Home | Maharashtra | Kokan | Thane | Natyasammelan: Play World Set Up Through Museum - Uddhav Thackeray

नाट्यसंमेलनाचे उद्घाटन: संग्रहालयातून नाट्यसृष्टी उभारू -उद्धव ठाकरे

संजय परब | Update - Feb 20, 2016, 03:58 AM IST

भारतीय सिनेमाचे बाॅलीवूड जगत मुंबईत असून या जगताला एकापेक्षा एक कलाकार मराठी रंगभूमीने दिलेत.

 • Natyasammelan: Play World Set Up Through Museum - Uddhav Thackeray
  ठाणे (बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी) - भारतीय सिनेमाचे बाॅलीवूड जगत मुंबईत असून या जगताला एकापेक्षा एक कलाकार मराठी रंगभूमीने दिलेत. बाॅलीवूडसाठी मुंबईत अत्याधुनिक स्टुडिअाे आहेत. मात्र नाटकवेड्या महाराष्ट्राच्या नाटकांना मात्र मुंबईत स्वत:चे हक्काचे घर नाही. शतकाचा इतिहास असलेल्या नाटकाने आपल्या राज्याला सांस्कृतिक व सामाजिक दिशा दिली आहे. या साऱ्याचा मान म्हणून मुंबईत संग्रहालयाच्या रूपाने नाट्यसृष्टी उभारली जाईल,’ असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत सुरू झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद‌घाटन उद्धव यांच्या हस्ते शुक्रवारी येथील झाले. या वेळी उद्धव यांनी नाट्यसृष्टीपुढे असलेल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. ‘माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘खरा ब्राह्मण’, ‘टाकलेले पोर’ अशी सामाजिक आशयाची नाटके लिहिली अाणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ती लोकांसमोर सादर केली. यामुळे उच्चभ्रू समाजाने त्यांची निंदानालस्तीही केली. पण ते खचले नाहीत. प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्रात अनेक नाटककारांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. यामुळेच पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्राचे वर्णन ‘नाटकवेडा नव्हे तर नाटकशहाणा’ असे केले होते. या साऱ्याची आठवण ठेवून नाटकासाठी मुंबईत एका ठिकाणी नाटकांचा सारा इतिहास पाहता येईल अशी नाट्यसृष्टी उभारण्यासाठी आपण पाऊल टाकूया, असे उद्धव यांनी सांगितले. नाटकांच्या तिकिटांचे दर, बालरंगभूमीसाठी सवलतीत नाट्यगृह उपलब्ध करून देणे, महापालिका शाळा तसेच जागांमध्ये तालमीसाठी जागा देणे, पालिकेच्या रुग्णालयांत बॅक स्टेज कर्मचाऱ्यांसाठी दोन बेड्स ठेवणे, अशा मागण्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी यावेळी केल्या.

  संमेलन अध्यक्षपद आता दोन वर्षांचे!
  नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद हे एका वर्षाचे असते. मात्र या काळात फारसे काही करता येत नाही, अशी खंत फय्याज यांच्यासह आधीच्या संमेलनाध्यक्षांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाट्य परिषदेकडून ती मान्य करून घेतली. नाट्य परिषदेच्या ज्या काही अडचणी असतील त्या मी सोडवेन. पण अध्यक्षपद दोन वर्षांचे असावे, तुम्हाला हे मान्य आहे का, असे उद्धव यांनी माेहन जोशींना विचारले अाणि त्यांनीही हे लगेच मान्य केले. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

  खराखुरा औरंगजेबही ओशाळला असता!
  चित्रपट एकदा शूट झाला की असंख्य वेळा पाहता येतो. नाटकाचे तसे नाही. प्रत्येक वेळी नवा प्रयोग असतो, कलाकारांना अफाट ताकद घेऊन नव्याने तो करावा लागताे. नाटकातील कलाकार हेच खरे अभिनेते असतात. मी स्वत: प्रभाकर पणशीकरांची औरंगजेबाची भूमिका बघितली आहे. हिंदू असून त्यांचे उर्दू उच्चार लाजवाब होते. त्यांचा अभिनय तर प्रसंगी खऱ्याखुऱ्या आैरंगजेबालाही लाजवणारा हाेता. पणशीकरांचा अौरंगजेब पाहून खराखुरा औरंगजेबही ओशाळला असता, असे उद्धव म्हणाले

Trending