आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळाच्या उत्साहाला सबुरीचा ‘ब्रेक’, भाजपच अामचा खरा शत्रू; शिवसेना कार्यकर्तेही अाक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाण्यातील प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री व इतर भाजप नेत्यांचा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात अाला. - Divya Marathi
ठाण्यातील प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री व इतर भाजप नेत्यांचा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात अाला.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की युतीने याबाबत शिवसेना- भाजपमधील संभ्रम अजून दूर झालेला नाही. दाेन्ही पक्षातील कार्यकर्ते स्वबळाचा नारा देत अाहेत, तर पक्षनेतृत्व मात्र अजूनही युतीबाबत अाशावादी दिसते.
 
ठाणे - नोटाबंदीच्या निर्णयानंतरही राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास भलताच उंचावला आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकाही स्वबळावरच लढवाव्यात, असा नारा त्यांनी लावला अाहे. ठाण्यात गुरुवारी झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतही त्यांनी वरिष्ठ नेत्यांसमाेर या भावना व्यक्त केल्या. मात्र, शिवसेनेशी युतीसाठी अनुकूल असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या पहिल्या फळीतील नेत्यांनी मात्र सबुरीची भाषा वापरून कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला दिला.  
 
राज्यात २५ जिल्हा परिषदा व दहा महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या अाहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हाेणारी भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीला खूपच महत्त्व हाेते. प्रमुख नेत्यांसह राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांच्या भावना बैठकीतून तसेच आजूबाजूच्या वातावरणातून व्यक्त हाेत हाेत्या. ‘अाता युती नकोच,’ असे मोठमोठे फलक ठाणे शहरभर सर्वत्र अाणि बैठकीच्या ठिकाणी टीपटाॅप प्लाझा सभागृहाच्या बाजूला लावण्यात अाले होते. बहुतांश कार्यकर्ते उघडपणे हेच बोलून दाखवत होते. तर, पदाधिकारीही खासगीत बोलताना युती नकोच असे सांगत होते. नेते मात्र अजून निर्णय झालेला नाही, अशी सावध भूमिका घेताना दिसतात.
 
सध्या राज्या भाजपसाठी सर्वत्र अतिशय पोषक वातावरण असून नोटाबंदीच्या कठोर निर्णयानंतरही जनतेने नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. असे असताना २६ जिल्हा परिषदा व १० महानगरपालिकांच्या निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाऊन एकहाती सत्ता काबीज करायला हवी, अशी भावना बैठकीच्या दरम्यान बहुसंख्य कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.     

आगामी निवडणूक भाजप तसेच शिवसेनेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महापालिका. ३७ हजार कोटींचे एका छोट्या राज्याचे बजेट असणारी ही महापालिका शिवसेनेला अापल्याच ताब्यात ठेवायची असून भाजपला मात्र ती शिवसेनेकडून हिसकावून घ्यायची आहे. लोकसभा व विधानसभेनंतर भाजपचे मुंबई महापालिका हेच लक्ष्य असून त्या दृष्टीने मुख्यमंत्रीही सावध पावले टाकत आहेत. शिवसेनेची युती त्यांना एका फटक्यात तोडून टाकायची तर नाहीच, पण युती होणार  असेल तर ती आपल्या अटींवर, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतलेली दिसते. याचमुळे प्रदेश कार्यकारिणीच्या मुख्य भाषणात त्यांनी अजेंड्यावर युती व्हावी, अशी सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांना संभ्रमातच ठेवले. यामागचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेचा मुंबई महापालिकेतील कारभार भाजपला मान्य नाही. रस्ते, नाले, कचरा टेंडरमधील घोटाळ्यांचा कारभार अाशिष शेलार, किरीट सोमय्यांच्या माध्यमातून भाजपने चव्हाट्यावर अाणला अाहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून शिवसेेनेने २५ वर्षे मनमानी कारभार केला असून मित्रपक्ष असलेल्या भाजपला काडीचीही किंमत दिलेली नाही. याचा वचपा आता काढण्याच्या तयारीत भाजप दिसते.  
 
शिवसेनेला लटकवत ठेवण्याची रणनीती   
विधानसभेत भाजपने शेवटपर्यंत शिवसेनेला लटकवत ठेवले होते. या वेळी तसाच संभ्रम ठेवला असून युतीसाठी ‘अजेंड्याची भाषा’ ही भाजपच्या याच रणनीतीचा एक भाग असल्याचे मानले जाते. मुंबई महापालिकेत भाजपला १०० पेक्षा जास्त जागाही हव्या आहेत. अजेंड्याची भाषा तसेच समान जागा या दोन्ही अटी शिवसेनेला मान्य होतील, असे वाटत नाही. यामुळे शिवसेनेकडूनच युती तोडल्याची घोषणा होण्याची जास्त शक्यता आहे. शिवसेना मग  जिल्हा परिषदा तसेच इतर पालिकांच्या निवडणुकांनाही एकटीच सामोरी जाऊ शकते अाणि नेमके हेच भाजपला हवे आहे. अाता ‘शिवसेनेलाच युती नको हाेती’ असा संदेश भाजपला जनतेत पसरवायचा अाहे.  
 
‘आता अर्धा नको, तर सारा महाराष्ट्र जिंकूया’  
स्वबळाचा नारा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांना खतपाणी घालण्याचे काम केले ते ज्येष्ठ नेते व प्रवक्ते मधू चव्हाण यांनी. सभागृहातील एका फलकावर ‘चला जिंकूया महाराष्ट्र सारा’ असे घोषवाक्य होते. ताे धागा पकडत चव्हाण म्हणाले, ‘आता अर्धा नको, तर सारा महाराष्ट्र जिंकूया .’ चव्हाण यांच्या या वाक्यावर सभागृहात जोरदार टाळ्या पडल्या. तसेच उपस्थितांनी भाजप जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. याच मधू चव्हाण यांनी सन २०१४ मध्येही ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. शिवसेनेबरोबर तीन पायांची शर्यत नको, असा त्यांचा सूर नंतर पक्षात घुमला अाणि शेवटपर्यंत शिवसेनेला युतीची गाजरे दाखवत भाजपने अखेर विधानसभेपूर्वी २५ वर्षांची युती तोडली होती.  आताही युती तोडण्यासाठी चव्हाणांच्या माध्यमातून पाऊल टाकण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
 
भाजपच अामचा खरा शत्रू; शिवसेना कार्यकर्तेही अाक्रमक
नागपूर-   ‘अाता शिवसेनेशी युती नकाेच’, अशा प्रतिक्रिया मुंबई- ठाण्यात उमटत असताना त्यावर शिवसेनेच्या गाेटातून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत अाहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या नागपुरात ‘भाजप हाच अापला एक नंबरचा शत्रू अाहे,’ अशा प्रतिक्रिया शिवसेनेच्या मेळाव्यातून  कार्यकर्त्यांनी व्यक्त करत स्वबळावर लढण्याचाच निर्धार व्यक्त केला. नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी शिवसेना आमदार आणि नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी मेळाव्याचे अायाेजन केले हाेते, त्यात शिवसैनिकांनी स्वबळाचाच नारा दिला. ‘विधासभेत बेइमानी करणाऱ्या भाजपला अाता धडा शिकवू. नागपुरात शिवसेनेची ताकद त्यांना अाम्ही दाखवून देऊ. आमची स्पर्धा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी नाही. भाजपच अामचा नंबर एकचा शत्रू अाहे,’ असा सूर शिवसेनेच्या मेळाव्यात उमटला.