आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात पाच लाख मराठ्यांचा शिस्तबद्धतेचा आदर्श, संपूर्ण शहर झाले भगवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ठाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. सुमारे ५ लाख मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यात लहान मुले, वृद्ध, महिला व तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या कमी असल्याने हा मोर्चा राज्याच्या इतर जिल्ह्यांसारखा विराट हाेणार नाही, असे वाटत होते. पण रायगड, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधून मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याने ठाणे शहर अक्षरशः: भगवे झाले.
ठाणे शहराच्या सर्व सीमांवर एकच गर्दी झाल्याने सतत धावणारे हे शहर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चक्क ठप्प झाले आणि या शांततेत भर पडली ती मराठ्यांच्या मूकमोर्चाची.
तीन हात नाक्यापासून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. युवतींंच्या हस्ते िजल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात आले. या वेळी मराठा समाजातील मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तीन हात नाक्यावरून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. तीन हात नाका ते िजल्हाधिकारी कार्यालय ही रांग दुपारी दोन वाजता िजल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली तेव्हा या एकेरी रांगेत अंदाजे १ लाख ६५ हजार नागरिक सहभागी झाले होते. त्याच वेळी कंपनी, माजिवडा, कळवा रेती बंदर-साकेतवरून माेर्चेकरी शांतपणे निघाले होते. अरुंद ठाणे शहरामुळे या सर्व रांगांमधील नागरिकांना एकत्र ठाणे िजल्हाधिकारी कार्यालय येथे जमा होणे शक्य नसल्याने या रांगांमधून नागरिक पुढे सरकत होते. या रांगांना शेवटी मोठ्या पडद्यावर आपले प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणींच्या िशष्टमंडळाने िदल्याचे दाखवण्यात आले. एकूण चार रांगांमधील प्रत्येकी लाख-दीड लाख नागरिकांची संख्या लक्षात घेता या मोर्चात अंदाजे पाच लाख मराठा समाज एकवटला असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंिबवली, अंबरनाथ-बदलापूर ते कर्जत तसेच वसई ते िवरार, डहाणू ते पालघर आणि मुलुंड, भांडूप, िवक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर या भागातून मराठा समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. ठाणे िजल्ह्यात मराठ्यांच्या तुलनेत कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे. मराठ्यांच्या मोर्चात राज्यभर कुणबी समाजाचेही लोक सहभागी होत असल्याने या समाजाचे नेते धास्तावले होते. त्यामुळे ठाणे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपल्या समाजाच्या लोकांनी या मोर्चात सहभागी होऊ नये, असे आवाहन त्यांनी आपल्या समाजाला केले होते. मात्र, ठाणे िजल्ह्यातील मराठा समाजाला शेजारच्या पालघर, रायगड व मुंबई उपनगरची मोठी साथ लाभल्याने हा मोर्चा अपेक्षेपेक्षा मोठा ठरला.

मोर्चादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाच्या काळात महत्त्वाचे मार्गही बंद ठेवण्यात आले होते. मोर्चातील वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पण मराठा समाजाने पोलिस व वाहतूक पोलिस यांच्यावर िवसंबून न राहता स्वत: पुढाकार घेऊन व्यवस्था केली होती. यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून ३ हजार स्वयंसेवक काम करत होते. ठाणे शहराच्या सर्व सीमांवर हे स्वयंसेवक तैनात राहून वाहतूक िनयंत्रण करताना िदसले.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अॅट्राॅसिटी कायदा रद्द करण्यात यावा तसेच छत्रपती िशवाजी महाराजांच्या स्मारकाला निधी मंजूर करून तत्काळ काम सुरू करा, अशा मागण्यांचे तरुणांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते. या मोर्चात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन िवचारे, श्रीकांत िशंदे, आमदार प्रताप सरनाईक, िजतेंद्र आव्हाड, िनरंजन डावखरे सहभागी झाले होते.

चिपळूणमध्ये भव्य मोर्चा
चिपळूणमध्येही मराठा क्रांती मोर्चामुळे शहरातील संपूर्ण वातावरण भगवेमय झाले. रत्नागिरी िजल्ह्यामधील मराठा समाज माेठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाला होता. चिपळूणच्या पवन तलावाच्या ग्राउंडवर भव्य स्टेज आणि मोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. वाहतुकीला अडचण होऊ नये म्हणून अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर खेड ते संगमेश्वर यादरम्यान थांबवण्यात आली. तर काही वाहने चिपळूण बायपासने वळवण्यात आली. या मोर्चात खासदार विनायक राऊत, अामदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, भास्कर जाधव सहभागी झाले होते.

या मातीचा मुसलमान बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष!
जातीचा नसलो तरी या मातीचा आहे. िवषय माझ्या भावाच्या हक्काचा आहे! मराठा नसलो तरी मला अभिमान आहे. मी मराठी, या मातीचा मुसलमान आहे..! हे बॅनर मराठा मोर्चातील आकर्षणाचा िवषय ठरले. मो.ह.िवद्यालय येथे उभारण्यात आलेल्या मदारी मेहतर पाणपोईवरील हे बॅनर मराठी मातीत वाढलेल्या मुस्लिम समाजाचे महाराष्ट्रावरचे प्रेम दर्शवणारा होते. ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या संकल्पनेमधून ही पाणपोई उभारण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...