Home | Maharashtra | Kokan | Thane | marathi culture conserv in foreign land

सातासमुद्रापल्याडही जपली मराठी संस्कृती - अनिवासी भारतीय डॉ. अनिल नेने यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी | Update - Jan 14, 2013, 12:24 PM IST

‘आमची पिढी रोजगाराच्या निमित्ताने जरी विदेशात स्थायिक झाली असली तरी त्यांच्या मनात आजही भारताविषयी पूर्वीइतकीच आत्मीयता टिकून आहे.

 • marathi culture conserv in foreign land

  यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - ‘आमची पिढी रोजगाराच्या निमित्ताने जरी विदेशात स्थायिक झाली असली तरी त्यांच्या मनात आजही भारताविषयी पूर्वीइतकीच आत्मीयता टिकून आहे. विदेशात जी मराठी माणसे स्थायिक झाली त्यांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी आजही अनेक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्र मंडळांची वाढती संख्या व मराठी शिकवण्यासाठी चालवलेले जाणारे वर्ग, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यातून आपल्याला हे प्रयत्न दृश्यरूपात दिसू शकेल,’ असे प्रतिपादन इंग्लंडमध्ये गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्याला असलेले डॉ. अनिल नेने यांनी रविवारी केले.

  संमेलनातील इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील आचार्य बाळशास्त्री जांभेकर व्यासपीठावर ‘विदेशातील मराठीचा जागर’ या विषयावर परिसंवाद पार पडला. यात जयंत बापट (आॅस्ट्रेलिया), संतोष अंबिके (सिंगापूर), हसनजी चौगुले (कतार), मंदार जोगळेकर (अमेरिका) हे मराठी भाषिक सहभागी झाले होते. इस्रायलमधील नोहा मसील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

  डॉ. नेने म्हणाले की, भारताबाहेर मराठीचा पहिला जागर झाला 1932 मध्ये लंडनमध्ये. तेथे गोलमेज परिषदेसाठी आलेल्या साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या पुढाकाराने लंडनमध्ये शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. हे सर्वात आद्य महाराष्ट्र मंडळ असून आजही त्याचे कार्य दिमाखात सुरू आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र मंडळाची स्वत:ची इमारत लंडनमध्ये आज उभी आहे.

  इंग्रजीचा बागुलबुवा कमी करा : डॉ. नेने म्हणाले की, महाराष्ट्रात मराठीवर इंग्रजीचे आक्रमण झाल्याची ओरड सुरू असते. मात्र, मराठी भाषेतून असे दर्जेदार साहित्य निर्माण झाले पाहिजे की, इंग्रजीमधील साहित्याशी तोडीस तोड म्हणून ते उभे राहिले पाहिजे. इंग्रजी भाषेच्या वर्चस्वाचा बागुलबुवा सशक्त मराठी साहित्यातून आपल्याला कमी करता येऊ शकेल.
  जगाच्या कानाकोपºयात स्थायिक झालेली मराठी माणसे आपली संस्कृती, भाषा आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आहेत.

  ठोकळेबाज प्रयत्न नकोत : सिगापूरमधील संतोष अंबिके म्हणाले की, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये मराठी भाषेला इंग्रजी, हिंदीचे ग्रहण लागलेले आहे. कोणालाही भाषेच्या शुद्धलेखनाविषयी पडलेली नसते. किंबहुना मोडकीतोडकी भाषा बोलणे हेच फॅशनेबल समजले जात आहे. परदेशात मराठी भाषिकांनी आपली मातृभाषा टिकवण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत. विदेशस्थ मराठी माणसांनी आपली संस्कृती टिकवताना ठोकळेबाज प्रयत्न करू नयेत.

Trending