आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटकाची काॅपी नकाे, कथेवर सिनेमा बनवावा - सुबोध भावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - सर्वच नाटकांवर सिनेमा करायची गरज नाही. नाटकाच्या कथेत दम असेल तरच त्यावर सिनेमा करण्यासाठी दिग्दर्शकाने पुढे यायला हवे. अन्यथा निर्मात्याला खड्ड्यात घालण्याचा प्रकार होईल. सर्वोत्तम कथा प्रवाही असून त्यावर नाटकच काय सिनेमाप्रमाणे चांगली मालिकाही होऊ शकते,’ असे मत अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी मांडले. नाट्य संमेलनातील ‘नाटकांचे माध्यमांतर काय हरवतं? काय गवसतं?’ या परिसंवादात ते बोलत होते.

प्रशांत दामले, समीक्षक सुधीर नांदगावकर, समीक्षक गणेश मतकरी, समीक्षक अमोल परचुरे यांचा सहभाग होता. सुबोध म्हणाले, ‘मी फार मोठा दिग्दर्शक नाही. मात्र कट्यार काळजात घुसली, यावर मी बोलू शकतो. मी नाटक पहिले केले. मात्र आधीचे संगीत नाटक पाहिले नव्हते. राहुल देशपांडेने स्क्रिप्ट दिले आणि नाटक वाचल्यानंतर नाट्यापेक्षा यात चित्रपटाचा मोठा आवाका मला दिसला. नाटक वाचताना मी कथेवर लक्ष केंद्रित करतो. ‘कट्यार’च्या स्क्रिप्टमध्ये सात ते आठ भूमिका सक्षमपणे उभ्या करता आल्या असून ती पुरुषोत्तम दारव्हेकर यांची कमाल आहे. हीच गोष्ट बालगंधर्व सिनेमात अभिनय करताना केली,’ असे भावे म्हणाले.

‘नटसम्राट, कट्यार काळजात घुसली हे सिनेमे माध्यमांतरामुळे चालले नाहीत तर त्याला अनेक बाजू होत्या. शंकर महादेवन तसेच सचिन पिळगावकर यांच्या भूमिका फायदेशीर ठरल्या. अन्यथा अधांतर, माकडाच्या हाती शॅम्पेन, संयशकल्लोळ नाटकांवरील सिनेमे चालले असते. ते पडले! नटसम्राट नाटकामधील सगळी स्वगतं घातली असती तर किंवा नाना पाटेकर सिनेमात नसता तर काय झाले असते, असा विचार करून पाहा. दिग्गज कलाकारांच्या सहभागामुळे सोशल मीडियावर या सिनेमांची चर्चा झाली’, असा मुद्दा समीक्षक अमोल परचुरेने मांडला.

कट्यार काळजात घुसली या नाटकाविषयी समीक्षक सुधीर नांदगावकर म्हणाले, ‘सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम असून आधी त्याला सिनेमा दृश्यमान व्हावा लागतो. यामुळेच व्ही.शांताराम यांनी या नाटकावर सिनेमा बनवण्यापूर्वी शेवट बदलण्याचा पर्याय दारव्हेकरांसमोर ठेवला. मात्र दारव्हेकरांनी नकार दिल्यामुळे व्ही. शांताराम सिनेमा बनवू शकले नाहीत.’

‘विषयाला नायकात मर्यादा’
‘तपशिलात एखादा विषय मांडायचा असतो ते सिनेमात मिळतो. नाटकाला मर्यादा असतात. मराठी नाटकांमध्ये जे चांगले आहे ते सर्वत्र जावे,’ असे समीक्षक गणेश मतकरी म्हणाले. तर ‘लेखन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून, ‘जादू तेरी नजर’ हे इंग्लिश नाटकावरून घेतले आहे. कॉपी करणे सोपी नसते. ‘गेला माधव कुणीकडे’ यावर गोविंदाचा चित्रपट सुपर हिट झाला. शेखर सुमनने यावर मालिका केली,’ याकडे दामलेंनी लक्ष वेधले.