आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात अाव्वाज शिवसेनेचाच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपदरम्यान जोरदार चुरस असली तरीही शेजारच्या ठाण्यात मात्र शिवसेना सहज स्वबळावर सत्तेत येईल अशी चिन्हे आहेत. या महापालिकेत दुसऱ्या क्रमांकासाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत असेल. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करूनही काँग्रेसला मात्र फारसा फायदा होण्याची चिन्हे नाहीत. मनसे तर निव्वळ अौपचारिकता म्हणून निवडणुकीच्या मैदानात असल्याने ठाण्यात पुन्हा शिवसेेनेचाच ‘अावाज’ घुमेल, असे चित्र अाहे. 

घराणेशाही आणि गुंडांना जवळपास सर्वच पक्षांनी तिकिटे दिल्याने हा मुद्दा फार जोरकसपणे प्रचारात रेटण्याऐवजी सर्वच पक्ष बेतानेच या मुद्द्यावर भाष्य करत आहेत. शिवसेनेला सर्वात प्रथम ज्या शहराने सत्तेची चव चाखण्याची संधी दिली, त्या ठाण्यात यंदाही पक्षासाठी पोषक वातावरण आहे. मजबूत पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांचे जाळे याच्या जोडीला अफाट राजकीय ताकद आणि पुरेशी आर्थिक रसद हे विजयासाठी आवश्यक असलेले चारही घटक शिवसेनेकडे आहेत.
 
त्याचबरोबर बंडखोरांनाही शांत करण्यात शिवसेनेला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. तिकीट वाटपात मात्र शिवसेनेने घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे दिसते. खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुभाष भोईर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, अशोक वैती, स्मिता इंदूलकर, माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे अशा सर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्या जवळच्या नातेवाइकांसाठी तिकिटे मिळवली आहेत. तर शिवसेनेच्या तब्बल २० पेक्षा अधिक उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तरीही त्याचा फारसा फटका शिवसेनेला बसणार नाही, असेच चित्र आहे.   

एकीकडे शिवसेनेत हे चित्र असताना भाजपमध्ये मात्र नाराजांची संख्या मोठी आहे. शिवसेना आणि इतर पक्षांनी तिकिटे नाकारलेल्या आयारामांनाच भाजपने उमेदवारी दिल्याने जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत. तसेच अनेक गुंडांनाही भाजपने पावन करून घेतल्याने कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेल्या राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांच्या कलाने तिकीटवाटप झाल्याने स्थानिक आमदार संजय केळकर यांच्या गटातून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.
 
तरीही भाजपची स्थिती गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत चांगली आहे.१३१ जागांच्या ठाणे महापालिकेत गेली पाच वर्षे ३४ नगरसेवकांसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती यंदा मात्र फारशी चांगली नाही. ऐन निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकदवान नेते, माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
 
इतरही अनेक विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपचा रस्ता धरल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ घटेल, असा अंदाज आहे. अामदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे हे दोघे प्रचारात सक्रिय असून वसंत डावखरे आणि गणेश नाईकांनी प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. आव्हाड आपल्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघात चांगली कामगिरी करतील, मात्र इतर ठिकाणी राष्ट्रवादीची कामगिरी फारशी प्रभावी नसेल, असा अंदाज आहे.  
 
मनसेची अवस्था दयनीय
ठाण्यात काँग्रेसची अवस्था तर फारच चिंताजनक झाली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करत काँग्रेसने ५३ जागांवर उमेदवार उभे केले असले तरीही गेल्या वेळचे १५ नगरसेवकांचे त्यांचे संख्याबळ घटेल, अशी शक्यता आहे. सर्वात दयनीय अवस्था मनसेची झाली आहे. गेल्या वेळी सात नगरसेवक असलेल्या मनसेला यंदा कोणीही फारसे गांभीर्याने घेत नाही.
 
राज ठाकरे यांनीही प्रचारात फारसे लक्ष न दिल्याने शिवसेनेतून मनसेत आलेल्या अभिजित पानसे आणि शहराध्यक्ष अविनाश जाधव या दोन नवख्या आणि अननुभवी नेत्यांवरच मनसेच्या प्रचाराची सारी भिस्त आहे. राज ठाकरेंची एक सभा या आठवड्यात होणार असून त्या सभेत काहीतरी चमत्कार घडेल, या आशेवर मनसे कार्यकर्ते आहेत. अशा वातावरणात नवा ‘ठाणेदार’ निवडून देण्यापेक्षा जुन्या ‘ठाणेदारा’ला म्हणजे शिवसेनेलाच पसंती देण्याकडे या शहरातील बहुतांश मतदारांचा कल दिसताे.  
 
बातम्या आणखी आहेत...