आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यसंमेलनास ५० लाखांचे अनुदान द्यावे : गवाणकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - महाराष्ट्र शासन नाट्यसंमेलन भरवण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेला सन २००४ पासून २५ लाख रुपयांचे अनुदान देते; पण गेल्या काही वर्षांत वाढलेली महागाई लक्षात घेता शासनाने अाता नाट्यसंमेलनाच्या आयोजनासाठी पुढील वर्षापासून ५० लाख रुपयांचे अनुदान नाट्य परिषदेला द्यावे, अशी मागणी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी शनिवारी केली. नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी गवाणकर यांची प्रकट मुलाखत घेतली, या वेळी ते बाेलत हाेते.

गवाणकर म्हणाले की, ‘नाट्यसंमेलन अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मी मराठीतील बोलीभाषांतील नाटके अधिकाधिक रंगभूमीवर यावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मालवणी ही मराठीची बोलीभाषा. वस्त्रहरण या मालवणी नाटकाने रंगभूमी गाजवि ली. असेच भाग्य मराठीच्या बोलीभाषांतील इतर नाटकांना लाभावे, अशी माझी इच्छा आहे. बोलीभाषेत नाटके लिहिणारे खूप चांगले लोक आहेत. बोलीभाषेतील नाटकांची एक स्पर्धा राज्य शासनाच्या सहकार्याने नाट्य परिषदेने भरवावी, यासाठी अापले प्रयत्न असतील. ‘आयपीएल’ची स्पर्धा जशी गाजतवाजत भरवतात तसेच या स्पर्धेचेही आयोजन असावे. त्यामुळे बोलीभाषेतील नाटकांकडे असंख्य लोकांचे लक्ष जाईल. या स्पर्धेत जे नाटक पहिलेे येईल, ते नाट्य परिषदेने दत्तक घेऊन त्याचे प्रयोग सर्वत्र करावेत.’

या वेळी गंगाराम गवाणकर यांनी त्यांच्या अतिशय गाजलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या काही आठवणी खुमासदार शैलीत या मुलाखतीदरम्यान सांगितल्या. त्याला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. या मुलाखतीनंतर गवाणकर यांनी लिहिलेल्या चित्रांगद या नवीन नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.