातील कामगिरी पाहून दिलं जायचं. पुढे हिंदी चित्रपटांच्या प्रभावाचा काळ आला आणि तिकडच्या कथांची पुनरुक्ती व्हायला लागली. आता सामाजिक जागृती आणि समाज क्षोभाची उदाहरणं समाजात घडत असताना पोलिसाच्या दबंग भूमिकेच्या चित्रपटांना गर्दी होते आहे. एकूण चित्रपटावर साहित्याचा किती प्रभाव असावा ही बाब दिग्दर्शकाच्या अभिरुचीवर अवलंबून असते. माझ्यासारख्या वाचक असलेल्या दिग्दर्शनाच्या बाबतीत ते प्रकर्षाने सिद्ध झाले आहे. हॉलीवूडमध्ये 90 टक्के चित्रपट बेस्ट सेलर पुस्तकांवर आधारलेले असतात. आपल्याकडे मराठीत तर ते फारसे अजून होत नाही.

  अभिराम भडकमकर
  पटकथा परीक्षेला बसल्यासारखे ऐकून दाखवावी लागते. साहित्य कोणालाही जमण्यासारखे आहे, अशी धारणा त्याला जबाबदार आहे. चित्रपट आणि साहित्य यांची स्वत:ची शक्तीस्थळं आहेत आणि मर्यादा आहेत. दोन्हीचं प्रयोजन एकमेकांपेक्षा वेगळे आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. चित्रपट निर्मात्यांच्या आकलनाच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादांमुळे अनेक चांगले लेखक या क्षेत्रापासून दूर गेले. साहित्य हा चित्रपटाचा कणा आहे असे म्हणून भागत नाही, ते कृतीत उतरलं पाहिजे. ते कृतीत उतरलं तर मराठी चित्रपट पैशानेच नाही तर आशयानेही मोठा होईल.

  कांचन अधिकारी
  आधी कथा, पटकथा आणि मग चित्रीकरण येतं. त्यामुळे कथेचा पाया भक्कम असेल तरच चित्रपटाची इमारत भक्कम उभी राहील. चित्रीकरण हे केवळ साहित्याची अभिव्यक्ती असते. ही बाब साहित्यिकांनीही समजून घेतली पाहिजे. अनेक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना वारंवार बोलावूनही लेखक येत नाहीत. चित्रपटाची निर्मिती ही करमणूक प्रधान असते. तो मार्केटवर अवलंबून असतो. त्यामुळे लेखकांनीही सिनेमाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत.

  मनोज कोल्हटकर
  जोपर्यंत सिनेमाची नाळ साहित्याशी जोडली जात नाही तोपर्यंत चांगली कलाकृती निर्माणच होऊ शकत नाही.

Trending