नीतेश राणेंना जामीन, / नीतेश राणेंना जामीन, पोलिस ठाण्यात लावावी लागणार हजेरी, देश सोडण्यास मनाई

वृत्तसंस्था

Dec 04,2013 12:40:00 PM IST
मुंबई -उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांच्यासह त्यांच्या तीन समर्थकांना आज (बुधवार) जामीन मंजुर करण्यात आला. चौघांना जामीन मिळाला असला तरी त्यांना दररोज पेडणे पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांना देश सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.
नितेश व त्यांचे काही सहकारी काल (मंगळवार) दोन वाहनांतून येत होते. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील धारगल टोल नाक्यावर तिन्ही गाड्या रोखण्यात आल्या होत्या. टोल कर्मचार्‍यांनी त्यांना प्रतिवाहन 250 रुपये शुल्क भरण्यास सांगितले होते. मात्र टोल मागितल्याने नितेश व त्यांचे सहकारी भडकले. त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण करत नाक्याचीही तोडफोड केली. त्यानंतर दोन्ही गाड्या सुसाट निघून गेल्या.
अचानक घडलेल्या प्रकाराने टोल नाक्यावरील कर्मचारी घाबरून गेले होते. त्यांनी लगेच पोलिस तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही गाड्यांचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांना असे समजले, की राणे कुटुंबीयांचे म्हापश्यात नीलम्स ग्रॅंड नावाचे मोठे हॉटेल आहे. पोलिसांनी तेथे शोध घेतला असता नीतेश राणे आणि त्यांचे सहकारी तेथे सापडले. पोलिसांनी सर्वांना अटक केली.
संतोष सोमा राऊत, सागर गोपाळ पाटील, विनम्र अनिल आचरेकर, प्रशांत नामदेव माळकर, प्रशांत ज्ञानदेव माळकर, राकेश प्रल्हाद परब, रिचेंद्र लवू सावंत, मुकुंद बाळकृष्ण परब, राहुल शिवाजी परब अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
X
COMMENT