शेतकऱ्यांसाठी ठाण्यात धान्योत्सव, / शेतकऱ्यांसाठी ठाण्यात धान्योत्सव, भाजीपालानंतर आता कडधान्य मुक्तीची गरज : सदाभाऊ खोत

May 01,2017 08:35:00 PM IST
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रामुख्याने कोरडवाहू कडधान्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आहेत. आपल्या शेतमालाला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. त्यामुळे भाजीपाला प्रमाणेच कडधान्य नियमनमुक्त करण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात नाम फाउंडेशनतर्फे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही उपस्थिती लावली.
कडधान्य विक्रीला कायद्याने बंदी असून ती रद्द होणे गरजेचे आहे. कडधान्य नियमनमुक्त झाल्यास शेतकरी आपला माल व्यापाऱ्याकडे घेऊन न जाता त्याची थेट सरकारी व्यवस्थेतून विक्री करू शकेल. त्यातून उरलेल्या मालाची शेतकऱ्याला विक्री करू शकेल असेही पंणमंत्री खोत यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. नाम फाऊंडेशन आणि संस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील गावदेवी मंदिर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटनानंतर ते बोलत होते.
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना नुसताच दिलासा न देता त्यांची कडधान्ये थेट शहरात विक्रीला आली. कडधान्य उत्पादकाला थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी हा फार मोठा दुवा आहे. यासाठी भाजीपल्याप्रमाणे कडधान्य शहरातील ग्राहकांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. त्याचप्रमाणे कडधान्य नियमन मुक्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पणन विभागाला देणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.
मकरंद काय म्हणाले..?
नाम फाउंडेशनने गेल्यावर्षी मराठवाड्यात ५०० किलोमीटरपेक्षा जास्त जलसंधारणाची कामे केली. चांगला पाऊस झाल्याने तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने तो विफल्यग्रत झाला आहे. गारपिटीच्या तडाख्याने बाहेर पडलेला माल सडण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बघता भाजीपाल्याप्रमाणे कडधान्य विक्रीची मुभा शेतकऱ्यांना मिळण्याची गरज नाम फौंडेशन चे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

धान्य महोत्सव पहिल्यांदाच
ठाण्यात गेल्या दहा वर्षापासून आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी मराठवाडा , विदर्भ येथील शेतकरायचे कडधान्य विक्रीला ठेवण्यात आले आहे. 1 ते 4 मे दरम्यान गावदेवी मंदिर आणि नंतर 6 ते 10 मे या कालावधीत पाटलीपडा येथे विक्री करण्यात येणार आहे.
X